ऑस्ट्रेलियाला बसतायेत उन्हाच्या झळा
 महा एमटीबी  08-Jan-2018

१९३९ नंतर पहिल्यांदाच पारा ४७ डि.से.च्या वर

सिडनी :
भारत, रशिया, युरोप आणि अमेरिकेसह उत्तरेतील सर्व देश थंडीने गारठलेले असताना, ऑस्ट्रेलियात मात्र उन्हाने कहर केला आहे. ऑस्ट्रेलियाचे सामान्य तापमानाच्या पारा सध्या ४७ डिग्री सेल्सिअसच्या वर गेला असून उन्हामुळे ऑस्ट्रेलियामधील नागरिकांचे प्रचंड हाल होत आहेत. ऑस्ट्रेलिया सरकारने देखील देशातील सर्व नागरिकांना उन्हापासून सावध राहण्याचा इशारा दिला असून नागरिकांनी आपल्या आरोग्याची काळजी घ्यावी, असे ऑस्ट्रेलिया सरकारने म्हटले आहे.

रविवारी ऑस्ट्रेलियाच्या सिडनी या शहरामध्ये देशातील सर्वाधिक तापमानाची नोंद करण्यात आली. सिडनीमध्ये रविवारी पारा ४७.३ डिग्री सेल्सिअसवर पोहचला होता. विशेष म्हणजे सिडनीमध्ये १९३९ नंतर पहिल्यांदाच इतक्या मोठ्या प्रमाणात तापमानाची नोंद करण्यात आली आहे. यामुळे सिडनीतील नागरिकांच्या सर्वांगाची लाहीलाही झाल्यामुळे नागरिकांनी रविवारचा पूर्ण दिवस समुद्रकिनारी तसेच स्विमिंग पूल जवळ घालवण्याला आपली पसंती दिली. यामुळे ऑस्ट्रेलियातील समुद्रकिनारे काल नागरिकांनी तुडुंब भरले होते. उन्हामुळे नागरिकांना कसल्याही प्रकराचा त्रास होऊ नये, यासाठी ऑस्ट्रेलिया सरकारने काही सूचना देखील जारी केल्या असून नागरिकांना आपल्या आरोग्याची काळजी घेण्याचे आवाहान सरकारने केले आहे.

भारतासह आशिया युरोप आणि अमेरिका खंडामध्ये सध्या हिवाळा सुरु झाला आहे. भारतासह अनेक देशांमध्ये हिमवृष्टीला देखील सुरुवात झाली आहे. उत्तर भारतामध्ये अनेक ठिकाणी थंडीमुळे सामन्य जनजीवन विस्कळीत झाले आहे. हरियाणासह हिमाचल प्रदेशमधील काही शाळा या थंडीच्या कारणांमुळे बंद ठेवण्याचे आदेश देखील तेथील स्थानक राज्य सरकारने दिलेले आहेत.