‘मजा पुरस्कार’
 महा एमटीबी  07-Jan-2018
 

 
एखादी संस्था स्थापन करताना त्या संस्थेचे ध्येय ठरवलं जातं. त्याचा लोगो, एखादं समर्पक ब्रीदवाक्य विचारवंतांकडून मागवलं जातं आणि त्या विचाराला अनुसरुन मग त्या संस्थेची वाटचाल सुरु होते. त्यासाठी कार्यकर्ते, सभासद, पद, पैसा, कार्यालयाची जागा, खर्च, आर्थिक देवाणघेवाण, चर्चा आणि वाद-विवाद, निवडणूक असा फार मोठा गंमतीदार प्रकार अनुभवावयास येतो. मग ती संस्था किती मोठी आहे, यावर प्रेक्षकांची उपस्थिती अवलंबून असते.
 
कार्यक्रमाला कोण सेलिब्रेटी असेल, यावर त्या संस्थेचा दर्जा आणि त्याला लाभणारा आर्थिक पाठिंबा अवलंबून असतो. अशा संस्थेच्या कार्यक्रम समारंभांना लाभणारी प्रसिद्धीही कार्यक्रमाच्या ग्लॅमरवर पाहिली जाते. एकूणच संस्थेचे श्रेष्ठत्व आणि आयुष्य अबाधित राखण्यासाठी एकमेकांची मनं राखावी लागतात. ठराविक समारंभ आयोजित करताना विवाह सोहळ्यातील मानपमानाची आठवण होते. हे सर्व इथे मांडण्याचं कारणही एका सोहळ्याचा निमित्तच आहे. पण, हा सोहळा अत्यंत ‘सोवळ्या’ विचाराने ‘पांढर्‍या शुभ्र’ मनाने कोणतीही चर्चा, वाद-विवाद, बैठक न होता एका धक्क्यात जनतेसमोर येतो आणि मग त्या संस्थेच्या संस्थापकाच्या नावालाच वाचक, प्रेक्षक, हिंतचिंतक प्रसन्न मनाने स्वतःहून दाद देतो. कारण, त्याला ठाऊक असतं, आपल्याला या सोहळ्याला जायचं आहे. त्याचं निमंत्रण कुरिअरने येणार नाही, तर ते ती संस्था स्वतःहून आपली दखल घेणार आहे आणि आपले स्वागत त्या व्यक्तीच्या प्रेमसंबंधावर असणार आहे.
 
बरं, हे प्रेम, स्नेह आपल्याला टिकवायचे असेल तर ती संस्थारुपी व्यक्ती आपल्याला जे सांगेल, ते निमुटपणे ऐकावंच लागेल. त्यावर आपला कोणताही आगाऊ विचार मान्य केला जाणार नाही आणि आपण त्यांच्या आगामी सोहळा-समारंभाविषयी कोणतेही मत व्यक्त करण्याच्या भानगडीत पडू नये. एव्हाना आपल्या लक्षात यायला हवं, ही चालती-बोलती, ऊर्जा, उत्साहाने फुलचार्ज असलेली व्यक्ती कोण असेल.
 
अशोक मुळ्ये या नावाचा गौरव करण्यासाठी माझ्या कुवतीनुसार तुर्तास इतकं सांगू शकतो आणि त्यांनी ज्या सोहळ्यासाठी मला मोबाईल निमंत्रण दिलं, त्या कार्यक्रमाविषयी कृतज्ञता व्यक्त करता यावी म्हणून कौतुक करावसं वाटतं. एखाद् वेळेस यावरही ते वाचून नंतर आपल्याला एक टपली देतील, अशीही अपेक्षा आहेच. कारण, त्या सोहळ्याला आलेले प्रेक्षक हे ऐकण्यासाठीच टपलेले होते आणि त्या सोहळा कार्यक्रमाचं मूळ आकर्षण तेच होतं. अगदी मोकळेपणाने कुणीही हे मान्य करेल.
 
 
अशोक मुळ्ये एक संस्था आहे. त्यांच्या विचारात सतत कल्पनांचा कोलाज भिरभिरत असतो. एखाद्या सीसीटीव्हीसारखं त्यांचं निरीक्षण, शोध, सावज, प्रसंग टिपण्याचं कार्य सुरु असतं आणि ते अचानक एका अंकुरासारखं एखाद् दिवशी उमलतं. आपण साहित्यिक भाषेत त्याला ‘संकल्पना’ म्हणू. ते म्हणतील, ‘‘संकल्पना वगैरे काही नाही. मला जे करावसं वाटलं ते मी केलं. तुम्ही यायचं नक्की.’’ पुन्हा त्यांचा फोन येतो, ‘‘यायचं नक्की.’’ आपुलकी आणि अशोक मुळ्ये यांची? म्हणजे, आपण नक्कीच सन्माननीय पाहुणे असणार, या विचाराने तिथं जायचचं. कार्यक्रम काय असणार, हे आधी आपल्याला ठाऊक नसणार आणि त्यासाठी गुगलवरही जाता येणार नाही. कारण, तोपर्यंत ते सारं मुळ्येंच्या मेंदूत भिरभिरत असणार. आपण तयारीने जायचं की आज आपले चार दिवस मजेत जाणार आणि झालंही तसचं. अशोक मुळ्ये या संस्थेचं ‘असेही एक साहित्य संमेलन’ पाहण्याचा योग आला आणि अपेक्षेप्रमाणे हे संमेलन मनाला स्पर्शून गेलं.
 
