व्यावसायिक क्षेत्रातील कर्तबगार नवदुर्गा...
महा एमटीबी   12-Oct-2018


 


आजकाल सर्वच क्षेत्रांत स्त्रियांचा बोलबाला आहे. पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून प्रत्येक क्षेत्रात स्त्रिया आपले कर्तृत्व गाजवताना दिसतात. इंद्रा नूयी हे असेच एक कर्तबगार व्यक्तिमत्त्व!


नवरात्र हा देवीरूपी स्त्रीशक्तीचा जागर केला जाणारा उत्सव! प्रत्येक स्त्री ही माँ दुर्गेप्रमाणेच आदिशक्ती असते. माँ दुर्गेच्या ठायी असणारी ममता, करुणा, दया, क्षमा-शांती, न्याय, नीतिमत्ता व बुद्धिमत्ता हे गुण आजच्या आधुनिक स्त्रीमध्येही पाहायला मिळतात. आजकाल सर्वच क्षेत्रांत स्त्रियांचा बोलबाला आहे. पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून प्रत्येक क्षेत्रात स्त्रिया आपले कर्तृत्व गाजवताना दिसतात. इंद्रा नूयी हे असेच एक कर्तबगार व्यक्तिमत्त्व! इंद्रा नूयी या मूळच्या भारतीय. मात्र, लग्नानंतर त्या अमेरिकेत स्थायिक झाल्या. आपल्या बुद्धिमत्तेच्या, नेतृत्वगुणाच्या व धडाकेबाज निर्णय घेण्याच्या क्षमतेमुळे त्या आज जगातील सर्वात शक्तिशाली महिलांपैकी एक आहेत. २००६ ते २०१८ अशी सलग १२ वर्ष त्यांनी ‘पेप्सिको’ कंपनीचा कार्यभार सांभाळला. २५ ऑक्टोबर १९५५ रोजी इंद्रा यांचा जन्म चेन्नईतील एका मध्यमवर्गीय कुटुंबात झाला. कोलकातामधून मास्टर्स डिग्री घेतल्यानंतर त्यांनी अमेरिकेतील याले विद्यापीठातून पुढील शिक्षण घेतले. शिक्षण पूर्ण करत असताना स्वत:जवळ पुरेसे पैसे नसल्याने त्यांनी रिसेप्शनिस्ट म्हणूनदेखील काम केले आहे. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्यांनी अनेक कंपन्यांमध्ये कामाचा अनुभव घेतला. मात्र, खरी संधी त्यांना ‘पेप्सिको’मध्ये मिळाली. २००६मध्ये ‘पेप्सिको’चे अध्यक्ष व मुख्य कार्यकारी अधिकारी रेनमुंड यांनी निवृत्ती घेऊन नूयी यांना आपला उत्तराधिकारी नेमले. इंद्रा यांनी सीईओ पदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेतले. त्यांच्या याच धडाकेबाज निर्णयक्षमतेमुळे ‘पेप्सिको’ कंपनी आज जगातील दुसऱ्या क्रमांकाची कंपनी आहे.

 

अमेरिकेसमोरील आर्थिक अडचणींवर उपाय सुचविण्यासाठी नेमण्यात आलेल्या समितीमध्ये इंद्रा नूयी यांचा महत्त्वाचा सहभाग होता. ‘फोर्ब्स’ने केलेल्या सर्वेक्षणात २०१७च्या जगातील शक्तिशाली महिलांमध्ये इंद्रा नूयी यांचे नाव दुसऱ्या क्रमांकावर होते. आंतरराष्ट्रीय क्रिकेट कौन्सिलच्या पहिल्या महिला संचालक म्हणून देखील त्या कार्यरत आहेत. इंद्रा यांच्या कर्तृत्वाची दखल घेत २००७ साली केंद्र सरकारकडून त्यांना ‘पद्मभूषण’ पुरस्काराने गौरविण्यात आले. रिसेप्शनिस्ट ते ‘पेप्सिको’ आणि ‘आयसीसी’च्या संचालकपदापर्यंत इंद्रा नूयी यांनी मारलेली मजल भारतीय महिलांसाठी नक्कीच प्रेरणादायी आहे. इंद्रा नूयी सांगतात की, “आजही मी हृदयातून ‘पेप्सिको’चीच आहे, परंतु ‘पेप्सिको’तून बाहेर पडल्यावर मला कळले की, कामाच्या पलीकडेही जग आहे. काम आणि आपले जीवन यांच्यातील समतोल राखणे हे खूप महत्त्वाचे आहे,” असे मत त्या परखडपणे मांडतात. गेल्या काही वर्षांत कामाच्या व्यापात त्यांच्याकडून वेळेअभावी राहून गेलेल्या अनेक गोष्टी त्यांनी ‘पेप्सिको’ सोडल्यावर केल्या.

