तितली चक्रीवादळाचा तडाखा; ८ जणांचा मृत्यू
महा एमटीबी   11-Oct-2018३ लाख नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आले


भुवनेश्वर : ओडिशा आणि आंध्रप्रदेशमध्ये तितली चक्रीवादळ दाखल झाले आहे. बंगालच्या उपसागरात उच्च दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने हे चक्रीवादळ आज सकाळी ओडिशातील गोपालपूर जवळील किनारपट्टीवर धडकले. यामुळे दोन्ही राज्यातील जनजीवन विस्कळीत झाले असून किनारी भागात वेगवान वाऱ्यांसह जोरदार पाऊस सुरू आहे. तर दोन्ही राज्यामध्ये अनेक ठिकाणी भूस्खलन झाल्याची देखील माहिती मिळत आहे. तितलीच्या या प्रचंड तडाख्याने आतापर्यंत ८ जणांचा मृत्यू झाला आहे. तर शेकडो नागरिक जखमी झाले आहेत.

 

अतिगंभीर श्रेणीतील असलेले हे चक्रीवादळ आज सकाळी गोपालपूर आणि श्रीकाकुलमच्या किनाऱ्यावर १५० किलोमीटर ताशी वेगाने धडकले. यामुळे अनेक ठिकाणी भूस्खलन झाले असून अनेक ठिकाणी झाडे उन्मळून पडली आहेत. तर अनेक ठिकाणी वीजेचे खांब कोसळले आहेत. भारतीय हवामान खात्याने याबाबत दोन दिवसापूर्वीच इशारा दिल्याने सुरक्षेचा उपाय म्हणून किनारपट्टी भागातील जवळजवळ ३ लाख नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आले आहे.

 

भारतीय हवामान खात्याने या वादळाबाबत १८ जिल्ह्यांत रेड अलर्ट दिला आहे. या पार्श्वभूमीवर ओडिशा सरकारने राज्यातील सर्व शाळा, कॉलेजला ११ आणि १२ ऑक्टोबरला सुट्टी दिली. तर राज्यात होणाऱ्या रेल्वे भरतीची परीक्षा रद्द करण्यात आल्याची माहिती राज्याचे मुख्य सचिव आदित्य प्रसाद पाधी यांनी दिली. दरम्यान, एनडीआरएफ आणि ओडीआरएएफची पथके ३०० इंजीनयुक्त नौकासह ओडिशा आणि आंध्र प्रदेशमध्ये तैनात आहेत.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/