खरं तर संमेलनाची ‘मजा’ उपस्थित राहूनचं अनुभवायला हवी, ती वर्णनातून नाही कळणार. कारण, निमंत्रित साहित्यिकांपेक्षा मध्येच येऊन निवेदकाला बाजूस सारुन प्रेक्षकांना त्या व्यक्तीविषयी म्हणा किंवा तिथं घडणार्‍या प्रसंगाविषयी खुमासदार टिपणी करणारे अशोक मुळ्येच मला मोठे साहित्यिक वाटत होते आणि खरंच प्रेक्षकांतही ते स्टेजवर आले की, लगेच ते काही बोलण्यापूर्वीच हास्याची खुसखुस सुरु होई - ‘‘काय अफलातून माणूस आहे हा...’’ तर अशा या अव्वल नंबरीय सूत्रधाराने अरुण शेवते, सृष्टी कुलकर्णी, झी टीव्हीची दिवाळी अंकाची टीमयांचा या संमेलनात ‘माझा पुरस्कार’ हा मानाचा पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला. ‘माझा पुरस्कार’ या नावातच ‘मजा’ आहे, हे मुळ्येंच्या बोलताना कळलं. प्रत्येकाला तो पुरस्कार आपल्याला मिळाला असं वाटतं, ही द्विअर्थी गंमत या पुरस्कारात आहे. त्यामुळे हा कार्यक्रमही सर्वांना ‘माझा’ व ‘मजा’ देणारा असा वाटला.
 
अरुण शेवते यांनी ‘ॠतूरंग’ दिवाळी अंकाचे संपादन गेली २५ वर्षे अव्याहतपणे यशस्वी करुन दाखवले. त्यांच्या या आव्हान पूर्णचेचं कौतुक मुळ्येंनी या पुरस्कारातून केलं. सृष्टी कुलकर्णी आज कर्करोगाने त्रस्तग्रस्त आहे आणि त्याही परिस्थितीत तिने स्वतःला सावरुन कथालेखनाकडे आपली ऊर्जा दिली व स्वतःचा कथासंग्रह प्रकाशित केला. त्या निमित्ताने तिचा सत्कार होणं, ही घटना हृदयस्पर्शी होती. झी मराठीचा दिवाळी अंक समस्त साहित्य विश्वात उत्साह निर्माण करणारा होता, हे त्याला लाभणार्‍या विक्रमी मागणीवरुन आपल्या लक्षात येतं. अशोक मुळ्येंनी त्यांचा योग्य वेळी सन्मान केला, असंच म्हणावं लागेल. हा समारंभातील पुरस्काराला अनुसरुन स्वागताध्यक्ष रविप्रकाश कुलकर्णी, सत्कारमूर्ती संमेलनाध्यक्ष अरुण शेवते, कथालेखिका सृष्टी कुलकर्णी, झीचे तरुण संपादक निलेश मसेकर यांनी यावेळी आपले मनोगत खुल्या दिलाने व्यक्त केले. त्यातील महत्त्वाचे विचार म्हणजे, त्या व्यक्तीची आपल्या उद्देशामागील तळमळ ही होती.
  
प्रमुख पाहुणे भारतकुमार राऊत यांनी लेखकांच्या यशाचं सूत्र म्हणजे, आता तंत्रज्ञानाचा कुशल वापर कसा व्यवहार्य ठरु शकतो, याचा स्वानुभव सांगून पटवून दिले. याचा विचार प्रेक्षकांना लगेच पटला हे ही खरं. त्यानंतर एका परिसंवादाचे आयोजन केले होते. विषय होता, ‘न्यूड चर्चा’. याचं सुत्रसंचालन रविप्रकाश कुलकर्णी यांनी केलं, तर दीपक पवार, ॠषिकेश जोशी आणि शरद पोंक्षे त्यात सहभागी झाले होते. दिवसभर साठ एक तास असून आलेल्या या सोहळ्यात तरीही खरी चर्चा होत होती ती अशोक मुळ्ये यांच्या उत्सवी, उत्साही वागण्याची बोलण्याची. स्पष्ट बोलण्यातून कुणीही दुखावला न जाता उलट त्याला ती शाबासकीची थाप वाटावी आणि चिमटा जरी कुणाला काढला तरीही ती त्याला गुदगुली वाटावी, असा मुळ्ये काकांचा (सु)संवाद. त्यामुळे या माझ्या पुरस्कारात ‘मजा’ आली. हा ‘मजा पुरस्कार’ सोहळा जर दूरदर्शनच्या वाहिनीवरुन कुणी प्रसारीत केला, तर एक दर्जेदार साहित्यिक आनंद रसिकांना मिळेल, असं वाटतं.
 
 
 
- रत्नाकर पिळणकर