आदिशक्तीचं पूजन
महा एमटीबी   10-Oct-2018

 

मानवाच्या इतिहासात डोकावून बघितलं, तर असं दिसून येतं की, शक्तीची उपासना अतिप्राचीन काळापासून चालू आहे. हजारो, लाखो वर्षांपासून शक्तीला जाणून घेण्यासाठी जे केल जातं ना त्याला ‘उपासना’ म्हणतात. संपूर्ण जगताची शक्ती अफाट, अमर्याद अशी आहे. मानव अशा शक्तीपुढे नतमस्तक होऊन म्हणू लागला.

या देवी सर्वभूतेषु शक्तिरुपेण संस्थिता।

नमस्तयै नमस्तयै नमस्तयै नमो नमः॥

या शक्तीचं स्वरूप अत्यंत विराट आहे. चंद्र आणि सूर्याचे तेजस्वी नेत्र असलेली शक्ती सकल जगताला तेज प्रदान करते. तना-मनाला स्फूर्ती प्रदान करून अखंड कार्यरत राहण्याची प्रेरणा देते.

नवरात्रोत्सवाच्या पावन काळात देवी भगवतीची पूजा विविध प्रकारांनी केली जाते. या काळात अखंड दीप तेवत ठेवून तेजोमयी देवीची उपासना केली जाते. श्रीसूक्ताचे पठण करून देवीला प्रसन्न करण्याचा मनोभावे प्रयास केला जातो. संपूर्ण नवरात्रीमध्ये महाकाली, महालक्ष्मी आणि महासरस्वतीची पूजा केली जाते. पहिले तीन दिवस तमोगुण कमी व्हावेत, यासाठी महाकालीचं पूजन केलं जातं. पुढील तीन दिवस रजोगुणी महालक्ष्मींची पूजा केली जाते, तर अंतिम तीन दिवस साधना वृद्धिगंत होण्यासाठी सत्वगुणी महासरस्वतीचं पूजन करतात, हे या तीन देवीचं वैशिष्ट्य आहे. महाकाली देवी ‘काल’ तत्त्वाचं प्रतीक आहे, तर महासरस्वतीचं ‘गती’ हे प्रतीक असून महालक्ष्मी माता ‘दिशा’ तत्त्वाची प्रतीक आहे. आदिशक्ती सृष्टीची निर्मिती, पालन, पोषण आणि संवर्धन करते. ही आदिशक्ती कायम कार्यरत असते. या आदिशक्तीची त्रिविधं रुपे म्हणजेच महासरस्वती, महालक्ष्मी आणि महाकाली होय. ब्रह्मा, विष्णू आणि महेश या देवांशी तीन देवींचा संबंध आहे. महाकाली देवी महेशदेवतेशी संबंधित शक्ती आहे. लक्ष्मी देवी विष्णूदेवतेशी संबंधित शक्ती आहे, तर महासरस्वती देवी ब्रह्मदेवतेशी संबंधित आहे. उत्पत्ती, स्थिती आणि लय हे महत्त्वपूर्ण विभाग उत्तम तर्‍हेने, चोखपणाने सांभाळण्यासाठी ब्रह्मा, विष्णू आणि महेश यांना या तीन देवी संपूर्ण सहकार्य करतात. त्यामुळे महाकाली, महासरस्वती आणि महालक्ष्मी देवीची उपासना व पूजन अत्यंत महत्त्वपूर्ण मानलं जातं. संपूर्ण सृष्टीचा कारभार याच देवतांमुळे व देवींमुळे व्यवस्थितरित्या चालू राहतो. नवरात्रीमध्ये याचं उत्कटतेनं पूजन केलं की शक्ती प्रसन्न होते.

 

सत्व, रज, तम या त्रिगुणांना संयमित करण्याचा काळ म्हणजे नवरात्रीचा काळ होय. सृष्टीमध्ये हे त्रिगुण सर्वत्र दृष्टीस पडतात. त्यामुळे जीवाला त्याचे परिणाम भोगावे लागतात. यापासून मुक्त होण्यासाठी देवीची कृपा होणे अत्यावश्यक आहे. ही सर्वांची अधिष्ठात्री भगवती आहे. त्यामुळे तिचे ध्यान आणि चिंतन केले की मानव मुक्त होतो. नवरात्रीच्या दिवसांत ती आपल्या भक्तांकडे कृपादृष्टीने बघते. जगदंबेने नऊ दिवस युद्ध करून महिषासुराचा वध केला. शुंभ आणि निशुंभ राक्षसांचाही तिने वध केला.आपल्यामध्ये असणारे व सतत छळणारे राक्षस म्हणजे ‘षड्रिपू’ आहेत. त्यांचा नाश करण्यासाठी शक्तीची उपासना मन:पूर्वक केली पाहिजे. आहार नियंत्रित केला की आजार दूर होतात. देवी, शक्ती हिच्याभोवती प्रदक्षिणा म्हणजे उत्तम विहार होय. मंत्रजागर करून, शक्तीचा जागर करून जीवनाचं उद्दिष्ट साध्य होतं. अखंड दीप हे आत्मज्योतीचं प्रतीक आहे. आपल्यामध्ये परमात्म्याचा अंश आहे. तो आत्मरुपात आहे. दिव्याची ज्योत उर्ध्वगामी असते. त्याप्रमाणेच आपल्या आत्म्यज्योतीचं स्वरूप उर्ध्वगामी असावं. याचाच अर्थ आपल्याला परतात्म्याशी एकरूप होण्यासाठी, आत्मज्योतीचं दर्शन घडण्यासाठी, आत्मज्ञानाच्या प्राप्तीसाठी नवरात्रीमध्ये तीव्र साधना करावी. विषय वासनेमुळे आत्मज्योत दृष्टीस पडत नाही. आदिशक्तीच्या कृपेशिवाय काहीही शक्य नाही. तिची साधना, उपासना, पूजन, स्तुती, होमहवन, उपवास करून तिच्या कृपेला पात्र होण्याचा पुण्यकाल म्हणजे नवरात्री होय. ‘उदे गं अंबे उदे‘ म्हणून तिचा उदोउदो करायचा. वाद्यांचा गजर करून जोगवा मागायचा. तेव्हा ती आपल्या जीवनरुपी परडीत आत्मज्ञानाची अलौकिक फूलं घालेल. त्या फुलांनी परडी शिगोशिग भरून जाईल. त्यामुळे सर्वत्र ज्ञानाचा सुगंध दरवळेल.

