जे.जे.मध्ये मुंबई-कोरिया बिनालेचा अनोखा कलाविष्कार
महा एमटीबी   12-Oct-2018


 

कुठल्याही स्मृतिप्रवण सृजनासाठी दोन घटकांची आवश्यकता असते आणि जेव्हा कला तसेच संस्कृतीचा विषय येतो, तेव्हा तर अधिकच अद्भुत घडते. दक्षिण कोरिया आणि भारत या दोन राष्ट्रांनी कलाविषयक संस्कृतीची देवाणघेवाण करायचे ठरविले आहे. भारताचे प्रतिनिधीत्व महाराष्ट्राच्या राजधानीच्या शहरातील, मुंबापुरीतील विश्वविख्यात सर ज. जी. कला महाविद्यालयाकडे आहे. भारतीय संस्कृतीच्या कला इतिहासातील मानाचं स्थान असलेल्या ‘सर जे. जे. स्कूल ऑफ आर्ट’चे अधिष्ठता प्रा. विश्वनाथ साबळे आणि त्यांचे सहाध्यायी कलाध्यापक वर्ग यांनी या सांस्कृतिक देवाणघेवाणीस पुढाकार घेऊन सक्रिय सहभाग घेतल्यामुळे पहिल्यांदाच अशा प्रकारचा उपक्रम जे.जेच्या आणि महाराष्ट्राच्या कला इतिहासात होत आहे.

 

 
 
 

दक्षिण कोरियाचे सुमारे १२० कलाकार आणि जे.जेमार्फत महाराष्ट्रातील सुमारे ७० कलाकार यांच्या निवडक कलाकृतींचे प्रदर्शन जे.जे स्कूलच्या ऐतिहासिक वास्तूच्या अतिभव्य वास्तूमध्ये आयोजित केले जात आहे. दक्षिण कोरियाच्या ‘के आर्ट फाऊंडेशन’ च्या अध्यक्षा ह्यु सुक या प्रदर्शनाच्या मुख्य संकल्पनाकार आणि क्युरटेर आहेत. ‘मुंबई कोरिया बिनाले’ या शीर्षकाखाली प्रथमच संयुक्त चित्रप्रदर्शनाचं आयोजन करण्यात आलं आहे.

 

 
 
 
 
या संदर्भात अधिष्ठाता विश्वनाथ साबळे यांनी सांगितले की, “जर चांगलं काही करायचं असेल तर चित्रकार, शिल्पकार, उपयोजित कलाकार, गायक, वादक, नर्तक अशा विविध कलाकारांची गरज असतेच. म्हणूनच कलेला मूलभूत गरजांचा दर्जा दिला पाहिजे.” हे सांगतानाच साबळे म्हणाले की, “दृश्यकलेची भाषा सर्व सामान्यांपर्यंत व्यवस्थितपणे पोहोचली पाहिजे. म्हणूनच आम्ही म्हणजे जे. जे. अशा प्रकारचे संयुक्त संस्कृतीच्या वैचारिक देवाणघेवाणी प्रभावीपणे करण्यासाठी असे उपक्रम राबविण्याचे ठरवित आहोत. त्याच उपक्रमांना शुभारंभ म्हणजे ‘मुंबई-कोरिया बिनाले’ होय.” प्रा. विश्वनाथ साबळे आणि त्यांचे सहकारी जेव्हा एकत्रितपणे काम असतात. तेव्हा कौतुकास्पद म्हणण्यापेक्षा अनुकरण करावे असे ते उपक्रम भासतात.
 


या प्रदर्शनात द. कोरियन १२० कलाकारांच्या विविध तंत्र आणि शैलीतील मोठ्या आकारांतील कलाकृती थक्क करणार्‍या आहेत. जलरंगातील एक कलाकृती मंत्रमुग्ध करणारी आहे. रंगरेंडरिंग, रंगातील आभास आणि विषय घटकांच्या मांडणीतील संकलन वैशिष्ट्यपूर्ण आहे. आपले म्हणजे सुमारे ७० भारतीय चित्रकार या प्रदर्शनात सहभागी झालेले आहेत. द. कोरियातील समकालिन चित्रकारांपैकी किम याँग वून, चॉय सनवाँग, ज्यु मियोक, किम ओसुक, किम सुनाय, ली. सनरी हे प्रतिथयश चित्रकार उपस्थित राहणार आहेत, तर महाराष्ट्रातील चित्रकारांमधील दीपक शिंदे, उत्तम पाचरणे, चंद्रकांत चन्ने, किशोर ठाकूर, प्रमोद बाबू रामटेके, आनंद प्रभुदेसाई, पांडुरंग ताठे अशा विविध प्रतिथयश चित्रकारांचा सहभाग यात आहे.

 

 
 

मूर्त-अमूर्त, सेमी फिगरेटीव्ह, स्टायलाईज या शैलीतील चित्रांसह काही त्रिमित संकल्पनाही या प्रदर्शनात प्रदर्शित करण्यात आले आहेत. कलाप्रदर्शनाबरोबरच कलाशिक्षण आणि त्याबरोबर मिळणारा कलाव्यावसायिक अनुभव हाही कला विद्यार्थ्यांना मिळेल, असे प्रा. साबळे सांगितले.

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/