दर्शनमहात्म्य
महा एमटीबी   11-Oct-2018
 
 
 
सुप्रसिद्ध चित्रपट अभिनेते श्री. गिरीश कुलकर्णी मागे जनकल्याण रक्तपेढीच्या एका कार्यक्रमात आले होते. ’नियमित रक्तदात्यांचा मेळावा’ असे या कार्यक्रमाचे स्वरूप होते. कार्यक्रमाच्या पूर्वी गिरीश कुलकर्णी यांनी रक्तपेढीच्या प्रयोगशाळेला भेट दिली आणि नंतर ते या कार्यक्रमात सहभागी झाले. या प्रसंगी अगदी मोजक्या वेळात त्यांनी खूपच छान विषय मांडला. त्यांचे एक वाक्य तर विशेष लक्षात राहिलेले आहे. ते म्हणाले, ’एक चित्रपट अभिनेता म्हणून मला नवनवीन विश्वे पहायला मनापासून आवडतात, म्हणूनच आजही रक्तपेढीचे एक पूर्णत: नवे आणि समृद्ध विश्व पहायला मिळाले याचा मला आनंद आहे.’ गिरीश कुलकर्णी यांच्या या वाक्याने सर्वच उपस्थितांना विचार करायला भाग पाडले. मला तर त्या वेळी असेही वाटुन गेले की, नवनवीन विश्वांचे दर्शन घेण्याची आवड असणे हे चित्रपट अभिनेता म्हणून गिरीश कुलकर्णी यांच्यातील कलावंताची प्रगल्भता दर्शविते, हे तर खरेच ; पण दुसऱ्या बाजुला नवनवीन विश्वे पाहण्याचे कुतुहल असण्यासाठी ’चित्रपट अभिनेता’च कशाला व्हायला हवे ? एक सामान्य मनुष्य म्हणूनही हे कुतुहल जपले आणि जोपासले जाऊ शकतेच की. परंतु आपल्यापैकी कितीजण आपल्या कोशाच्या बाहेर पडुन खरोखरीच केवळ कुतुहल म्हणून नव्या विश्वांचे दर्शन घेतात ? आपल्या ’स्व’च्या विश्वातून जरासे बाजुला येऊन समाजामध्ये चाललेल्या अगणित विधायक कामांच्या दुसऱ्या विश्वाचे केवळ दर्शनदेखील एखाद्याच्या जीवनात सकारात्मकता भरु शकते अथवा जीवनाला चांगली दिशाही देऊ शकते. म्हणूनच सेवाप्रकल्प चालवत असताना आपले क्षितिज विस्तारण्यासाठी आपण अन्य विश्वांचे दर्शन घेणे आणि येथील कार्याचे दर्शनही समाजाला होईल यासाठी प्रयत्नरत रहाणे हा जनकल्याण रक्तपेढीचा स्वभाव बनुन गेला आहे.
 