 

ही शक्ती कधी प्रगटपणानं दृष्टीस पडते? जेव्हा भक्त पूर्णपणानं शरण जातो ना तेव्हा ती प्रगट होते. सगुण रुपात साकार होऊन सांभाळते. तिच्या तेजस्वी रुपाचं वर्णन करण्यास शब्द अपुरे व असमर्थ आहेत. तिचं रूप विलोभनीय असून ती अलौकिक सौंदर्यानं विनटलेली दिसते. ती डोंगरकपारीत, गुहेत, उंच पर्वतावर वास करते. तिची प्रमुख १८ शक्तिपीठं शंकराचार्यांनी सांगितलेली आहेत.देवी पुराणात ५१ शक्तिपीठं सांगितली आहेत. भारतामध्ये ४१ शक्तिपीठं आहेत. पाकिस्तानात एक व तिबेटमध्ये एक अशी विविध देशांत एकूण ५१ शक्तिपीठं आहेत. आपण त्या स्थानी जाऊन साधना केली, तर ती शीघ्र फलदायी होते. कारण त्या स्थानांमध्ये असणार्‍या प्रभावी स्पंदनांचा सुपरिणाम होतो. देवी पुराणात उल्लेख केलेल्या शक्तिपीठांचा अंक ५१ का असावा? त्याचं कारण म्हणजे, ५ + १ = ६ होतात. या स्थानी जाऊन ‘षडरिपूं’चा नाश होतो. रिपू सहा असतात ना! ‘सहा’ आकडा या दृष्टीनं महत्त्वाचा आहेषडविकार, षडरिपूंचा संहार करून मानवाच्या जीवनात मांगल्य आणणारी परब्रह्मरुपिणी आदिमाया! नवरात्रीमध्ये व्यक्तिगत आणि सामूहिकरित्या मंगल स्तोत्रांचा घोष आसमंतात दुमदुमला पाहिजे.त्याकरिता आदिमाया, आदिशक्तीचं मंगलगान भक्त नवरात्रीत करतात व अंत:करणापासून म्हणतात...

 

सर्वमंगल मांगल्ये शिवे सर्वार्थसाधिके।

शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणि नमोऽस्तुते॥

‘शक्ती’ म्हणजे ऐश्वर्य आणि पराक्रम होय. आदिशक्ती प्रपंच आणि परामर्थ या दोहोंमधील ऐश्वर्य प्रदान करून पराक्रम करण्यास बळ, सामर्थ्य प्रदान करते. परमार्थ साध्य करण्यासाठी पराक्रमाची आवश्यकता असते. हे दोन्ही आपल्या भक्तांना देणारी शक्ती ऐश्वर्यानं आणि अतुलनीय पराक्रमानं संपन्न असते. ती भक्तांना कधीच नाराज करत नाही. रिक्त हस्तानं माघारी पाठवत नाही. धर्म, अर्थ, काम आणि मोक्षाची अधिष्ठात्री आदिशक्तीचा नऊ दिवस अखंड जागर केला की, इतर साधना, उपासना करण्याची आवश्यक्ता नाही. भूतलावरील स्त्रीचं रूप हे देवीचं रूप आहे. तिच्यापासून उत्पत्ती होते. तिच आपल्या अपत्यावर उत्कृष्ट संस्कार करते. म्हणून स्त्रीला, मातेला अनन्यसाधारण स्थान आहे. ‘मातृपूजन’ करणारी आमची संस्कृती आहे. ‘विद्या: समस्तास्तव देवी भेदा: स्त्रिय: समस्त: सकलाजगत्सु। ’ हे देवी माते, या सकल जगतामधील सगळ्या विद्या तुझ्याचपासून प्रकट होतात. सकल स्त्रिया या तुझेच रूप आहेत. प्तशक्तींचा विसर न पडता सदैव सर्व स्तरावर साधना करणार्‍याचं कल्याण करून त्याला उन्नतीप्रत नेऊन मोक्षाचा लाभ करून देणार्‍या मातेला मनोभावे साष्टांग दंडवत!

 
 
- कौमुदी गोडबोले 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/