संघ-स्वयंसेवक
महा एमटीबी   13-Oct-2018हिंदू धर्म म्हणजे पुरातन हजारो वर्षे चालत आलेली एक परंपरा, संस्कृती आहे. संघात सभासद, फी, पगार, मानधन वगैरे काही नाही. बाल स्वयंसेवकापासून प्रौढांपर्यंत सर्वांना काम असते. रोज शाखेत जाणे, संपूर्ण आयुष्य संघ समर्पित करणे हे कामच. ही देशभक्ती आहे.

 

जे पक्के जातीवादी, दहशतवादी, साम्यवादी, अल्पसंख्याकवादी, पाकिस्तानधार्जिणे, भ्रष्टाचारी, मानवाधिकारवादी वगैरे ‘पुरस्कारवापसी’ करणारे, ज्यांच्या तोंडून राष्ट्र, राष्ट्रीयता, भारतमाता, हिंदू, हिंदुस्तान, वंदे मातरम् असे शब्द निघत नाहीत. त्यांच्यातील विचारवंत, बुद्धिजीवी (?) संघावर तोंडसुख घेत आहेत. या संघवाल्यांना भारताचा ‘हिंदू पाकिस्तान’ करायचा आहे, हे ‘भगवे दहशतवादी’ मुस्लीम ब्रदरहूडसारखे आहेत. हे म. गांधीचे खुनी आहेत. विषारी आहेत. अशा ‘महाभयंकर’ संघाचा मी स्वयंसेवक? माझा जन्म १७ डिसेंबर, १९२५ कोकणातील एका खेडेगावातील, कुणकेश्वर (जि. सिंधुदुर्ग) इथला. माझ्या गावच्या शाळेपासून दीड मैल लांब वरंडवाडी. रस्ते नाहीत, वीज नाही, डॉक्टर-वैद्य नाही, पोस्ट ऑफिस नाही. मी कधी ट्राम, बस, ट्रेन पाहिलेली नाही. चढ-उताराच्या कठीण वाटा, वाटेत कोणी भेटणार नाही. मी आठ वर्षांचा. शाळेत जाण्यासाठी मला, माझ्या वडिलांनी त्यांच्या खांद्यावर बसवून शाळेजवळच्या एका शेतकऱ्याकडे (केशवतात्या बोंडाळे) यांच्या घरी ठेवलं. या घराशी आमची जवळीक होती. वडिलांनी मला घरी शिकवलं होतं. मला मराठी दुसरीत प्रवेश मिळाला. म्हणजे चौथी पास झाल्यावर तीन वर्षांनी मला उच्च शिक्षणासाठी माझ्या मामाच्या गावी (वाडे) जायला लागले. या गावाची शाळा फक्त सातवी (व्हर्नाक्युलर फायनल) म्हणजे तीन वर्षांनी मला माझ्या बहिणीच्या गावी देवगडला (जि. सिंधुदुर्ग) इंग्रजी शाळेसाठी आलो. तिथे एका खाजगी क्लासमधून एका वर्षात इंग्रजी तीन इयत्ता पास झालो आणि हायस्कूलमध्ये चौथीत प्रवेश मिळाला. ही शाळा फक्त सातवी (मॅट्रिक)पर्यंतच. तिथे कॉलेज नव्हते. या देवगडला मी पाच वर्षे इंग्रजी शिक्षणासाठी आणि तिथे दीड वर्षे नोकरीसाठी म्हणजे एकूण साडेसहा वर्षे होतो.

 

देवगडला मी संघाचा स्वयंसेवक झालो. वयाच्या १६व्या वर्षापासून गेली ७६ वर्षे स्वयंसेवक आहे. माझ्या एका मित्राने संघ शाखेत नेलं. तिथे एक संघगीत ऐकलं-

 

हे गाव बी माझं, बैलबी माझं जोडी खिलारी

हे शेतबी माझं, खपू इथं करतो न्याहरी !!धृ!!

गावामधी समदं आम्ही एक दिलाचं

कुठं बी असू हिंदूमजी एक गुणाचं

देऊळ-राऊळ समदं माझं सोन शिवारी!!1!!

मायेचा बी पूत येवो झुंज कराया

नांगराचा फाळ घुसल मुंडी खुडाया

वेशीवरी भगवा झेंडा घेई भरारी!!2!!

 

‘मी गाववाला’ हे गाणं मला भावलं आणि मी माझ्या नकळत स्वयंसेवक झालो. मी नियमीत स्वयंसेवक. इंग्रजी चौथीत असताना आमच्या शाखेला एक स्वयंसेवक वामन महाडिक पाचवीत होता. पुढे तो मुख्यशिक्षक झाला आणि मी गटनायक. चिंचवडला संघाने एक मेळावा आयोजित केला होता. लाखोंच्या संख्येत स्वयंसेवकांची उपस्थिती अपेक्षीत होती. प्रत्येक खेड्यांतून आणि शहरांमधून किती स्वयंसेवक यावेत ठरलेले होते. त्यासाठी संघाची ‘विस्तार योजना’ होती. या योजनेत मी भाग घेतला. आमच्या वामन महाडिकच्या गावी त्याच्याच घरी राहायला, जेवायला. २५ दिवस त्यांच्याकडे होतो. शाखा सुरू केली. २०-२५ ते ४०-५० पर्यंत उपस्थित असायची. उत्साही वातावरण असायचे. त्या वेळचे पुरोगामी मुख्यमंत्री मोरारजी देसाई यांनी या मेळाव्यावर बंदी आणली! नंतर हा मेळावा जिल्हानिहाय झाला. या देवगडच्या वास्तव्यात माझ्यासारख्या शेकडोंनी महाराष्ट्रभर भाग घेतला होता.