रक्तपेढीच्या बहुतेक सर्वच अधिकारी आणि डॉक्टरांच्या तोंडी एक वाक्य बऱ्याच जणांनी ऐकले असेल. ते वाक्य, ’एकदा रक्तपेढी पाहण्यासाठी अवश्य या’ हे आहे. रक्तपेढीमध्ये रक्तदान करण्यासाठी येणे वेगळे आणि रक्तपेढी पहाण्यासाठी येणे वेगळे. म्हणजे किमान जनकल्याण रक्तपेढी तरी या दोन गोष्टींना वेगळे ठेवते. (या दोन्ही गोष्टी एकाच भेटीत होऊ शकतात, हा भाग वेगळा) लोकांना रक्तपेढी पहायला बोलावण्याचा हा परिपाठही गेली अनेक वर्षे रक्तपेढीने जोपासला आहे आणि आजवर अनेक व्यक्तींनी आणि समुहांनी ’आज खूप नवीन गोष्टी समजल्या’ अशा प्रकारच्या प्रतिक्रिया देत या परिपाठाची उपयोगिताही सिद्ध केली आहे. असे उपक्रम सातत्याने राबविण्यामागे रक्तपेढीच्या अनोख्या विश्वाची ओळख लोकांना करुन देणे व या निमित्ताने स्वेच्छा रक्तदान चळवळीला गती देणे हाच रक्तपेढीचा प्रधान हेतु असला तरी अशा भेटींमुळे रक्तपेढीच्या सुहृदांमध्येही लक्षणीय भर पडली आहे, हेही तितकेच खरे. २०१३ साली मध्ये स्वामी विवेकानंद यांच्या १५० व्या जयंतीनिमित्त रक्तपेढीने विविध उपक्रम राबविले होते. त्यात ’आपली रक्तपेढी’ या नावाचा एक अभिनव उपक्रमही होता. त्याअंतर्गत दर महिन्यातून एकदा एखाद्या विशिष्ट क्षेत्राशी संबंधित काही निवडक मान्यवरांना रक्तपेढीत चहापानासाठी निमंत्रित करणे आणि रक्तपेढीची ओळख करुन देणे असा एक तास-दीडतासाचा कार्यक्रम असे. या उपक्रमामधून सी.ए., उद्योजक, सामाजिक कार्यकर्ते, देवस्थानांचे प्रतिनिधी, शिक्षणसंस्थांचे पदाधिकारी असे विविध क्षेत्रांतील मान्यवर रक्तपेढीशी जोडले गेले. मला आठवते, याच कार्यक्रमाचे निमंत्रण देण्यासाठी मी ’मुक्तांगण पुनर्वसन केंद्रात’ मुक्ताताई पुणतांबेकरांना भेटायला गेलो होतो. या निमित्ताने मलाही ’मुक्तांगण’चे दर्शन घेता आले. मुक्ताताईंना तर ’रक्तपेढी पहायला जाण्याची कल्पना’ बेहद्द आवडली. इतकी की, त्या भेटीनंतर हा कार्यक्रम संपन्न होण्यापूर्वी त्यांनी मला फ़ोन करुन विचारलं, ’अनायासे हा योग येतोच आहे तर मी माझ्या मुलांना सोबत घेऊन येऊ का ? त्यांच्याही ज्ञानात या निमित्ताने भर पडेल.’ मी अर्थातच आनंदाने होकार दिला आणि खरोखरीच ठरलेल्या दिवशी मुक्ताताई आपल्यासोबत मुलांना आणि मुलांच्या बाबांनाही घेऊन आल्या. या सर्वांसह त्यांनी उत्सुकतेने रक्तपेढीच्या प्रयोगशाळांची माहिती घेतली. अर्थात या छोट्याशा उपक्रमामुळे ’मुक्तांगण’ आणि ’जनकल्याण’चे सख्य जुळुन आले. ’मुक्तांगण’मध्येही पुढे रक्तदान-शिबिरे घेतली गेली आणि पुढे रक्तपेढीच्याच एका कार्यक्रमासाठी स्वत: ’बाबा’ म्हणजेच अनिल अवचटही रक्तपेढीमध्ये येऊन गेले. मुक्तांगण आणि जनकल्याण रक्तपेढी या दोहोंनाही परस्परांच्या विश्वांची ओळख झाली. अशी असंख्य उदाहरणे सांगता येतील.
 
