परप्रांतीयांचे राजकारण!
महा एमटीबी   11-Oct-2018

 
 
 
सार्वत्रिक निवडणुकी खरोखरीच जवळ आल्या आहेत बहुतेक! कारण त्या जिंकण्यासाठीची धडपड अगदीच नीच पातळीवर जाऊन करण्याचे राजकारण, सत्तेसाठी हपापलेल्या काही ना-लायकांकडून एव्हाना सुरूदेखील झाले आहे. अशा प्रसंगात जातपात, धर्म, भाषा, प्रांतभेदाला फार महत्त्व असते त्यांच्या लेखी. त्याला खतपाणी घातले की, उफाळून येणार्या भावनांच्या उद्रेकाचा मतांसाठी चांगलाच उपयोग होतो, हे कॉंग्रेस नेत्यांना आजवरच्या अनुभवातून ठाऊक झाले आहे केव्हाचेच. गुजरातेत त्यांच्या चेल्याचपाट्यांनी हाच उद्योग चालवलाय् सध्या. कोण अल्पेश ठाकोर का काय नाव असलेला कॉंग्रेसचा एक आमदार, सध्या प्रांतभेदावरून वाद निर्माण करण्याच्या ईर्ष्येने जणू पेटून उठला आहे. कालपरवा केव्हातरी महाराष्ट्रात मुंबईच्या दिशेने निघालेल्या उत्तरप्रदेश-बिहारवासीयांना तिथून घालवण्याचा प्रकार घडला, तर केवढा गहजब केला लोकांनी! म्हणाले, ही काय राजकारणाची तर्हा झाली? मुंबई काय एकट्या महाराष्ट्राची आहे, की ती कुणाच्या बापजाद्यांची आहे, इथवर त्या प्रश्नांची मजल गेली होती.
 
 
 
 
स्वत: जातिपातीचे राजकारण करूनही इतरांवर जातीयवादाचा ठपका ठेवण्यात अन् स्वत: प्रांत-भाषा भेदाचे राजकारण करूनही राष्ट्रीय एकात्मतेचे आपण कसे एकमेव तारणहार ठेकेदार आहोत, हे दर्शविण्यात कायम अग्रणी राहिलेला कॉंग्रेस पक्ष त्यात आघाडीवर होता, हे वेगळ्याने सांगणे न लगे! तर सांगायचा मुद्दा असा की, सध्या त्याच कॉंग्रेसच्या एका दीडशहाण्या आमदाराने आता गुजरातेत त्याच नाटकाचा प्रयोग साकारण्याचा राजकीय डाव आखला आहे. त्याचे नाव जाहीर होईपर्यंत सारे लोक या प्रांतातली परिस्थिती परप्रांतीयांसाठी कशी घातक होत चालली आहे, याचे चित्र रंगवण्यात मशगूल होते, पण संशयाची सुई कॉंग्रेसच्या दिशेने वळली आणि सर्वांच्याच आरोपाची तर्हा बदलली. स्थानिक सत्ताधार्यांना जबाबदार धरण्याच्या, त्यांना अडचणीत आणण्याच्या इराद्याने खरंतर हे षडयंत्र रचलं गेलेलं. पण, अल्पेश ठाकोर यांचं नाव उघड झालं अन् कॉंग्रेसचं पितळही! आता या षडयंत्राशी आपला कुठलाही संबंध नसल्याचे सांगण्यात त्यांची शक्ती खर्ची पडतेय्. उद्या या पक्षाने अल्पेशशी काडीमोड घेतला तरी कुणी आश्चर्य वाटून घेण्याचे कारण नाही. हो! कोळसा घोटाळा करणार्या मंत्र्यांशी, कॉमनवेल्थ गेम्सच्या निमित्ताने कोट्यवधींची खाबुगिरी केली म्हणून कारागृहात जावे लागलेल्या कडमाडींशी तरी कुठे संबंध होता बरं कॉंग्रेसचा?
 
 
 
 
घोटाळे करून नामानिराळे राहण्याचा पुरेसा सराव आहे त्या पक्षाला अन् त्याच्या नेत्यांनाही! तर, तेव्हासारखेच आताही अल्पेशबाबतही कानावर हात ठेवताहेत त्या पक्षाचे नेते. हे आमदार महोदय म्होरके असलेल्या क्षत्रिय ठाकोर सेनेच्या काही सदस्यांनी या राज्यातील परप्रांतीयांना धमकावल्याची क्लिप व्हायरल झाल्यानंतर यामागील षडयंत्र उघड झाले आहे. त्यामुळे कुणी या प्रकरणातून आपला सहभाग दवडण्याचा प्रयत्न करूनही उपयोग नाही आता. शिवाय, गेल्या काही दिवसांत इथे विनाकारण जे राजकारण तापले, हा प्रदेश सोडून इतरत्र निघून जाण्याकरता रेल्वेस्थानकापासून तर बसस्थानकांपर्यंत लोकांच्या ज्या रांगा लागल्या, अकारण जे भीतीचे वातावरण तयार झाले, दहशत निर्माण झाली, त्यासाठी कुणाला जबाबदार धरायचे? जिवाच्या भीतीने लोक हे राज्य सोडून निघाले असल्याचे बघून जगभरात गुजरातची प्रतिमा डागाळली, त्याच्या इभ्रतीचे वाभाडे निघाले, त्यासाठी कुणाला दोष द्यायचा? एका मुलीवरील बलात्काराच्या घटनेवरून म्हणे हे प्रकरण तापत गेले.
 
