वाचण्याचे कारण की...
 महा एमटीबी  07-Jan-2018
 
 
 
 
गुलजार या ख्यातनाम लेखकानुसार प्रेमात जसे ७ टप्पे असतात, तसे एका इंग्रजी फेसबुकच्या पेजनुसार वाचनाचे ८ टप्पे असतात. वाचकाला पुस्तकाचा शोध लागतो हा पहिला टप्पा. पुस्तकांच्या प्रेमात पडणे हा वाचनाचा दुसरा टप्पा. पुस्तक ओळख म्हणून मिरवणे हा तिसरा टप्पा. माणसांना पर्याय म्हणून पुस्तकं हा चौथा टप्पा. पुस्तकं नसानसांत भिनणं हा पाचवा टप्पा. या पाचव्या टप्प्यावरून कोसळून वाचक सहाव्या टप्प्यावर पोहोचतो आणि पुस्तकं या टप्प्यातच नसतात. सातव्या टप्प्यात पुस्तकांचा पुनर्शोध वाचकाला लागतो. आठव्या टप्प्यात पुस्तकांचा संचय करून पुस्तकांची समृद्ध संपत्ती तो निर्माण करतो आणि नवव्या शेवटच्या टप्प्यात वाचक हा पुस्तकांचा आणि ज्ञानाचा वारसा पुढच्या पिढीकडे सुपुर्द करतो.
 
पुस्तक म्हणजे माध्यम. पुस्तकाच्या माध्यमातून वाचक रसग्रहण करत असतो. वाचणारा हा ‘अक्षरनिष्ठ’ असल्याने तो पुस्तकाच्या प्रेमात पडतो. व्यक्ती तितक्या प्रवृत्ती, तसेच व्यक्ती तितक्या आवडी-निवडी. पुस्तकाच्या माध्यमातून वाचक रसग्रहण आणि ज्ञानग्रहण दोन्ही करत असतो. पण प्रश्न असा आहे की, पुस्तक वाचण्याचा हेतू फक्त रसग्रहण आणि ज्ञानग्रहण इतकाच असतो का? तर नाही.
 
‘Shawshank redemption' या हॉलिवूड चित्रपटात मुख्य भूमिकेत असलेला ऍन्डी तुरुंगात वाचनालय उभारतो. त्याचा सहकारी मित्र सांगतो की, कुणी वाचनालय उघडतं, कुणी दगडाच्या मूर्ती बनवतं. हे सगळं करण्याचे कारण असे की, तुरुंगात वेळ जात नाही. मन आणि मेंदू व्यग्र ठेवण्यासाठी लोकं हे सगळे उपद्व्याप करत असतात. तुरुंगरुपी जीवनात मन गुंतण्यासाठी व्यक्ती वाचन करीत असतो. माणसं मतलबी झालेली असतात, तेव्हा व्यक्ती पुस्तकांवर आणि मुक्या प्राण्यांवर प्रेम करतो. आपली दुःख, विवंचना विसरण्यासाठी झोप आणि रसग्रहण या दोन महत्त्वाच्या गोष्टी. या दोन गोष्टीमुंळे का होईना, माणूस आपले दुःख काही वेळेसाठी तरी किमान विसरतो. माणसाचे दुःख गदिमांनी आपल्या कवितेत मांडलेच आहे- एक धागा सुखाचा, शंभर धागे दुःखाचे, असे ते मानवी जीवनातील सुखदुखाच्या चक्राचे मोजक्या शब्दात वर्णन करतात.
 
