‘ME TOO’ मोहीम आणि प्रसारमाध्यमे व त्यांची भूमिका
महा एमटीबी   14-Oct-2018सध्या जिकडेतिकडे ‘ME TOO’ या मोहिमेबद्दल छापून येत आहे. वेगवेगळ्या इलेक्ट्रॉनिक माध्यमातून त्याविषयी चर्चा होताना दिसत आहे. वेगवेगळ्या लोकांना त्याविषयी प्रश्न विचारले जात आहेत आणि एकूणच या सर्व घटनांमुळे ‘ME TOO’ मोहीम खूप जास्त प्रकाशझोतात आली आहे.

 

‘ME TOO’ मोहीम म्हणजे काय?

 
‘ME TOO’ मोहीम काय आहे, हे प्रत्यक्षात जाणून घेण्याआधी हा शब्द कुठून आला हे जाणून घेणं आवश्यक आहे. स्त्री हक्कांविषयीच्या कार्यकर्त्या तराना बर्ग या १९९७ साली एका लैंगिक शोषणाची शिकार असलेल्या मुलीबद्दल बोलत होत्या. पण तिला प्रतिसाद कसा द्यायचा, हे त्यांना कळत नव्हतं आणि अशा प्रकारचे अत्याचार घडत असतात हे त्यांना समाजाला दाखवायचंही होतं. त्यानंतर जवळजवळ १० वर्षांनी ‘just be’ या NGO ची स्थापना केली आणि त्यामध्ये अशा लैंगिक अत्याचार झालेल्या स्त्रिया आहेत, त्या स्त्रियांसाठी ही संस्था काम करते. या चळवळीला त्यांनी ‘ME TOO’ हे नाव दिलं. त्यानंतर यासंबंधी मोहीम सुरू झाली, ती अँड्रिया कॉन्स्टँड या संदर्भात हे नाव खूप मोठे आहे. अँड्रिया कॉन्स्टँड ही फिलाडेल्फा येथील बास्केटबॉल संघाची संयोजक होती. ती स्वतः एकेकाळी तेथील अॅथलेट होती. तिने बिल कोज्बी यांच्याविरोधात आवाज उठवला होता. बिल कोज्बी हे हॉलिवूडमधील खूप मोठं नाव आहे आणि अमेरिकन टेलिव्हीजनवर कॉमेडीअन म्हणून त्यांनी बरेच कार्यक्रम केले आहेत. त्यांचे खूप आदराने या क्षेत्रात नाव घेतलं जात होतं. मात्र, अमली पदार्थांचे सेवन करून अनेक महिलांवर बलात्कार केल्याचा आरोप त्यांच्यावर होता आणि न्यायालयाने यविरोधात त्यांना शिक्षादेखील सुनावली आहे. मात्र, त्यांच्याविरोधात पहिल्यांदा आवाज अँड्रिया कॉन्स्टँड हिने उठवला होता. ती अगदी खालच्या न्यायालयापासून ते थेट वरच्या न्यायालयापर्यंत लढत गेली आणि तिला पाठिंबा देण्यासाठी ‘ME TOO’ ही मोहीम सुरू झाली. म्हणजे हॉलिवूडमधील अनेक ख्यातनाम अभिनेत्री व महिला अँकर आहेत किंवा समाजातील प्रतिष्ठित महिला आहेत. त्यांनी ‘ME TOO’ अशी मोहीम सुरू केली. त्याला खूप मोठ्या प्रमाणावर जनमान्यता मिळाली. पुरुषांकडून होणाऱ्या लैंगिक छळाला मी पण बळी पडले होते,’ हे याद्वारे सांगण्यात आलं व प्रत्यक्षात लोकांनी त्यांचे अनुभव तिथे कथन केले. गेल्या वर्षी म्हणजेच दि. ५ ऑक्टोबर, २०१७ला न्यूयॉर्क टाइम्सया वृत्तपत्रात अॅशले जड या अभिनेत्रीने एक मुलाखत दिली होती आणि तिने हॉलिवूडमधील प्रसिद्ध चित्रनिर्माता हार्वे वेनस्टेईन यांच्यावर लैंगिक शोषणाचा आरोप केला होता.हार्वे वेनस्टेईन हे खूप मोठं नाव आहे. त्यांच्या अनेक चित्रपटांना ऑस्करदेखील मिळालेलं आहे. मात्र, पुढे शोधपत्रकारीतेचा उपयोग करून न्यूयॉर्क टाईम्सने असे शोधून काढले की, अनेक वेगवेगळ्या अभिनेत्रींनी अशा पद्धतीचे अनुभव त्यांना आलेत, असे सांगितले.त्यानंतर दि. १६ ऑक्टोबर, २०१७ रोजी अलिसा मिलानो यांनी ट्वीटरवरून ‘#ME TOO’ असा टॅग वापरून आणि एकूणच अमेरिकन चित्रपटसृष्टीत कशा पद्धतीने लैंगिक शोषण केले जाते, हे सांगितले व लोकांना आवाहन केले. या आवाहनाला प्रतिसाद मिळाला आणि अवघ्या काही तासांतच अनेक स्त्रियांनी ‘#ME TOO’ हे वापरलं आणि तेथून ही संकल्पना प्रसिद्ध झाली. त्यानंतर मग क्रीडा क्षेत्रात, सरकारी कार्यक्षेत्रातील बऱ्याच गोष्टी प्रकाशझोतात आल्या आणि मग लोकांनी सोशल मीडियावरून प्रचार प्रसार करण्यास सुरुवात केली.
 

