अंधेरी-पनवेल लोकलचा गोरेगावपर्यंत विस्तार
महा एमटीबी   10-Oct-2018


मुंबई : मध्य रेल्वे व पश्चिम रेल्वे प्रशासनाने नवीन मार्गिका टाकल्याने छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते अंधेरी या गाड्यांचा गोरेगाव स्थानकापर्यंत विस्तार करण्यात आला आहे. पनवेल-अंधेरी याही गाड्या पूर्वीपासून धावत आहेत. म्हणून त्याही गाड्या गोरेगाव रेल्वे स्थानकापर्यंत वाढविण्याची मागणी पनवेल प्रवासी संघाने सातत्याने रेल्वे प्रशासनाकडे केली होती.

 

पनवेल प्रवासी संघाच्या या प्रयत्नांना यश मिळाले असून, लवकरच याही गाड्यांचा विस्तार गोरेगावपर्यंत करण्याचे रेल्वे प्रशासनाने मान्य केले आहे. दि. १ नोव्हेंबरला अंमलात येणार्‍या नव्या वेळापत्रकात या सेवा वाढविण्यात येतील, अशी प्राथमिक माहिती यानिमित्ताने समोर आली आहे. पनवेलसारख्या विकासाभिमुख महानगरातील वाढती लोकसंख्या व गर्दीने व्यापलेल्या रेल्वे स्थानकाची गरज लक्षात घेता पनवेल ते अंधेरी मार्गावरील सध्याच्या फेर्या वाढविण्याची आवश्यकतादेखील प्रवासी संघाने व्यक्त केली असल्याचे मध्य रेल्वे उपनगरीय सल्लागार समितीचे सदस्य श्रीकांत बापट यांनी सांगितलेपनवेल रेल्वे स्थानकाच्या विकासाबाबत बोलताना प्रवासी संघाचे अध्यक्ष डॉ. भक्तिकुमार दवे म्हणाले की, “पनवेल येथे एकूण सात फलाट असून आठ व नऊ अशा दोन फलाटांची बांधणी युद्धपातळीवर सुरू आहे. पाच ते सात क्रमांकाच्या फलाटाला जोडणारा रोह्याच्या दिशेकडील पादचारी पूल नादुरुस्त झाल्याने त्याच्या दुरुस्तीचे कामही मध्य रेल्वे प्रशासनाने सुरू केले आहे. त्यामुळे आठ ते दहा दिवस प्रवाशांची गैरसोय होणार असल्याचे त्यांनी सांगितले. पनवेल शहर ते पोदी या भुयारीमार्गाचे काम अंतिम टप्यात असून रेल्वे सुरक्षा कार्यालयाचा आदेश मिळताच रेल्वे रूळाखालचा सब वे पूर्ण होणार असल्याचेही त्यांनी नमूद केले.

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/