आठवड्यात वाराणसी सोडण्याची मराठी-गुजरातींना धमकी
महा एमटीबी   10-Oct-2018


लखनौ : गुजरातमध्ये उत्तर भारतीयांवर झालेल्या हल्ल्यांमुळे राष्ट्रीय स्तरावरील वातावरण ढवळून निघालेले असतानाच दुसरीकडे उत्तर भारतातही तेथे राहणार्‍या गुजराती व मराठी लोकांवरील दबाव वाढताना दिसत आहे. उत्तर प्रदेशमधील वाराणसी शहरात तर वाराणसीत राहणार्‍या गुजरात व महाराष्ट्रातील नागरिकांनी एका आठवड्याच्या आत वाराणसी सोडून जावे, अशी धमकीच देण्यात आली आहे. वाराणसी शहरात अशी धमकी देणारी पोस्टर्स अनेक ठिकाणी लावण्यात आल्याचे उघडकीस आले आहे. स्थानिक प्रसारमाध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार, उत्तर प्रदेश-बिहार एकता मंचाने ही पोस्टर्स लावली आहेत. वाराणसीमध्ये राहत असलेल्या सर्व गुजरात आणि महाराष्ट्रातील लोकांनी एका आठवड्याच्या आत वाराणसी सोडून जावे अशी धमकी या माध्यमातून देण्यात आली आहे. तसेच, वाराणसी सोडून न गेल्यास परिणाम भोगण्यास तयार राहा, असाही इशारा देण्यात आला आहे.

 

दि. २८ सप्टेंबर रोजी गुजरातमधील साबरकांठा येथे एका अवघ्या १४ महिन्यांच्या अल्पवयीन बालिकेवर बलात्कार झाल्याची घटना उघडकीस आल्यानंतर गुजरातमध्ये मोठ्या प्रमाणावर उत्तर भारतीयांवर विशेषतः उत्तर प्रदेश व बिहारमधून आलेल्या नागरिकांवर हल्ले झाले आहेत. तसेच, या हल्ल्यामागे काँग्रेस नेते व आमदार अल्पेश ठाकोर यांची संघटना क्षत्रिय ठाकोर सेनेची फूस असल्याचेही आरोप करण्यात येत आहेत. या सर्व वादंगावर राष्ट्रीय स्तरावर राजकारण तापू लागले असतानाच आता उत्तर भारतातून याची प्रतिक्रिया येऊ लागली असून आता तेथे स्थायिक झालेल्या गुजराती व मराठी नागरिकांवर दबाव आणला जाताना दिसत आहे. दरम्यान, या पोस्टरबाजीचा व त्यामागील सूत्रधारांचा शोध उत्तर प्रदेश पोलिसांकडून घेतला जात असल्याचे उत्तर प्रदेश प्रशासनातर्फे स्पष्ट करण्यात आले आहे.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/