माध्यमांची भूमिका यात काय असावी?

 

मुळात ‘ME TOO’ मोहीम ही अतिशय संवेदनशील पद्धतीने हाताळली जावी. कारण हा सगळा प्रश्न स्त्री अस्मितेशी, तिच्या अब्रूशी निगडीत आहे. अनेक अत्याचार स्त्रियांवर त्यांच्या ओळखीच्या लोकांकडून केले जातात. मात्र, लोक लज्जेसाठी, लोक काय म्हणतील किंवा पुन्हा त्यासंबंधी ते प्रकरण उखडून काढलं जाईल, मग त्या स्त्रीला त्यात चुकीचं ठरवलं जाईल, मग काहीजण नातं तोडतील, काम मिळण्यास बंदी होईल, अशा भीतीपोटी स्त्रिया समोर येत नाहीत आणि आता जेव्हा ‘ME TOO’ मोहिमेद्वारे स्त्रिया समोर येत आहेत, तेव्हा प्रसार माध्यमांनी व प्रत्येकाने याची संवेदनशीलता समजायला हवी. प्रसारमाध्यमांना जे व्यावसायिक स्वरूप प्राप्त झाले आहे, त्या व्यावसायिक स्वरूपामुळे आपल्याला TRP कसा मिळतो आहे, लोकं आपल्या संकेतस्थळाला भेट कशी देत आहेत या सगळ्याची चिंताप्रसारमाध्यमांना जास्त असते आणि त्यामुळे या संवेदनशीलतेचा विसर पडतो. त्यामुळे सध्या प्रसारमाध्यमातून फक्त चर्चा करण्यासाठी प्रसिद्धीत राहण्यासाठी या ‘ME TOO’ मोहिमेचा वापर केला जातो. त्यात पुन्हा गेल्या काही दिवसांत भारतात या क्षेत्रात वेगाने हालचाली झाल्या. हॉलिवूडमध्ये जेव्हा ही मोहीम सुरू झाली त्यावेळी त्याचे खूप मोठे पडसाद बॉलिवूडमध्ये उमटले नाही. काही विशिष्ट लोक ज्यात, नृत्य दिग्दर्शिका सरोज खान, हनी इराणी यांनी वेगवेगळी मते मांडली होती. मात्र, तरीही या चळवळीने जोर धरला नाही. मात्र, ज्या वेळी तनुश्री दत्ता या अभिनेत्रीने ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांच्यावर आरोप केला आणि तिने स्वतः अनुभवलेला प्रसंग माध्यमांसमोर मांडला. त्यानंतर या एका प्रकरणाला घेऊन सर्व मोठमोठ्या प्रसारमाध्यमांवर मोठ्या प्रमाणावर चर्चा झाली आणि लगेचच काही दिवसांमध्ये एकानंतर एक लेखक चेतन भगत, अभिनय क्षेत्रातील पीयूष कपूर, पीयूष मिश्रा, दिग्दर्शक साजिद खान, गायक कैलाश खेर, निर्माता दिग्दर्शक सुभाष घई, ‘टी -सिरीजचे निर्माते भूषण कुमार या सर्वांवर आरोप झाले. आलोकनाथ यांच्यासारख्या ज्येष्ठ अभिनेत्यावरसुद्धा आरोप झाले. या सर्व गोष्टी प्रसारमाध्यमांवर मोठ्या प्रमाणावर दाखवल्या जाऊ लागल्या. आता तर काही राजकीय नेते तसेच वृत्तपत्रातील मंडळी यांच्यावरसुद्धा अशा प्रकारचे आरोप होताना दिसत आहेत. या आरोपांवर चर्चा करताना किंवा त्यावर बोलताना ज्या प्रकारे ते हाताळायला हवेत तसे हाताळले जात नाहीत, असे दिसून येते. मुळात या प्रकरणातील सत्य आणि असत्य कोणालाच माहीत नाही. याला कदाचित मोठा कालावधी लागू शकतो. मात्र, त्याआधीच माध्यमे स्वतः मीडिया ट्रायल चालवून, फक्त स्वतःचा स्वार्थ साधण्यासाठी खूप मोठ्या प्रमाणावर चर्चा घडवून आणतात. हे करत असताना ज्या स्त्रीने हे आरोप केले आहेत तिच्यावरसुद्धा खूप मोठ्या प्रमाणावर चर्चा घडवून आणली जाते. आपली मानसिकता अजून विकसित झालेली नाही. ती त्या स्त्रीबाबत चर्चा करूनसुद्धा तिच्या अब्रूचे जतन केले जाईल. त्यामुळे ती स्त्रीच कशी चुकीची आहे, ते खाजगी चर्चेतून सांगण्यात येते किंवा अशा प्रकारचे आरोपसुद्धा काही टेलिव्हीजनवरील कार्यक्रमांमधून किंवा इतर प्रसारमाध्यमांतून केले जातात. तेव्हा माध्यमांनी यासंबंधी प्रचंड संवेदनशीलता आणि जबाबदारीचे भान ठेवणे आवश्यक आहे. हा यामधील सर्वात महत्त्वाचा घटक आहे.

