सायन सर्कल उड्डाण पूल दुरुस्तीसाठी बंद
महा एमटीबी   10-Oct-2018
 
 

मुंबई : मुंबईतील महत्त्वाचा मानला जाणारा सायन सर्कल उड्डाण पूल दुरुस्तीसाठी बंद करण्यात येणार आहे. जवळपास तीन ते चार महिन्यांसाठी हा उड्डाण पूल बंद ठेवण्यात येणार आहे. पनवेल, पुणे, नवी मुंबईच्या दिशेला जाणार्‍या वाहतुकीसाठी हा उड्डाण पूल महत्त्वाचा मानला जातो. परंतु दीर्घ कालावधीसाठी हा पूल बंद राहणार असल्याने मोठ्या प्रमाणात वाहतूककोंडी होण्याची शक्यता आहे. सायन सर्कल उड्डाण पुलाचे नुकतेच लेखापरीक्षण करण्यात आले. यानंतर पुलावरील बेअरिंग्स आणि जॉईंटस दुरुस्त करण्याची गरज असल्याचे समोर आले आहे. सुरक्षेच्या दृष्टीने ही डागडुजी लवकरात लवकर सुरू करणे आवश्यक आहे. त्यामुळे महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने लवकरात लवकर या उड्डाण पुलाची दुरुस्ती करण्याचा निर्णय घेतला आहे. दरम्यान, हा उड्डाण पूल किती दिवस बंद ठेवावा आणि कशा प्रकारे याचे काम करावे यांचीदेखील चर्चा पूर्ण झाली आहे. दरम्यान, या पुलाच्या दुरुस्तीसाठी लागणारा कालावधी दीर्घ असल्यामुळे त्या ठिकाणी वाहतूककोंडी होण्याचीदेखील शक्यता आहे. त्यामुळे वाहतूककोंडीवर कशा प्रकारे तोडगा काढता येईल, यावर वाहतूक विभाग आणि रस्ते विभाग एकत्रित काम करत आहेत.


वाहतूक पूर्णपणे बंद : वाहतूक सुरू असताना या उड्डाण पुलाचे काम करणे शक्य नसल्याने पुलावरील वाहतूक पूर्णपणे बंद करण्यात येणार आहे. त्यामुळे या पुलावरील वाहतूक पूर्णपणे पुलाखालून जाणार आहे. सद्यस्थितीला पुलावरून वाहतूक सुरू असतानाही या ठिकाणी बरेचदा मोठ्या प्रमाणात वाहतूककोंडी होत असते. त्यामुळे पूल बंद झाल्यानंतरही वाहतूककोंडीचा प्रश्न ऐरणीवर येण्याची शक्यता आहे. दरम्यान, येत्या महिनाभरात या कामाला सुरुवात होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

 
  

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/