‘डियर आजो’ : भावनाप्रधान चटका लावणारी नाट्यकृती
महा एमटीबी   12-Oct-2018
 

‘डियर आजो’- भावनाप्रधान चटका लावणारी नाट्यकृतीत्यामध्ये आजी-आजोबा व नातवंडांचे नाते हे जगावेगळे असते. ते नाते इतके घट्ट असते की, नातवंड जे सांगेल ते आजोबा ऐकतात आणि आजोबा जे सांगतील ते नातवंड ऐकतात. अशा या नातेसंबंधांवर ‘डियर आजो’ या नाटकाची निर्मिती ‘असीम एन्टरटेनमेंट’ आणि ‘थ्री जेन प्रोडक्शन’ या लोकप्रिय नाट्यसंस्थांनी केली असून निर्माते हेमंत आपटे आहेत. सादरकर्ते अजित भुरे आहेत. नाटकाचे लेखन मयुरी देशमुख यांचे असून दिग्दर्शन अजित भुरे यांचे लाभलेले आहे. यामध्ये मयुरी देशमुख आणि संजय मोने यांनी भूमिका साकारलेल्या आहेत. नेपथ्य संदेश बेंद्रे यांचे असून संगीत मिलिंद जोशी यांनी दिलेले आहे.

 

ही कथा आजोबा आणि नातीच्या नातेसंबंधांवर आधारीत आहे. आजोबांची पत्नी ही देवाघरी गेलेली असल्याने एका मोठ्या सोसायटीमध्ये आजोबा एकटेच आपले आयुष्य जगत असतात. त्यांची मुलगी अमेरिकेत असते. ती आपल्या ‘शालू’ नावाच्या मुलीबरोबर अमेरिकेत 16 ते 17 वर्षे राहून शिक्षण घेत असते. एक दिवस अचानक शालूच्या आई-वडिलांचे अपघाती निधन होते आणि त्यामुळे शालू ही एकटीच अमेरिकेत राहून शिकत असते. तरुण आणि सुंदर शालूला अमेरिकेत एकटे ठेवणे, हे तिच्या मावशीला पटत नाही आणि म्हणून तीन वर्षांसाठी शालूने मुंबईत तिच्या आजोबांकडे राहायला जावे असे सांगून शालूला मुंबईमध्ये पाठविण्यात येते. शालूचे बालपण हे अमेरिकेत गेलेले असते. मुंबईमधील वातावरण तिला कितपत झेपेल? ती आजोबांच्या बरोबर कशी राहील? या विषयी मावशीला आणि आजोबांना शंका असते. पण शालूने मुंबईत आजोबांच्या बरोबर राहायलाच हवे असते. शालू आपले सगळे सामान घेऊन मुंबईला येते. आजोबांच्या घरी पोहोचते. दोघेही एकमेकांच्या नात्यातील असले तरी, एकमेकांचे स्वभाव माहीत होईपर्यंत त्यांच्यात वाद-विवाद होत राहतात. असे झाले तरी त्या दोघांना एकमेकांशिवाय पर्याय नसतो. आजोबांची शिस्त असते. शालूचे बालपण अमेरिकेत गेलेले असल्याने तिच्या वागण्यात एक प्रकारचा मोकळेपणा असतो. पण, त्यावर आजोबा नियंत्रण ठेवत असतात. अमेरिकेतील संस्कृती आणि इथली आपली संस्कृती यामध्ये खूप अंतर असते. शालूच्या वागण्या-बोलण्यातून ते आजोबांना जाणवते. शेवटी नेमके काय होते, शालूचे आणि आजोबांचे एकमेकांशी पटते की नाही हे नाटकात कळेल...

 

आजोबा आणि त्यांची नात हे दोघेही एकटेच-एकांतात जीवन जगणारे... त्यांच्या जीवनामधील एकांतामधील एक बाजू आजोबा असते, तर दुसरी बाजू ही नात असते, असे हे एकमेकांना पूरक जीवन जगत असतात. शेवटी त्यांच्या आयुष्यात आनंदाच्या श्रावणसरी बरसतात...आजोबांची मनोवेधक भूमिका संजय मोने यांनी साकारली आहे. आजोबांचे सुखदुःखाचे प्रसंग त्यांनी कमालीचे रंगविले आहेत. आपल्या नातींवर त्यांचे अतोनात प्रेम आहे. ते त्यांच्या शिस्तबद्ध वागणुकीमधून दिसून येते. बायकोची आठवण झाली की, ते हळवे होतात. संजय मोने यांनी आजोबांच्या भूमिकेमधील सर्वच छटा उत्तम सादर केल्या आहेत. शालूची भूमिका मयुरी देशमुख हिने केली असून तिचे अमेरिकेतील वास्तव्य आणि मुंबईत आजोबांना भेटल्यावर त्यांच्यातील सुरुवातीचा संवाद आणि त्यानंतर तिच्यात होत गेलेला बदल तिने अत्यंत सफाईदारपणे सादर केला आहे. मुंबईत आजोबांकडे आल्यावर आईची होणारी आठवण आणि नंतर प्रेमळ आजोबांचे लाभलेलं प्रेम या दोन्ही भावना तिने अप्रतिमपणे व्यक्त केल्या आहेत. अमेरिकेत शिकलेली मुलगी, मराठी कसे बोलेल इत्यादी तिने छान सादर केले आहे. दिग्दर्शक अजित भुरे यांनी नाटक अत्यंत बंदिस्तपणे सादर केले आहे. नाटकाचे नेपथ्य संदेश बेंद्रे यांचे असून ते नाटकाला पूरक असे असून मिलिंद जोशी यांचे संगीत नाटकांची उंची वाढवते. हे नाटक भावनाप्रधान असून दोन पिढीमधील नाते संबंधांवर भाष्य करते.

- दिनानाथ घारपुरे  

   माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/