 

आजच्या आधुनिक युगात सगळेच सतत धावत असतात. मग ती स्त्री असो वा पुरुष, कामासाठी, पैशासाठी माणसाची ही धावपळ सुरूच असते. अशावेळी आयुष्यात मागे वळून पाहताना बऱ्याच गोष्टी करायच्या आपल्याकडून राहून गेलेल्या असतात. आजकाल पती-पत्नी दोघेही कमावणारे असल्यामुळे तसेच विभक्त कुटुंब पद्धतीमुळे मुलांना कुठे ठेवायचे, हा प्रश्न असतो. अशात मुलांना डे केअर सेंटरमध्ये ठेवल्याने त्यांच्यावर योग्य संस्कार होतीलच, याची शाश्वती देता येत नाही. नातेवाईकही आपापल्या व्यापात असल्याने त्यांच्याकडून अपेक्षाही ठेवता येत नाही. नोकरी करणाऱ्या, आई म्हणून आपल्या मुलांना पुरेसा वेळ देऊ न शकणाऱ्या आजकालच्या सर्वच स्त्रियांपुढे असलेली ही समस्या इंद्रा नूयी यांच्यासमोरही काही वर्षांपूर्वी उद्भवली होती. त्यात इंद्रा परदेशात राहत असल्यामुळे तेथे नातीगोती, एकत्र कुटुंबपद्धतीही अस्तित्वात नव्हती. इंद्रा व त्यांच्या पतीने समन्वयाने मार्ग काढत कशीबशी या समस्येवर मात केली. परंतु, इंद्रा सांगतात की, हा प्रश्न आज नोकरी करणाऱ्या, आपले करिअर घडवू पाहणाऱ्या प्रत्येक स्त्रीच्या पुढे आ वासून उभा आहे. अशावेळी लोप पावत चाललेल्या एकत्र कुटुंबपद्धतीची गरज भासू लागते. कुटुंब एकत्रित बांधून ठेवण्यासाठी कोणीतरी जबाबदारी घेऊन घरी थांबणे गरजेचे असते. आपल्या स्वप्नांना मुरड घालून कुटुंबासाठी आपल्या करिअरवर पाणी सोडणाऱ्या प्रत्येक गृहिणीविषयी इंद्रा यांच्या मनात नितांत आदर आहे. एकत्र कुटुंबपद्धती या भारतीय संस्कृतीतील संकल्पनेची आज अवघ्या जगाला गरज आहे, असे इंद्रा यांना प्रकर्षाने जाणवते. राजकारणाविषयी इंद्रा म्हणतात की, “मी जर राजकारणात उतरले तर जगात दुसरे महायुद्ध होईल. परंतु, हे महायुद्ध शाब्दिक स्वरूपाचे असेल. कारण मी खूपच स्पष्टवक्ती आहे. उगाच एखाद्याला चांगले वाटावे म्हणून मी गोड बोलत नाही. आपण काय बोलतो यावरून आपले व्यक्तिमत्त्व, आपला स्वभाव कळून येतो. त्यामुळे नेहमी विचार करून बोलावे.

 

-साईली भाटकर

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/