’क्वीन’ची शान वाढली!
महा एमटीबी   12-Oct-2018
 
 
 

गेली नऊ दशकं अखंडपणे प्रवाशांच्या सेवेत कार्यरत असलेल्या, मुंबई-पुणे या महाराष्ट्राच्या आर्थिक व सांस्कृतिक राजधान्यांना जोडणार्‍या आणि पर्यायाने मुंबई-पुणे मार्गाची शान समजल्या जाणा-या ‘डेक्कन क्वीन एक्सप्रेस’ची शान आता आणखी वाढली आहे. आतापर्यंत या रेल्वेगाडीची खानपान सेवा, गाडीचा वक्तशीरपणा, प्रवासादरम्यान खंडाळ्याच्या घाटाचं विहंगम दृश्य, या गाडीने नित्यनेमाने ये-जा करणारे प्रवासी इ. वैशिष्ट्ये आपणा सर्वांनाच माहीत होती. परंतु, आता ही गाडी आणखी एका महत्त्वाच्या कारणासाठी ओळखली जाणार आहे, ते म्हणजे ग्रंथालय!

होय. थोडं वेगळं वाटेल, परंतु खरोखरच आता या रेल्वेगाडीमध्ये प्रवाशांना वाचनाचा आनंद घेता येणार आहे. या अभिनव कल्पनेला कारण ठरला तो महाराष्ट्र राज्य शासनाचा ’वाचन प्रेरणा दिन.’ भारताचे माजी राष्ट्रपती भारतरत्न डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या जन्मदिनी, दि. 15 ऑक्टोबर रोजी संपूर्ण राज्यात ’वाचन प्रेरणा दिन’ साजरा केला जातो. राज्य शासन या दिनाच्या निमित्ताने गेल्या तीन-चार वर्षांपासून भाषा, साहित्य-संस्कृतीच्या संवर्धनासाठी व विकासासाठी अनेक नवनवीन प्रयोग राबवताना दिसतं. याच ’वाचन प्रेरणा दिना’च्या निमित्ताने शासनाने यंदापासून रेल्वेमध्ये ’लायब्ररी ऑन व्हिल्स’ची (फिरते ग्रंथालय) ही संकल्पना राबविण्यास सुरुवात केली आहे. यामध्ये मुंबई-पुणे मार्गावरील मानबिंदू असलेली ‘डेक्कन क्वीन’ तर आहेच, परंतु सोबत मुंबई-मनमाड पंचवटी एक्सप्रेसदेखील समाविष्ट करण्यात आली आहे. मुंबई-पुणे-नाशिक हा महाराष्ट्राच्या विकासात मोठी भर घालणारा सुवर्ण त्रिकोण म्हणून ओळखला जातो. त्यामुळे साहजिकच या ठिकाणांहून ये-जा करणार्‍या प्रवाशांची संख्याही मोठी आहे. एकमेकांपासून साधारणतः तीन ते पाच तासांच्या अंतरावर असलेल्या या शहरांचा प्रवास म्हणजे एखादं छोटंसं पुस्तक वाचण्याची किंवा मोठ्या पुस्तकातील एखादं प्रकरण पूर्ण करण्याची चांगली संधी असते. ही बाब लक्षात घेऊन राज्य शासनाने फिरत्या वाचनालयाची कल्पना सर्वप्रथम या दोन रेल्वेगाड्यांत राबवली, हे उत्तम झाले. मुंबई-पुणे-नाशिक मार्गांवर नियमित प्रवास करणार्‍यांनी आता या प्रवासादरम्यान उपलब्ध झालेल्या मोफत वाचनालयाचा आनंद घ्यायला निश्चितच हरकत नाही.

या गाड्याही पुढे सरकायला हव्यात

येथे प्रारंभी उल्लेखल्याप्रमाणे ’वाचन प्रेरणा दिना’च्या निमित्ताने राज्य शासनाने राबविलेले उपक्रम हे खरोखरच कौतुकास्पद आहेत. वाचनसंस्कृतीच्या संवर्धनासाठी याचा निश्चितच फायदा होणार आहे. विशेष म्हणजे, जसे हे उपक्रम मुंबई-पुणे-नाशिकसारख्या मोठ्या शहरांत राबवले जातात, तसेच ते राज्यभरात इतर ठिकाणीही राबवले जातात. पुस्तकांचं गाव अर्थात भिलार हे याचं उत्तम उदाहरण आहे. यावर्षीही राज्य शासनाने ’वाचन प्रेरणा दिना’ निमित्त राज्यातील विविध ठिकाणी आयोजित केलेल्या मुक्तसंवाद, चर्चा, स्पर्धा, अभिवाचन, इतर सांस्कृतिक कार्यक्रम आदींची रेलचेल आहे. केवळ सरकारी उपक्रम म्हणून न राबवता, एक आगळावेगळा, अभिनव आणि कुणालाही सहभागी होण्याची इच्छा होईल, असा हा उपक्रम आहे. परंतु, प्रत्येक योजना आणि उपक्रमाची परिणामकारकता प्रत्येक प्रदेश, शहर, गावानुसार अर्थातच बदलते. त्यामुळे जशी ‘डेक्कन क्वीन’ किंवा ‘पंचवटी एक्सप्रेस’मध्ये फिरती वाचनालयं झाली, तशी फिरती वाचनालयं खेड्यापाड्यात कशी पोहोचवता येतील, याचाही अधिक निरनिराळ्या दृष्टिकोनांतून विचार होण्याची व तो कृतीत येण्याची गरज आहे. ‘पुस्तकांचं गाव’ असलेल्या भिलार उपक्रमाला चांगला प्रतिसाद मिळाला. आता अशी ‘पुस्तकांची गावं’ प्रत्येक जिल्ह्याजिल्ह्यात उभी राहिली तर भाषा व संस्कृतीच्या विकासात त्यांची नक्कीच मोलाची भर पडेल, यात शंका नाही. मध्यंतरी शासनाने भिलारनंतर कोकणात गणपतीपुळ्याजवळच्या मालगुंडमध्ये दुसरं पुस्तकाचं गाव उभारण्याबाबत सुतोवाच केलं होतं. केशवसुतांच्या जन्मभूमीत नारळ-पोफळीसोबत शब्दसंपदेचंही आगार उभं राहत असेल, तर साहित्यप्रेमींसाठी याहून सुखद आणखी काय असू शकेल? महाराष्ट्रात गावागावात अशी असंख्य ठिकाणं आहेत, जिथे अनेक साहित्यरत्नं जन्मली, भाषा आणि साहित्यात त्यांनी आपलं मोठं योगदान दिलं. या पूर्वसुरींच्या सान्निध्यात शासनाने आणि अर्थातच सर्व साहित्यप्रेमी समाजाने सोबत येऊन काही नवं भरीव करायचं ठरवल्यास ते आणखी मोठी वाचन प्रेरणा निर्माण करणारे ठरू शकेल. फक्त त्यासाठी उपक्रमांच्या या गाड्या मुंबई-पुणे-नाशिक व इतर शहरांच्या पलीकडे जाऊन शेवटच्या वाड्यावस्तीपर्यंत पोहोचायला हव्यात. सध्याची परिस्थिती पाहता, तो दिवस फार दूर नाही, अशी अशा बाळगायला हरकत नक्कीच नसावी.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/