श्रद्धेय दत्तोपंत ठेंगडी
महा एमटीबी   13-Oct-2018आज दि. १४ ऑक्टोबर, हा दिवस श्रद्धेय दत्तोपंत ठेंगडी यांच्या पुण्यतिथीचा दिवस. त्यानिमित्ताने त्यांचे पुण्यस्मरण-आजच्या लेखात विषय स्पष्ट करण्यासाठी त्यांनी त्यांच्या बौद्धिक वर्गातून/त्यांच्या उद्बोधनातून सांगितलेल्या काही गोष्टी, पुढे सादर करत आहे.

 

(१) एका संघटनेच्या कामात अपेक्षित यश न मिळाल्याने कार्यकर्ते निराश झाले होते. त्यांची निराशा दूर करण्यासाठी दत्तोपंतांनी जो प्रसंग सांगितला तो असा, आफ्रिकेत जोहान्सबर्ग येथे सोन्याच्या खाणी आहेत तेथील खाणींचा लिलाव होत असे. जे गिऱ्हाईक ती खाण लिलावात विकत घेई तो त्या खाणीत खोदकाम सुरू करीत असे व त्यातून सोने काढीत असे. अशी एक खाण एका धनाढ्य व्यापाऱ्याने लिलावात बोली लावून मिळवली व खोदकामाला सुरुवात केली. परंतु ९० फूट खोदकाम करून सोन्याचा एक कणही न मिळाल्याने निराश झाला व त्याने त्या खाणीचा लिलाव पुकारला. परंतु, ९० फूट खोदूनही काहीच हाती न लागल्याचा गवगवा झाल्याने कोणीच लिलावाची बोली लावायला पुढे येत नव्हता. काही दिवसांनतर एका तरुण इंजिनिअरने आपले नशीब आजमवायचे ठरवले. त्याने पुढे खोदकाम सुरू केले आणि अवघे तीन फूट खोदकाम करताच सोन्याचे अपार भांडार त्याला मिळाले. हा प्रसंग त्याने एका वर्तमानपत्राला कळवला. तो प्रसंग त्या वर्तमानपत्रात संपादकाने पुढे दिलेल्या मथळ्याखाली प्रकाशित केला. तो मथळा ‘do not stop your self 3 feet away from the success’ हे उदाहरण कार्यकर्त्यांनी सतत लक्षात ठेवावे, असे त्यांचे सांगणे असे.

 

(२) कार्यकर्त्याने एखादे अत्यंत महत्त्वाचे काम स्वीकारल्यावर त्यावर लक्ष केंद्रीत करावे व ते काम पुरे झाल्याशिवाय अन्य कामात लक्ष घालू नये. त्या कामाचा जरासुद्धा विसर पडू देता कामा नये, अन्यथा कार्यनाश होऊ शकतो. या संदर्भात एक घडलेला प्रसंग त्यांनी सांगितला, १८५७चे स्वातंत्र्ययुद्ध फसल्यानंतर नागपूर संस्थानचे (जे ब्रिटिशांनी आधीच विलीन केले होते) महाराज भोसले यांनी पुन्हा एकदा ब्रिटीश सरकार विरुद्ध उठाव करायचे ठरवले. त्यासाठी साधूचा वेश घेऊन देशातील सर्व संस्थानिकांशी संपर्क साधून त्यांना या कामात जोडायचे असे ठरवले. यासाठी ते स्वत: नागपूरच्या बाहेर पडले. एकेक संस्थानिकाशी संपर्क करत करत एका संस्थानिकाकडे गेले. त्यांच्याशी चर्चा करायचे ठरले. त्या संस्थानिकाने भोसल्यांना ठेवून घेतले व त्या दिवशी रात्री नर्तिकेच्या नृत्याचा कार्यक्रम ठरवला. दरबार भरला, बहारदार नृत्याचा कार्यक्रम झाला. दरबारातील सर्व दर्शक खूप खूश झाले होते. नागपूरकर भोसलेही खूश झाले होते. त्या आनंदाच्या भरात त्यांनी आपल्या गळ्यातील हिरे-मोत्याचा किंमती हार त्या नर्तिकेच्या दिशेने (दरबारातील रिवाजाप्रमाणे) फेकला. हे त्यांचे कृत्य त्या संस्थानिकाच्या दरबारातील रेसिडनटने पाहिले व त्याला संशय आला. आलेला पाहुणा हा साधू नाही हे त्याच्या लक्षात आले व त्याने पुढची कार्यवाही केली तेव्हा लक्षात आले की, तो साधा साधू नसून तो दुसऱ्याच महत्त्वाच्या (ब्रिटीश सरकार उलथून टाकण्याच्या कामासाठी) आला होता. त्याचे कारण उघड झाले व त्याला ताब्यात घेऊन त्यांचा कट उघड केला गेला. एक सेकंद आपल्या योजनेपासून ते नागपूरकर विचलित झाले व त्या एका सेकंदाच्या विस्मरणाने त्यांचा कार्यनाश झाला.

