‘मी टू’चे वादळ
महा एमटीबी   10-Oct-2018

 
 

मी टू’ ची दखल आता महिला आयोगानेच घ्यायला हवी. नुसती दखल घेऊन चालणार नाही तर कारवाईही व्हावी, जेणेकरून या प्रकरणांमध्ये किती तथ्य आहे हे समोर येईल. ज्यांच्यावर अन्याय झाला आहे, त्यांना न्याय मिळावाच; पण हे सारे सनसनाटीसाठी सुरू नाही ना, याचीही काळजी घ्यायली हवी.

 

‘मी टू’ या मुक्तमाध्यमांवरील अभिव्यक्तीला सध्या एका चळवळीचे रूप आल्याचे दिसते. लैंगिक शोषण झालेल्या अनेक महिला आता मुक्तमाध्यमांवर मुक्तपणे आपल्याबाबत झालेल्या घटनांचा मोकळेपणे आणि मोठ्या धाडसाने उच्चार करीत आहेत. मुक्तमाध्यमांचा वाढणारा प्रभाव आता न्यायालयालाही समकक्ष व्यासपीठ म्हणून उभा राहातो की काय, असा प्रश्न पडावा, अशी ही स्थिती. यातील किती प्रकरणे खरी, किती खोटी हा वादाचा मुद्दा असला तरी महिलांचे लैंगिक शोषण हा प्रदीर्घ काळापासून चर्चिला जाणारा विषय आता वेगळ्या प्रकारे चर्चेला आला आहे. कामाच्या ठिकाणीच नव्हे, तर निरनिराळ्या संदर्भात जिथे जिथे पुरुषांशी संपर्क आला, त्या त्या ठिकाणी या महिलांना ज्या प्रकारच्या समस्यांना तोंड द्यावे लागले, त्याची वाचा फोडण्याचे काम सध्या मुक्तमाध्यमांवर सुरू आहे. सर्वात आधी अभिनेत्री तनुश्री दत्ता या सध्या फारशा प्रकाशात नसलेल्या नटीने प्रसिद्ध अभिनेता नाना पाटेकर यांच्यावर आपल्याशी असभ्य वर्तन केल्याचा आरोप केला. इतक्या वषार्र्ंनी हा आरोप केल्याने सुरुवातीला कुठल्याही वादात उडी मारून चर्चेत राहण्यासाठी धडपडणार्‍या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी काही प्रयोग केलेही, मात्र तनुश्री दत्ता यांच्या आक्रमक भूमिकेमुळे त्यांनीही माघार घेतली. नाना पाटेकर यांनी या सगळ्या विषयावर इतक्या संदिग्धपणे आपले म्हणणे मांडले की, त्यांची भूमिकाच मुळी स्पष्ट होऊ शकली नाही. यानंतर अनेकांनी नानाची बाजूही घेतली आणि काहींनी त्यांच्या विचित्र वागण्याचा आपल्यालाही कसा अनुभव आला, हे सांगितले. या सगळ्या घटनाक्रमाने ‘मी टू’ नावाचा हॅशटॅग नाणावला गेला आणि आपल्याबरोबर झालेल्या गैरप्रकाराबाबत सर्वच स्तरांतील महिलांनी उघडउघडपणे वाच्यता करायला सुरुवात केली. महत्त्वाचे म्हणजे, या सगळ्याच प्रकरणांवर भाष्य करताना मुक्तमाध्यमांवर सुरुवातीला महिलांवरच दोषारोप ठेवण्यात आले. इतक्या उशिरा जाग का आली? अशा आशयाचे प्रश्नदेखील उपस्थित करण्यात आले. आपल्या समाजातले नरप्राबल्य किती अन्यायकारक आणि असंवेदनशील आहे, याचेच हे द्योतक म्हणावे लागेल. पण, मुद्दा इथेच संपला नाही. सिनेमा व मालिकांच्या क्षेत्रात होणारे असे आरोप आणि त्याची होणारी आंबट चर्चा नवीन नाही.

