‘ती’ ची कथा
 महा एमटीबी  08-Jan-2018
 

 
 
आपल्या देशात लोकशाही आहे. या लोकशाही प्रणालीत अनेक नेते, आमदार, खासदार, नगरसेवक किंवा खंडीभर लोकप्रतिनिधी होऊन गेले. दर पाच वर्षांनी निवडणुका होतात. काही लोकप्रतिनिधी पुन्हा निवडून येतात, काही हरतात तर लोकशाही प्रक्रियेत ही निवडून येण्याची हरण्याची प्रक्रिया चालूच राहते पण काही लोकप्रतिनिधी आपल्या कार्याची छाप सोडतात. फक्त विकासकामे केली म्हणजे आपले काम झाले असा एक समज आपल्या समाजात आहे. बरं, ही विकासाची कामे तरी नीट होतात का? नागरी सुविधा मिळतात का यावरही ब-याच लोकप्रतिनीधींची छाप पाहायला मिळत नाही पण काही लोकप्रतिनिधी आपले कार्य हे मतदारसंघ आणि रोजच्या कामाच्या पलीकडील करून ठेवतात. यापैकीच एक वर्सोव्याच्या आमदार डॉ. भारती लव्हेकर.
 
 
संस्थात्मक आणि रचनात्मक कार्य करणा-या लोकप्रतिनिधीत त्यांचे नाव अग्रणी. लव्हेकर मूळच्या मराठवाड्यातल्या. मराठवाडा विद्यापीठातून त्यांनी पत्रकारितेची पदवी प्राप्त केली. राज्यशास्त्रात पदव्युत्तर शिक्षण घेतल्यानंतर समान नागरी कायदा या विषयात डॉक्टरेट मिळवली. २५ वर्षांपूर्वी त्या समाजकारणात आल्या. त्यांनी ‘ती’ फाऊंडेशन नावाची स्वयंसेवी संस्था सुरू केली. बीड जिल्ह्यातील शिरुर कासार तालुक्यातील १२० गावांत मुलींच्या लिंग गुणोत्तराचे भीषण वास्तव २०११ सालच्या जनगणनेत समोर आले. इथे दर हजार मुलांमागे मुलींची संख्या ६६९ इतकीच होती. ती गावे सर्वप्रथम त्यांनी दत्तक घेतली आणि १५ ऑगस्ट २०११ नंतर ज्यांच्या घरी मुलगी जन्माला येईल त्या मुलीच्या नावे ५ हजार रुपये मुदतठेवीत गुंतवली गेली.
 
 
यामुळे परिणाम असा झाला की, मुलींचे प्रमाण वाढून ते ९२१ वर गेले. मागे मुंडे दाम्पत्याने बीड जिल्ह्यात ज्या कळ्या उमलण्यापूर्वीच खुडून टाकल्या त्यावरून इथे मुलींबाबत किती गंभीर परिस्थिती आहे, हे लक्षात येईल पण यापलीकडे लव्हेकर यांचे महत्त्वाचे कार्य म्हणजे सॅनिटरी नॅपकीन पॅडसाठी बनवलेली बँक. भारतात ७० टक्के महिलांना सॅनिटरी नॅपकीन घेणे परवडत नाही. त्यामुळे त्यांच्याकडून आरोग्यासाठी घातक अशा वस्तूंचा वापर होतो आणि त्याचा दुष्परिणामत्यांच्या आरोग्यावर होतो. ही बाब लक्षात घेऊन लव्हेकर यांनी ही बँक सुरू केली. या बँकेत ७० रुपयांत महिन्याला १० पॅड मिळण्याची सोय उपलब्ध करून देण्यात आली. बरं जिथे मुलींना हे पॅड परवडत नसतील तर कसे काय विकत घेतील? म्हणून त्यांनी ही बँक गरजू आणि दानशूर व्यक्तींना दुवा साधणारी ठरली. तुम्ही पॅड विकत घेऊन त्या गरजू मुलींना देऊ शकतात अथवा अर्थसहाय्य देऊन बँक गरजू मुलींना त्या पॅडचे वितरण करतील, अशी संकल्पना राबवली गेली.
 
 
२८ मे २०१७ रोजी या बँकेचा शुभारंभ केला गेला. रजोधर्म म्हटला की प्रत्येक मुलीला तो असतो. त्यात ग्रामीण, शहरी, आदिवासी असा भेद नसतो. आदिवासी भागात आतापर्यंत त्यांनी २ लाख सॅनिटरी नॅपकीनचे वाटप केले आहे. एवढ्यावरच न थांबता त्यांनी आपल्या आमदार निधीतून सॅनिटरी नॅपकीनच्या वेंडिंग मशीन्स उपलब्ध करून दिल्या. तसेच रजोधर्माबाबत गैरसमज, अंधश्रध्दा दूर व्हाव्या यासाठी त्यांचा प्रयत्न आहे. डॉ. भारती लव्हेकर यांचा प्रवास साधा सोपा नव्हता. याच कार्यासाठी त्यांना केंद्र सरकारचा ‘फर्स्ट लेडी’ हा पुरस्कार जाहीर झाला आहे. लव्हेकर यांची ‘ती’ च्या कथेचा हा सन्मान आहे. त्यांचे कार्य हे देशभरात रूजणे गरजेचे आहे, हे नक्की!
 
 
 
- तुषार ओव्हाळ