उत्तर आणि दक्षिण कोरियामध्ये आज होणार चर्चा

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    09-Jan-2018
Total Views |




सोल : गेल्या दीड वर्षांपासून उत्तर कोरीयामुळे कोरियन सागरामध्ये निर्माण झालेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर आज उत्तर कोरिया आणि दक्षिण कोरिया या दोन्ही देशांमध्ये उच्चस्तरीय द्विपक्षीय बैठक होणार आहे. तब्बल दोन वर्षानंतर दोन्ही देशांमध्ये अशा प्रकारची बैठक होत असून अमेरिकेबरोबर झालेल्या वादामुळे सर्व जगाचे लक्ष या बैठकीकडे लागले आहे.

उत्तर कोरिया आणि दक्षिण कोरिया या दोन्ही देशांच्या सीमेच्या जवळ असलेल्या पनमुनजोम या गावातील 'पीस हाउस' येथे आज बैठक होणार आहे. या बैठकीच्या पार्श्वभूमीवर गावामध्ये मोठ्या प्रमाणात सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली असून बाहेरील नागरिकांना या गावामध्ये प्रवेश करण्यासाठी बंदी घालण्यात आलेली आहे. तसेच दोन्ही देशांचे प्रतिनिधी मंडळच या बैठकीत सहभागी होणार असल्याचे देखील सांगण्यात आले आहे.

या बैठकीत प्रामुख्याने पुढील महिन्यापासून दक्षिण कोरियामध्ये सुरु होणाऱ्या ऑलम्पिक क्रीडा स्पर्धेसंबंधी चर्चा केली जाणार असल्याचे बोलले जात आहे. द.कोरियामध्ये होणाऱ्या या क्रीडा स्पर्धेत उत्तर कोरिया देखील आपले खेळाडू आणि प्रतिनिधी पाठवणार आहे. त्यामुळे यासंबंधी या बैठकीत मुख्य चर्चा होणार असल्याचे बोलले जात आहे. परंतु याच बरोबर दोन्ही देशांमध्ये गेल्या काही दिवसांपासून बिघडलेल्या संबंधांवर देखील चर्चा करण्यात येईल, असे आश्वासन दक्षिण कोरियाकडून देण्यात आले आहे.

नव वर्षाच्या सुरुवातील किम जोंग उन याने केलेल्या भाषणामध्ये ऑलम्पिक क्रीडा स्पर्धेचा उल्लेख केला होता. तसेच या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी आपल्या देशातील खेळाडूंना दक्षिण कोरियात पाठवणार असल्याचे उन याने जाहीर केले होते. यामुळे दोन्ही देशांमधील संबंधांमध्ये सुधारणा होण्याची चिन्हे दिसू लागली होती. त्यामुळे आजची या दोन देशांमधील चर्चा ही आंतरराष्ट्रीय देशांसाठी देखील अत्यंत महत्त्वाची असणार आहे.
@@AUTHORINFO_V1@@