 

(३) नार्सिसस कॉम्प्लेक्स - ग्रीक पुराणात नर्सिसस नावाच्या एका देखण्या राजकुमाराची गोष्ट येते. हा राजकुमार फारच देखणा व अत्यंत आकर्षक व्यक्तिमत्वाचा होता. त्याला त्याच्या सौंदर्याचा खूप अभिमान होता. एक दिवस तो नदीवरच्या पुलावरून जात असताना नदीच्या पाण्यात त्याने आपले प्रतिबिंब पाहिले व अत्यानंदात त्याने त्या प्रतिबिंबाला मिठी मारण्यासाठी उडी मारली. ती उडी प्राणघातक ठरली व त्यात त्याचा अंत झाला. अशाप्रकारे आपल्या सौंदर्याविषयी अभिमान निर्माण होऊ देणे हे सर्वनाशाला कारणीभूत होऊ शकते, हे लक्षात ठेवले पाहिजे. या प्रकारच्या भावनेला ‘नर्सिसस कॉम्प्लेक्स’ असे म्हणतात. त्यापासून कार्यकर्त्यांनी स्वत:ला दूरच ठेवावे हे दत्तोपंतांचे सांगणे असे.

 

(४) जगामध्ये सध्या ज्या राज्यपद्धती प्रचलित आहेत त्यात दोन पद्धती प्रमुख आहेत. एक लोकशाही आणि दुसरी साम्यवादी किंवा हुकुमशाही. या दोन्ही पद्धतीत काही दोष आहेत. लोकशाहीत सर्व निर्णय बहुमताच्या जोरावर घेतले जातात. अशावेळी एखादा निर्णय बहुमताने घेतला तरी, तो राष्ट्राच्या दृष्टीने योग्य असेलच असे होत नाही. याचे एक ढळढळीत उदाहरण दुसऱ्या महायुद्धात समोर आले. जर्मनीचा हुकुमशहा हिटलरविरोधात घनघोर युद्ध झाले. हिटलरच्याविरोधात दोस्त राष्ट्रांची जी आघाडी झाली होती त्यात फ्रान्स हे एक राष्ट्र होते. एकाप्रसंगी युद्ध चालू ठेवायचे असा निर्णय फ्रान्सचे सेनापती मार्शल वेता यांनी घेतला पण, प्रत्यक्षात फ्रान्सच्या पार्लमेंटमध्ये युद्ध थांबवावे, असा निर्णय झाला व बहुमताचा निर्णय म्हणून फ्रान्सने युद्धातून माघार घेतली. हा निर्णय सैन्याला व जनतेला मात्र पसंत पडला नाही. दुसरा प्रकार हुकुमशाहीचा. त्यातील एक प्रसंग दत्तोपंतांनी सांगितला तो असा, रशियाचा हुकुमशहा स्टॅलीनच्या निधनानंतर भरलेल्या २०व्या काँग्रेसमध्ये क्रुश्चेव आपला वार्षिक अहवाल सादर करताना आधीच्या वर्षात बऱ्याच गोष्टी करायच्या राहून गेल्या व त्यासाठी स्टॅलीन जबाबदार होता, असा सूर त्याने लावला. त्यावेळी एक चिठ्ठी सभासदांमधून सरकत सरकत क्रुश्चेवपर्यंत पोहोचली. चिठ्ठीवर कोणाचे नाव नव्हते पण प्रश्न होता. जर स्टॅलीन जबाबदार होता तर तुम्ही त्याला स्पष्टपणे का विचारले नाही? त्यावर क्रुश्चेवने विचारले की, ही चिठ्ठी ज्याने पाठवली त्याने हात वर करावा. बराच वेळ गेला पण कोणीच हात वर करेना तेव्हा क्रुश्चेव म्हणाला की, आज जसे कोणी पुढे येत नाही तशीच आमची अवस्था त्यावेळी झाली होती. हे हुकूमशाहीचे बोलके उदाहरण. जो हुकुमशहा असतो त्याच्यासमोर मतभेद उघड करताच येत नाही. वरील दोन उदाहरणावरून हेच लक्षात येते की, या दोन्ही व्यवस्थांमध्ये दोष आहेत. मग या दोन्ही व्यवस्थांच्या तुलनेत एखादी चांगली व्यवस्था आहे का? असा प्रश्न उपस्थित करून त्याचे उत्तर दत्तोपंतांनी दिले ते असे, महाभारत युद्धात अर्जुन समोर आजोबा, अन्य नातेवाईक, प्रत्यक्ष गुरु द्रोणाचार्य वगैरेंना पाहून गर्भगळीत झाला. एवढ्या सगळ्या थोर मंडळींना मारून राज्य कशासाठी मिळवायचे, असा प्रश्न त्याने भगवान कृष्णापुढे उपस्थित केला. त्या प्रसंगी, भगवद्गीतेच्या माध्यमातून कृष्णाने त्याच्या सर्व शंकांचे निरसन करून आता तुला पाहिजे ते कर, असेही सांगितले. त्यावर ‘नष्टो मोह: स्मृतिर्लब्धा त्वत प्रसादातमयाच्युत स्थितोस्मि गतसन्देह: करिष्ये वचनंतव...हे निवेदन अर्जुनाने केले व युद्ध जिंकले. वरील दोन्ही व्यवस्थांपेक्षा आपल्याकडचे उदाहरण नक्कीच उजवे आहे, हे स्पष्ट झाले.