 

प्रसारमाध्यमे आणि कॉर्पोरेट संस्कृती

 

प्रसारमाध्यमांचे व्यावसायीकरण झाल्याची दुसरी बाजू म्हणजे प्रसारमाध्यमांमध्येसुद्धा कॉर्पोरेट संस्कृतीउदयाला आली आहे. या कॉर्पोरेट संस्कृतीमुळे प्रसारमाध्यमांमध्ये एक वेगळ्या प्रकारची वातावरणनिर्मिती झाली आहे. त्यामुळे प्रसारमाध्यमांच्या कामाच्या ठिकाणी स्त्री-पुरुष हे २४ तास किंवा दिवसरात्र सोबत असतात. तेव्हा प्रसारमाध्यमांमध्येसुद्धा अशा प्रकारच्या घटना घडू शकतात किंवा असे आरोप-प्रत्यारोप होऊ शकतात. याची दक्षता प्रसारमाध्यमांनी बाळगणे आवश्यक आहे. तेव्हा दुसर्यांच्या विरोधात चालवलेली ही मोहीम बुमरँग होऊन माध्यमांवर पालटण्याची दाट शक्यता या ‘ME TOO’ या मोहिमेमुळे उभी राहिली आहे. त्यामुळेच प्रसारमाध्यमे जास्त जबाबदार व्हावीत असं वाटतं. दुसरी गोष्ट म्हणजे या संबंधित चर्चा करताना त्या संबंधित कायदे काय आहेत, त्यांची अंमलबजावणी कशी केली जाते, याबद्दल प्रसारमाध्यमांनी जनजागृती करणे गरजेचे आहे; पण तसं होताना आपल्याला दिसत नाही. लैंगिक छळ या संबंधित जे कायदे आहेत त्या कायद्यासंबंधित चर्चा आणि त्या अनुषंगाने कार्यप्रणालीची चर्चा व त्याचा प्रसार माध्यमांवर होणे गरजेचा आहे. पण तसं न होता थेट प्रत्यक्ष आरोप-प्रत्यारोप सेलिब्रेटीच्या नावाचा वापर स्वतःच्या स्वार्थासाठी प्रसारमाध्यमे करतात. ही यामधील सर्वात नाजूक आणि संवेदनशील बाजू आहे. सोशल मीडियावरील ‘ME TOO’ मोहिमेमधील महिलांनी हेसुद्धा सांगितलं. ज्यावेळी त्यांच्यावर लैंगिक छळ केलं गेले, त्यावेळी त्यांना त्या व्यक्तीविरोधात बोलण्याची संधीच उपलब्ध नव्हती. तसं त्यांना व्यासपीठच उपलब्ध नव्हतं. तसेच त्यावेळी त्यांना सर्वांनी नाकारलं होत. तेव्हा प्रसारमाध्यमांनी पुढे येऊन अशा महिलांना, ज्याचा लैंगिक छळ होतो आहे अशा महिलांना व्यासपीठ उभे करून देणे गरजेचे आहे. जेणेकरून ही मोहीम फक्त प्रसारमाध्यमांवर न चालता त्याला मुख्य प्रसारमाध्यमांची जागा मिळेल आणि एका प्रकारे कुकृत्य करणार्यांवर दडपण निर्माण होईल आणि त्यामुळे भविष्यामध्ये अशा प्रकारचे कृत्य करणार्यांना आळा बसेल. त्यामुळे ‘ME TOO’ या मोहिमेसंबंधित बातमी प्रसारित करताना आपण स्वत: हा मोहिमेत येणार नाही ना, याची काळजी प्रसारमाध्यमांनी घ्यावी.

 
 

-प्रा. गजेंद्र देवडा

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/