 

या प्रकरणाला निराळे वळण मिळाले ते सदैव संघ आणि ब्राह्मणद्वेषाने पछाडलेल्या एका माजी न्यायमूर्तींवर एका महिला वार्ताहराने केलेल्या आरोपानंतर. या महिलेने, या मार्जी न्यायमूर्तींनी तिला पाठविलेले संदेशही जाहीर करून टाकले. तरीही या विकृत माणसाने, आपण निर्दोष असून संघाने आपल्याला यात ओढण्यासाठीच डाव टाकला असल्याचा दावा केला. आता मुद्दा असा की, दोन समाजात तेढच निर्माण व्हावी म्हणून सतत प्रयत्नशील असलेल्या अशा विकृत माणसाला ‘हिरो’ करण्यासाठी त्याच्या बातम्या व मुलाखती का कराव्या? आणि तिथपर्यंत पोहोचल्यावर ही व्यक्ती आपल्या मूळ स्वभावानुसार वागली तर पोलिसांत न जाता केवळ मुक्तमाध्यमांवर तक्रार करावी? बातमी मिळविण्यापेक्षा काही सनसनाटी मिळविण्याच्या नादात चुकीच्या दिशेने पडलेले पाऊल म्हणून याकडे का पाहू नये? हीच गोष्ट पत्रकारांच्या बाबतीतही सुरू झाली आहे. संपादक वगैरे म्हणून नावाजलेल्या अनेक व्यक्तींच्या नावानेदेखील आता आरोप-प्रत्यारोपांची राळ उडायला लागली आहे. किरण नगरकर यांच्यासारखे लेखकही यातून सुटलेले नाही. महत्त्वाचे म्हणजे, यातील कुणीही अद्याप न्यायालय, महिला आयोग किंवा अशा कुठल्याही प्रकारचे कायदेशीर दार ठोठविण्याचा प्रयत्न केल्याचे समोर आलेले नाही. या सगळ्या प्रकरणातील खरे-खोटे किती व प्रतिमा भंजनाचा प्रकार किती, याचा कुठल्याही प्रकारचा अंदाज बांधणे जवळजवळ मुश्किलच आहे. महिला आयोगाने स्वत:च आता या विषयात तक्रार दाखल करून घेतली पाहिजे. यामुळे या विषयातल्या गांभीर्यापेक्षा त्याला आलेले सनसनाटीचे वलय पूर्णपणे फिटून जाईल.

 

या सगळ्या विषयात माध्यमे अत्यंत बेजबाबदारीने वागत आहेत, असे म्हणायला पुरेपूर वाव आहे. नग्नता, गुन्हेगारी विषयातल्या बातम्या आणि सनसनाटी अशा मूळ मजकुरावर चालणारी आजकालची माध्यमे यात चवीचवीने मजकूर निर्माण करीत आहेत. जणू काही रोज नव्याने प्रकरणे बाहेर यावीत आणि त्याच्यावर सवंग मजकूर मिळायला संधी मिळावी, असाच काहीसा प्रकार सुरू आहे. टीव्ही चॅनलवर चाललेल्या चर्चांनादेखील अशाच स्वरूपाचं घाट प्राप्त झाला आहे. अर्ध्याहून अधिक वृत्तवाहिन्या सध्या मुक्तमाध्यमांवर येणार्‍या मजकुरावर चालल्या आहेत. मुक्तमाध्यमांवर जे येते ते पाहायला वृत्तवाहिन्यांवर दर्शक का येतील? असा साधा प्रश्न आहे. मात्र, या विषयातील सवंगता एवढी आहे की, कुणीही मागे हटायला तयार नाही. पुढचे अनेक दिवस माध्यमात हे चालणार, यात काही शंका नाही. नंतर या विषयाचा चावूनचावून चोथा झाला की, मग एखादे प्रकरण खरे असले तरी माध्यमांना त्याकडे पाहायला वेळ नसेल किंवा छापायला जागा नसेल. सवंगतेच्या पलीकडे जाऊन अशा विकृत चाळ्यांना पायबंद बसावा म्हणून काही गोष्टी करणे आवश्यक आहे. कायदेशीर लढा देणे अनेकांना न मानवणारे असू शकते. मात्र, नैतिकतेच्या पातळीवरही विचार व्हायलाच हवा. या सगळ्या विषयात जे बोलले व लिहिले जात आहे, त्याच्या पलीकडे जाऊन या सगळ्या घटनांचा विचार करायला हवा. केवळ सनसनाटी निर्माण करण्यासाठी जर का हे सगळे चालले असेल, तर त्याचा वेगळा विचार करावाच लागेल.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/