विद्याव्रती शिक्षण संचालक - वि. वि. चिपळूणकर
महा एमटीबी   11-Oct-2018
 
 
 
महाराष्ट्र राज्याच्या शैक्षणिक इतिहासात महाराष्ट्र राज्याचे माजी शिक्षण संचालक, शिक्षणतज्ज्ञ आदरणीय वि. वि. चिपळूणकरांच्या गौरवपूर्ण शैक्षणिक योगदानाची सुवर्णाक्षरात नोंद व्हायला हवी. त्यांच्या प्रेरक संजीवक विचारांनी माझ्यासारख्या असंख्य शिक्षकांना घडवलं, समृद्ध केलं, शिक्षकी पेशातील अनिर्वचनीय आनंदाचा अनुभव घ्यायला शिकवलं.
 
१९७६ ते १९८६ हे दशक महाराष्ट्राच्या शिक्षण क्षेत्राचा संस्मरणीय असा सुवर्णकाळ ठरला. आदरणीय वि. वि. चिपळूणकरांसारखे प्रज्ञावान, द्रष्टे, ऋषीतुल्य शिक्षण संचालक महाराष्ट्राला लाभले. त्यांच्या प्रेरक संजीवक विचारांनी शिक्षणक्षेत्रात क्रांती केली. साऱ्या महाराष्ट्रात नवचैतन्य पसरलं. धडपड व्यासपीठ, संपर्काधिष्ठित गुणवत्ता विकास, शाळासमूह योजना, गीतमंच, सावित्रीबाई फुले दत्तक पालक योजना, दहा पाने वाचा- एक पान लिहा, बोलक्या भिंती, वेचुनी आणले मी अमृतकण अशा त्यांच्या विविध योजना कार्यान्वित करताना आम्ही सर्व मुख्याध्यापक, शिक्षक अक्षरशः झपाटून गेलो होतो. एकेकाच्या मनात नवनवीन विचारांची बीजं रुजून त्याला धूमारे फुटत होते.
 
शिक्षकांच्या मेळाव्यात मार्गदर्शन करताना चिपळूणकर सर बोलायला लागले की, आम्ही सारे मंत्रमुग्ध होऊन त्यांचे विचार मनात साठवत राहायचो. त्यांचे व्याख्यान म्हणजे सद्विचारांचा पाऊसच ! पण ती भीज पावसाची संततधार असायची जमिनीत मुरुन वनस्पतींना जीवनदान देणारी ! त्यांचे विचार आम्हाला रुचत त्यामुळेच ते मनात रुजत आणि कृतीरुपाने अंकुरित होत असत. त्यांच्या शब्दांना मंत्राचं सामर्थ्य प्राप्त झालं होतं. विद्यार्थी आणि शिक्षण यांचा सर्वांगानं विकास करणं हाच त्यांचा ध्यास होता. तोच त्यांचा श्वास होता. तो ध्यास त्यांच्या व्याख्यानातून शब्दाशब्दातून जाणवायचा...
 
शिक्षकांनी उत्कृष्टाकडे वाटचाल करावी यासाठी त्यांच्याकडे ठोस भरीव कार्यक्रम होता. भान ठेवून योजना आखायच्या आणि बेभान होऊन त्या कार्यान्वित करायच्या अशी त्यांच्या कामाची पद्धत होती.
 
त्यांनी शाळेसाठी प्रतवारी आणि शिक्षकांसाठी आचारसंहिता तयार केली. प्रत्येक शिक्षक स्वतःला ही कसोटी लावून बघत होता. चांगला- अधिक चांगला शिक्षक होण्याचा प्रयत्न करत होता. चिपळूणकर सर म्हणायचे, "शाळा सुटल्यावरही ज्याची पावलं शाळेत घुटमळतात आणि ज्याच्या पावलाभोवती १०-२० चिमुकली पावलं घोटाळत राहतात तोच खरा शिक्षक ! शिक्षण म्हणजे दळणवळण नव्हे !" असे त्यांचे सुविचार शिक्षकांची मने घडवीत होते. त्यांची व्याख्यानं ऐकताना वाटायचं जणू आपण ज्ञानवृक्षाच्या छायेत बसलो आहेत अन् वरुन टपटप ज्ञानफुलं पडताहेत. ती पटपट वेचताना ओंजळ भरुन वाहायची त्यांचा रंग, रुप, गुण, गंध मनात साठवत परत परत आठवत बसण्याचा छंदच लागायचा अन् मग त्यांचेच शब्द आम्हाला जागे करत. "श्रुती, स्मृती आणि कृती ही आपली शैक्षणिक विचारतत्वे आहेत. विद्यार्थ्यांनी आणि शिक्षकांनी सुद्धा ऐकून स्मरणात ठेवलेल्या गोष्टी आचरणात आणल्याशिवाय शिक्षणक्षेत्रातील मरगळ दूर होणार नाही. त्यांच्या प्रोत्साहनामुळे त्यांनी सांगितलेल्या सर्व योजना कार्यान्वित करण्यासाठी चढाओढ सुरु व्हायची. आपली शाळा "ग्रीनस्पॉट" ठरावी यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न व्हायचे.
 