 

(५) भगवान कृष्णाचे चित्र आपण जेव्हा जेव्हा पाहतो तेव्हा कृष्णाबरोबर राधा आणि कृष्णाच्या हातात मुरली असतेच, पण कधीकधी राधा न दिसता मुरली मात्र कृष्णाच्या हातात असतेच. मुरलीविना कृष्ण कधीच पाहायला मिळत नाही. हे लक्षात आल्यावर राधेच्या डोक्यात मत्सर जागा झाला. तिने सरळ मुरलीलाच विचारले की असे का? माझे कृष्णावर निस्सीम प्रेम असताना तो तुलाच जास्त महत्त्व का देतो? मुरली बराच वेळ उत्तर देत नाही, पण हट्ट धरून बसल्यावर तिने जे उत्तर दिले, ते सूरदासाच्या दोह्यात अजरामर झाले आहे. ते असे, “प्रथम त्यज दियो सुंदर बास, झादियो तन कटवायो, मन कटवायो, ग्रंथीन ग्रंथीनमें छीदवायो, फिर जैसे बजावत है शाम, वैसे सूर बजायो...” इतका मोठा त्याग करूनही मुरलीचा विनम्र भाव लक्षात येताच राधेने आपली चूक कबूल केली. संघटनेचे काम करताना आपण केलेल्या त्यागाबद्दलचा गवगवा होणार नाही, याची काळजी कार्यकर्त्यांनी घ्यावी, असे त्यांचे सांगणे होते हेच या उदाहरणावरून लक्षात यावे.

 

(६) Sence of Urgency- नेत्याने एखाद्या अत्यंत महत्त्वाच्या कामाची अपेक्षा कार्यकर्त्यांकडून नुसती व्यक्त केली तरी, कार्यकर्त्याने ती किती गांभीऱ्याने घ्यावी, याचे उदाहरण म्हणजे शिवाजी महाराजांचा एकनिष्ठ सरदार तानाजी मालुसरे यांच्या जीवनातील प्रसंग. हा प्रसंग सांगताना दत्तोपंतांच्या चेहऱ्यावरचे भाव बघण्यासारखे झाले होते. कोंढाणा किल्ला घ्यायचा आहे, हे म्हणताच तानाजी मालुसरे म्हणाले, “महाराज मी लगेच मोहिमेवर निघतो.” पण महाराजांच्या लक्षात आले की, तानाजी तर मुलाच्या लग्नाचे निमंत्रण द्यायला आले आहे. म्हणून महाराज म्हणाले की, “तानाजी, आपल्याकडचे शुभकार्य पार पडल्यावर कोंढाण्यावरच्या मोहिमेवर जावे.पण तानाजीने ठासून सांगितले की, “महाराज आधी लगीन कोंढाण्याचे व नंतर लगीन रायबाचे..! याला पर्याय नाही.पुढचा प्रसंग इतिहासात अजरामर झाला. किल्ला घेतल्याचे समजल्यावर महाराज किल्ल्यावर गेल्यावर जेव्हा त्यांना समजले की, झालेल्या युद्धात पराक्रमाची शर्थ झाली पण, तानाजीचा धारातीर्थी पडला होता. ते समजल्यावर महाराजांच्या तोंडातून जे शब्द बाहेर आले ते ‘गड आला पण माझा सिंह गेला’ म्हणून त्या गडाचे नाव ‘सिंहगड’ पडले, हे जगाला माहीत झाले. या प्रसंगातून नेत्यावर आपला किती विश्वास असला पाहिजे व कार्याची निकड कशी लक्षात ठेवावी याचे उदाहरण म्हणून हा प्रसंग ‘sence of urgency’ हा विषय मांडताना त्यांनी सांगितला. स्वत: दत्तोपंत त्यांच्या स्वतःच्या बाबतीत अत्यंत अलिप्त राहत असत. स्वतःविषयी सांगताना मी संघाचा प्रचारक आहे, एवढाच परिचय होईल, याची काळजी घेत. अशा या महान व्यक्तिमत्वाला १४ वर्षे उलटून गेल्यानंतरही विसरता येणार नाही म्हणून ही शब्दसुमनांजली!

 

-श्रीनिवास जोशी

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/