 
 
 
एका बिहारी मजुराने ते कुकृत्य केल्याची बाब स्पष्ट झाल्यानंतर, एकूणच बिहारी व उत्तरप्रदेशी नागरिकांना तो परिसर नव्हे, तर थेट राज्यच सोडून जाण्याची धमकी अल्पेश आणि त्यांच्या काही सहकार्यांनी दिल्याचा आरोप आहे. आरोप कसला, धडधडीत दिसताहे ही चांडाळचौकडी व्हिडीओमध्ये लोकांना धमकावताना. धमकावण्याची कारणेही तीच, चावून चावून चोथा झालेली. बाहेरून आलेल्यांमुळे सुरक्षा धोक्यात आल्याची, स्थानिकांच्या रोजगारावर गदा आल्याची... काल धिंगाणा घालून मोकळे झाले आणि आणि आता परिणाम समोर दिसू लागले, तर बरे तोंडं लपवत फिरताहेत शहाणे. काय दशा आहे बघा या देशाची स्वातंत्र्याच्या सात दशकांनंतरही! कुणाला या देशात राहायची इच्छा नाही, तर कुणाला शेजार्याचे अस्तित्वही सहन होत नाही. प्रत्येकाला बाहेरून कुणी आलं की, तो आपल्या अधिकारांवर आक्रमण करणार असल्याचे वाटून जाते. कारण मुळातच कुणी दुसर्याला ‘आपलं’ मानत नाही. कारण लोकांमध्ये जाती-धर्मापासून तर भाषा-प्रदेशाच्या भिंती उभ्या करण्यात आल्याहेत वर्षानुवर्षं. राजकीय स्वार्थासाठी त्याला खतपाणी घालण्याचंच काम झालं. त्यातून भाषक आणि प्रादेशिक अस्मिता तेवढ्या जाग्या झाल्या. देश मात्र मागे टाकला सगळ्यांनीच- बिनदिक्कतपणे. राष्ट्र सर्वोपरी मानणारे लोक खुजे ठरवण्याचे कारस्थान, ही असली षडयंत्रं रचणार्यांनी केले. त्या वेळी राज ठाकरेंच्या मनसैनिकांनी उत्तरप्रदेश, बिहारी युवकांविरुद्ध उघडलेल्या मोहिमेचे समर्थन कुणीच केले नाही.
 
 
 
 
अगदी मराठीवरील प्रेम शाबूत ठेवूनही महाराष्ट्रातील जनतेने राज यांचे ‘ते’ कृत्य गैर ठरवले. मग आज अल्पेश ठाकोर अन् त्यांच्या चार-दोन शागिर्दांनी चालवलेल्या कृत्याचे, त्यांनी माजवलेल्या गोंधळाचे, त्यांच्या चिथावणीखोर भाषेमुळे उफाळलेल्या हिंसाचाराचे तरी समर्थन कसे करायचे? बरं, हेच ठाकोर साहेब कॉंग्रेस पक्षाचे बिहारचे प्रभारीही आहेत. त्यामुळे, गुजरातेत स्थानिकांच्या भावभावनांचा खेळ या प्रकरणावरील राजकारणातून मांडता येत असला, तरी तिकडे बिहारमध्ये आपण अडचणीत येऊ, ही गोष्ट ध्यानात आल्यावर या महाशयांनी घूमजाव केले आहे. बिहारी लोकांना आपण कसे घालवू शकतो, असा त्यांचा सवाल आहे. राष्ट्रीय एकात्मतेसंदर्भात त्यांना उशिरा झालेली उपरतीही अजीबात अनाकलनीय नाहीय्. हो! असले यू-टर्न घेण्याची सवयच असते ना राजकारण्यांना! मग आधीच्या व्हिडीओ क्लिपद्वारे त्यांनी घातलेल्या धिंगाण्याचे काय, हा प्रश्न तर बाकी राहतोच. अर्थात, तो त्यांना सतावलाच पाहिजे असे कुठे आहे? पण, जनतेने मात्र तो पुरता ध्यानात ठेवला पाहिजे अन् वेळ आली की अद्दलही घडवली पाहिजे असल्या दीडदमडीच्या नेत्यांना! कारण, परवा जो उच्छाद त्यांनी मांडला तोच मुळात त्यांच्या स्वभावाचा भाग आहे. नंतरची उपरती ही तर त्यांच्या राजकारणाची अपरिहार्यता आहे. फक्त, उद्या सर्वांनाच शेजारच्या राज्यातले लोक ‘परके’ वाटू लागले, प्रत्येकच प्रांतातले लोक ‘परकीयांना’ आपल्या येथून घालवू लागले, तर या देशाचं कसं व्हायचं, हा प्रश्न लाखमोलाचा आहे. नेमका तोच कुणाला सतावत नाही इथे, ही खरी शोकांतिका आहे...