चिपळूणकर सरांच्या व्याख्यानाचं वैशिष्ट्य म्हणजे ते आपल्या वाणीचा प्रवाह आषाढातल्या सरीसारखा न ठेवता, श्रावणातल्या उघडझापीप्रमाणे ऐकणाऱ्या व्यक्तीच्या चेहऱ्यावरील अविर्भाव लक्षात ठेवून बोलायचे. म्हणायचे "मित्रांनो आपल्या विद्यार्थ्यांना त्यांच्या गुणदोषांसह स्वीकारा. टीका, निंदा करणारे अनेक असतात, कौतुक करणारे थोडेच. या थोड्यात तुमचं नाव येऊ दे". आमचं माहित नाही पण त्यांचं नाव, त्यांचं काम मात्र आम्हा शिक्षकांच्या मनात कायमचं कोरलं गेलं.
 
शैक्षणिक पुनरुत्थापनाच्या कार्याला नवी दिशा देण्यासाठी त्यांनी शिक्षक, पालक, शिक्षणतज्ज्ञ सर्वांना आंतरिक जिव्हाळ्यानं तळमळीनं आवाहन केलं. विशेषतः विद्यार्थी सतत ज्यांच्या निकटच्या सानिध्यात असतात, अशा शिक्षकांना ते म्हणायचे, "नोकर म्हणून नव्हे तर विद्यार्थ्यांचे पालक म्हणून त्यांना अध्ययनाची प्रेरणा, दृष्टी, क्षमता असणारे अध्यापक म्हणून त्यांच्या संस्कारक्षम वयात तुम्हाला त्यांच्यात जीवनमूल्यांचं बीजारोपण करायचं आहे." शिक्षक, मुख्याध्यापक, प्राचार्य, शिक्षण संचालक अशी अनेक पदं भूषवली. मात्र त्यांच्यातील हाडाचा शिक्षक शेवटपर्यंत कार्यरत होता. शिक्षणसंचालक म्हणून त्यांनी केलेली उत्कृष्ट काम त्यांचा अनुभव लक्षात घेऊन तत्कालीन मनुष्यबळ विकासमंत्री पी. व्ही. नरसिंगराव यांनी त्यांना दिल्लीला बोलावून त्यांच्यावर "नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ एज्युकेशनल प्लॅनिंग अॅण्ड अॅडमिनिस्ट्रेशन" संस्थेचे सल्लागार म्हणून जबाबदारी सोपवली. ती त्यांनी उत्तम प्रकारे पार पाडली. दिल्लीच्या वास्तव्याविषयी विचारले तर ते म्हणायचे "या मातीतलं रोप उपटून तिकडे लावलेय, रुजायला थोडा वेळ लागेल". इतकं महाराष्ट्राच्या मातीशी त्यांतं नातं घट्ट होतं. सहाजिकच आहे शिक्षकांचे प्रबोधन करण्यासाठी त्यांनी अवघा महाराष्ट्र पिंजून काढला. खेड्यापाड्यात, वाड्यावस्त्यात जाऊन शिक्षक, गावकरी, अधिकारी यांना मार्गदर्शन करुन त्यांची मने जिंकली. नायगावला जाऊन फक्त "सावित्रीबाई फुले दत्तक-पालक योजने"ची मुहुर्तमेढ रोवली नाही तर स्वतः एक मुलगी दत्तक घेतली. त्यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून अनेक शिक्षक, पालक, नागरिक, अधिकारी, बँका, गणेशोत्सव मंडळे यांनी उत्स्फूर्तपणे या योजनेत सहभाग नोंदवला. या योजनेचं राष्ट्रीय स्तरावर कौतुक झालं.
 
आम्ही शिक्षकांनी चिपळूणकर सरांना दैवत मानलं होतं. त्यांचे आशीर्वाद, मार्गदर्शन हाच आमचा प्रसाद होता. माणसाची श्रीमंती त्यांच्या बँकबॅलन्सवर नाही तर त्यांनी किती माणसं जोडली, किती माणसं घडवली यावर ठरते. त्या दृष्टीने आमचे चिपळूणकर सर खूप खूप श्रीमंत होते.
 
चिपळूणकर सरांचे अष्टपैलू व्यक्तिमत्व एका लेखात उलगडता येणार नाही. त्यासाठी स्वतंत्र पुस्तक लिहावं लागेल. सुदैवाने त्यांच्याच आशीर्वादाने त्याच्याच उपस्थितीत त्यांचं "उत्कृष्टाचा ध्यास" पुस्तकरुपानं प्रकाशित करण्याचं सद्भाग्य मला लाभलं ! आज चिपळूणकर सर आपल्यात नाहीत. मात्र त्यांनी दिलेल्या प्रेरक, संजीवक ज्ञानाची शिदोरी सतत त्यांच्या अस्तित्वाची जाणीव करुन देईल. त्यांच्या पवित्र स्मृतीस माझे शतशः विनम्र प्रणाम !
 
गुरुः साक्षात्परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः
 
 
 
- मालती देशपांडे (माजी मुख्याध्यापिका, ९९२२३०२६३०)