केवळ रक्तसंकलन करणे आणि ते वितरित करणे इतकेच आपले काम आहे, असे जनकल्याण रक्तपेढीने तरी कधीच मानले नाही. उलट हजारो रक्तदाते आणि शिबिरसंयोजक, देणगीदार, हितचिंतक यांच्याशी सहजपणे येत असलेला सहज संबंध ही रक्तपेढीने सकारात्मक विचारांच्या आदान-प्रदानाची संधी मानली आणि म्हणूनच रक्तदानासोबत ’रक्तपेढी पहायलासुद्धा या’ हा आग्रह इथे होताना दिसतो. कधी कधी आम्ही गमतीने असंही म्हणतो की, ’इथे यायचं म्हणजे रक्तदान केलंच पाहिजे अशी अट नाही, नुसते आलात तरी कॉफ़ी आणि बिस्किटे मिळतील.’ रक्तपेढीच्या या कायमस्वरुपी निमंत्रणाचा आजवर अनेकांनी मान राखला आहे. यात शाळा, महाविद्यालये, गणेश-मंडळे, सोसायट्या, ज्येष्ठ नागरिक संघ, विविध सामाजिक संघटना असे कितीतरी समूह रक्तपेढीस भेट देऊन गेले आहेत. रक्तपेढीच्या अधिकाऱ्यांनीदेखील ’आलेल्यांना रक्तपेढी दाखविणे’ हा आपल्या अजेंड्यावरचा विषय मानलेला आहे. यासंबंधी निश्चित रचना लावली गेली आहे. येणाऱ्या समुहाच्या अथवा व्यक्तीच्या शैक्षणिक, सामाजिक पार्श्वभूमीला अनुसरुन वेगवेगळी सादरीकरणे तयार केली गेलेली आहेत व ती कोणी सादर केली पाहिजेत याबद्दलचेही निकष ठरलेले आहेत. त्यामुळे ’एकदा रक्तपेढी पहायला या’ असे म्हणण्यात वर-वरची औपचारिकता कधीच नसते. त्यात आंतरिक जिव्हाळ्याबरोबरच ’रक्तपेढी पाहणे आणि समजावून घेणे हाही महत्वाचा विषय आहे’ असा आग्रहदेखील असतो. त्यामुळेच या विषयाबाबत कुतूहल असणाऱ्यांचे, अभ्यासकांचे रक्तपेढीने कायमच स्वागत केले आहे. एकदा एक आजोबा रक्तपेढीमध्ये चालणाऱ्या पॅथॉलॉजी लॅबमध्ये काही तपासण्या करण्यासाठी आले होते. त्यांचा ज्येष्ठ नागरिकांचा म्हणून एक समूह होता. बोलता बोलता ते म्हणाले, ’आम्हाला सर्वांना रक्तपेढी आतून पहायला आवडेल, पण आमच्यासारख्यांची येण्या-जाण्याची जरा अडचण होते.’ त्यांनी असे म्हणताच पुढची सूत्रे हलली आणि त्याच महिन्यामध्ये ’रक्तदान-शिबिर’ नसलेल्या एका दिवशी रक्तपेढीने आपली बस त्यांच्या दारात नेऊन उभी केली. सर्व ज्येष्ठ नागरिक त्यात बसून रक्तपेढीत आले आणि रक्तपेढी पाहून झाल्यावर त्या सर्वांना त्यांच्या परिसरात पुन्हा पोहोचवलं गेलं. थोडक्यात केवळ ’रक्तपेढी दाखविणे’ या उपक्रमासाठीही रक्तपेढीमार्फ़त जे जे शक्य ते ते सर्व केले जाते. दुसऱ्या बाजुला जिथे कुठे म्हणून चांगली कामे चालली आहेत, ती प्रत्यक्ष जाऊन पाहण्याचा आमचाही प्रयत्न असतो. सकारात्मक विचार घेऊन चालणाऱ्या संस्था आणि व्यक्ती जितक्या एकत्रितपणे काम करतील तितकाच विधायकतेचा समाजावरील प्रभाव हा वाढत राहणार आहे. जनकल्याण रक्तपेढीसारख्या संस्थांच्या कार्याचा खरा उद्देश्य हाच तर आहे. असे एकत्रितपणे काम करण्यातील पहिला टप्पा ’दर्शन’ हा आहे, याची जाणिव रक्तपेढी नेतृत्वाने कायम ठेवली आणि म्हणूनच असे उपक्रम रक्तपेढीच्या कामाचाच भाग म्हणून आखले आणि पार पाडले गेले आणि अर्थात यापुढेही हा क्रम चालु राहीलच.
 
दर्शन हा शब्दच सकारात्मक आहे. त्यात तन आणि मन या दोहोंची गुंतवणूक आहे. मन दुसरीकडेच कुठेतरी गुंतलेले आणि तन ’हो’ ला ’हो’ करतंय, अशा भेटीला ’दर्शन’ नाही म्हणता येत. (सामान्यत: राजकीय पुढाऱ्यांच्या भेटी अशा असतात – अर्थात काही सन्माननीय अपवाद सोडुन) रक्तपेढीसारखा प्रकल्प दाखवताना किंवा अन्य कुठलाही सेवाप्रकल्प पाहताना अभिप्रेत आहे ते दर्शन ! नुसते दाखविणे किंवा बघणे नव्हे. ज्या भावनेने आणि विचाराने कार्य चाललेले आहे, त्या भावना आणि विचारांसहित हे कार्य सर्वांना दिसणे म्हणजेच दर्शन. असे दर्शनच संवेदनेला आवाहन करु शकते.
 
सिद्धार्थाला बुद्ध बनविण्याची ताकद अशा एखाद्या दर्शनात असु शकते. दर्शन महत्वाचे आहे, ते यामुळेच !
 
 
- महेंद्र वाघ