केडीएमटीचा प्रवास महागला
महा एमटीबी   11-Oct-2018डोंबिवली: पेट्रोल, डिझेलच्या दरवाढीमुळे सर्वसामान्यांचे कंबरडे मोडले असताना आता केडीएमटीचाही प्रवास महागला आहे. त्यामुळे कल्याण-डोंबिवलीतील नागरिकांना याचा फटका बसणार आहे. गुरुवारी पार पडलेल्या परिवहन सभेत या संदर्भात दाखल झालेल्या प्रवासी भाडेदरवाढीच्या प्रस्तावाला मंजुरी मिळाली. त्यामुळे यापुढे प्रवाशांना केडीएमटीचा प्रवास करताना जादा पैसे मोजावे लागणार आहेत. इंधन दरवाढीचा फटका केडीएमटीलाही बसत असल्याने प्रशासनाकडून प्रवासी तिकीट दरात सुसूत्रता आणण्यासाठीचा हा प्रस्ताव पटलावर दाखल करण्यात आला. यावेळी सर्वपक्षीय सदस्यांकडून प्रशासनाकडे नमूद केलेल्या दरानुसार वाढीव दराची मागणी करण्यात आली.

 

मात्र, शासनाच्या चौकटीत राहून हे दर वाढवले असल्याचे स्पष्टीकरण पालिका प्रशासनाकडून देण्यात आले. याआधी केडीएमटीने २ वर्षांपूर्वी भाडेवाढ केली होती. त्यावेळी असलेल्या डिझेलच्या दरानुसार ही भाडेवाढ करण्यात आली होती, असे परिवहन विभागाच्या सभेत नमूद करण्यात आले. मात्र त्यानंतरही केडीएमटीची दरवाढ ही सातत्याने होत असल्याचे सभासदांनी निदर्शनास आणून दिले. सद्यस्थितीला परिवहन विभागाचा केडीएमटीचा दैनंदिन उत्पन्नाच्या ६७ टक्के इतका खर्च डिझेलवर होत आहे.

 

दरम्यान प्रशासनाने इंधनवाढ झाल्यामुळे ही भाडेवाढ आवश्यक असल्याचे नमूद करण्यात आले. त्याप्रमाणे सुमारे ४ टक्क्यांनी भाडेवाढ करण्यात आली आहे. सर्वसाधारण प्रवासी तिकीट भाडेदर कमीत कमी रुपये सहा आकारण्यात येईल. ५० किमीच्या पुढे ४ किमी अंतरासाठी किंवा त्याच्या अंश भागास सर्वसाधारण बससेवेसाठी रुपये पाचने वाढीव भाडे आकारण्यात येईल तर, वातानुकूलित बससेवेकरिता प्रवासी पास सवलती व्यतिरिक्त कोणतीही सवलत राहणार नाही. या प्रशासनाच्या प्रस्तावास सर्वपक्षीय सदस्यांनी मान्यता दिली असून नवीन छापण्यात येणार्या तिकिटांचा रंग बदलण्यात येण्याच्या सूचनाही यावेळी करण्यात आल्या.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/