 

पूढे मी मुंबईला आलो आणि वामन महाडिक पण मुंबईला आला होता. पुढे हा वामन माननीय (शिवसेनेचा) वामनरावजी महाडिक, मुंबई महानगरपालिकेचे ‘मेयर’ झाले. मुंबईला असताना संघावर बंदी आली. संघाने सत्याग्रह सुरू केला. मी भाग घेतला. चार महिन्यांची शिक्षा झाली. मी साडेतीन महिन्यांत सुटलो. त्यावेळी मी माझ्या आर्थिक परिस्थितीपुढे तीन नोकऱ्या करीत होतो. मॉर्निंग हायस्कूल-दुपारी गव्हर्नमेंट सिव्हील सप्लाय डिपार्टमेंट-रात्री रात्र शाळा करत होतो. सगळ्या नोकऱ्या सुटल्या! बेकार होतो काही दिवस. पुढे मी मद्रासला आलो-१९६२ साली. इथं मी ३२ वर्ष, १९९४ पर्यंत होतो. संघावर परत बंदी आली! या बंदीकाळात मी नियमित शाखेत जात होतो. शाखेचे स्वरूप निराळे. एका स्वयंसेवकाला ‘तृतीय वर्षासाठी’ नागपूरला जायचे होते. त्याची आर्थिक परिस्थिती नव्हती. मी त्याला मदत केली. पुढे हा ‘मद्रासी’ स्वयंसेवक पंजाबमध्ये ‘प्रचारक’ म्हणून गेला.

 

मी आता नाशिकला आहे १९९४ पासून. आज संघाचे लाखो स्वयंसेवक आहेत आणि संघ जाणणारे कोटी. (डरपसह चळपवशव) भारतात आणि बाहेरदेशी आहेत. या पुरोगाम्यांना हे संघवाले भारतीय वाटत नाहीत? परके वाटतात? त्यांच्या भावनांची यांना कदर नाही? संघात जातधर्म हे शब्दच नाहीत. हिंदू धर्म म्हणजे पुरातन हजारो वर्षे चालत आलेली एक परंपरा, संस्कृती आहे. संघात सभासद, फी, पगार, मानधन वगैरे काही नाही. बाल स्वयंसेवकापासून प्रौढांपर्यंत सर्वांना काम असते. रोज शाखेत जाणे, संपूर्ण आयुष्य संघ समर्पित करणे हे कामच. ही देशभक्ती आहे, असे संघवाल्यांना वाटते. १९२५ पासून अखंड चालू आहे. त्याची जाहिरातबाजी नाही. ‘पुरोगाम्यांना’ सांगावेसे वाटते, असे एकही क्षेत्र नाही जिथे स्वयंसेवक नाही. ही अशी आहेत संघ गीते, गाण्यांच्या कवींची नावे, माहिती, प्रसिद्धी पराङमुख! या गाण्यांच्या गोड चाली आहेत.

 

१) तुझ्या देशात तुझं न राज्य हो। याची कुणा लाज हो।

नसे कुणा याद हो। तुझ्या देशात... सत्ता हरामी

जिणं गुलामी। खोपट निकामी रिकामी...

 

२) देशभक्ती प्रारंभ जीवनाचा। आत्मयज्ञाने संत व्हावयाचा

 

३) हम करे राष्ट्र आराधन-तनसे मनसे तन मन धन जीवन से

 

४) जय भारत जिसकी किर्ती सुरोने गाई। 

हम है भारत संतान करोडो भाई।

 

५) हमारे जन्मका सार्थक, हमारे स्वर्गका कारण।

हमारे मोक्षका कारण- यही उत्थान भारत का।

 

पूर्वी संघ प्रसिद्धी पराङ्मुख होता. पण स्वयंसेवकांनी भारतभर वर्तमानपत्रे, साप्ताहिके, मासिके चालू केली आहेत. संघाचा याच्याशी संबंध नाही. राजकारणात बुडालेल्या या ‘पुरोगाम्यांना’ आमच्या, आमच्या कोकणी मायेच्या भाषेत सांगावेसे वाटते, “अरे मेल्यानो, संघावर तोंडसुख घेता? जरा ‘संघ’ समजून घ्या ना? आपले शरदरावजी पवार बघा ना ते काय सांगतात ते. नको ना वेड्यासारखे वागू? या ९३ वर्षाच्या म्हाताऱ्याचे ऐका.

 
 

- द. रा. रानडे

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/