पुस्तक वाचण्याची इतरही कारणे आहेत. पुस्तक वाचण्यासाठी साक्षर असणे ही एकमेव अट असते. तसेच पुस्तक हे तुलनेने स्वस्त माध्यम आहे. पण, स्वस्त असलेल्या माध्यमाची रसग्रहणाची ताकद मात्र मोठी आहे. एखादा चित्रपट पाहून जितका आनंद मिळत नाही, तितका आनंद एखादे पुस्तक वाचून वाचणार्‍याला मिळू शकतो. एखाद्या आशयघन कादंबरीवर चित्रपट बनवल्यास वाचकाला कादंबरी जास्त भावते. कारण, त्यात लेखकाने वापरलेली कल्पनाशक्ती. दृश्य माध्यमात दिग्दर्शकाला ती कल्पनाशक्ती यशस्वी करता येते, असे नाही. दुर्दैवाने, भारतीय चित्रपट फार मागे आहेत. हॉलिवूड चित्रपट यात अग्रेसर आहेत. तसंच पुस्तक ही मोफत सुद्धा उपलब्ध असतात. दृश्य स्वरूपातील किंवा ऐकीव स्वरूपातील माध्यमांचा उपभोग घेण्यासाठी विशिष्ट तंत्रज्ञानाची आणि ते वापरण्याचे कौशल्य अंगी असणे गरजेचे असते. पण, पुस्तक वाचण्यासाठी फक्त साक्षर असणे गरजेचे असते. वेळ कसा घालवायचा, हा प्रश्न वाचकाला पडतच नाही; बहुधा पुस्तकं त्याच्या दिमतीला असतातच.
 
पुस्तकांचा एक दोष (की वाचकांचा?) असा की, ती दृश्य माध्यमांइतकी परिणामकारक नसतात, पण विश्वासार्ह असतात हे नक्की. एखादा संदर्भ देताना लोक म्हणतातच की, अमुक एका पुस्तकात हा संदर्भ आला आहे. उजेडात वाचलेलं पुस्तक इतका परिणाम करत नाही, तितका अंधारात पाहिलेला एखादा चित्रपट करतो. पण, कुठल्याही माध्यमातील आशय हा केंद्रस्थानी असतो, सादरीकरण दुय्यम बाब असते आणि रसग्रहण करणारा खरा रसिक माध्यमाचा विचार करत नाही.
 
कुठलीही गोष्ट एकांगी असू नये, हा नियम वाचनालाही लागू होतो. विशिष्ट विचारसरणीची पुस्तकं वाचल्यास विशिष्ट विचारसरणीचाच माणूस व्हायला वेळ लागत नाही. उलट चौफेर वाचन असलेला व्यक्ती किंवा दोन्ही बाजू वाचल्यावर व्यक्ती योग्य मतावर पोहोचतो. एका विशिष्ट विचारसरणीला वाहून घेणे चुकीचे नाही परंतु तेवढी सहिष्णुता अंगी बाळगणे गरजेचे असते. भक्त म्हटले की व्यक्त व्हायला मर्यादा येतात हे लक्षात घेणे गरजेचे आहे. कुठलीही व्यक्ती, विचारसरणी, संस्था, संघटना परिपूर्ण नसते. गुण-दोष हे सगळ्यांच्या अंगी असतात, याचा विसर पडता कामा नये. पुस्तकं निर्जीव असतात, पण ती संपूर्ण खुलतात. लेखक हातचं राखून लिहितही असेल कदाचित, पण पुस्तक हातचं राखून बोलत नाहीत. निर्जीव पुस्तकं आपल्याकडे सर्वस्व अर्पण करतात. एखाद्या व्यक्तीकडून ही अपेक्षा नसते, पण ओठात एक आणि पोटात एक ही वृत्ती पुस्तकात नसते म्हणून माणसांचा पर्याय म्हणून व्यक्ती पुस्तकांना पसंती देतो. पण, आपल्या कोशात राहणे हे मनुष्याला शक्य नसते. त्याची परिणती नैराश्यातही होऊ शकते. मग व्यक्ती लोकांशी संपर्क ठेवतो, संबंध कमी. जास्त लोकांशी संपर्क ठेवून तो मनस्ताप कमी करण्याचा प्रयत्न करतो. पुस्तकांचे तसे नाही. जास्त पुस्तकांशी संबंध आल्यास व्यक्ती तितकाच समृद्ध होतो. ही समृद्धी फक्त आंतरिक नसते ती बौद्धिक, शैक्षणिक, सामाजिक, आर्थिक अशी प्रत्येक अंगाने येते.
 
 

 
 
वाचक किंवा ज्ञानार्जन करणारा ‘लक्ष्मी विरूद्ध सरस्वती’ या द्वंद्वात पडतच नाही. तो सरळ सरस्वतीचाच पूजक असतो. सरस्वती प्रसन्न झाली की लक्ष्मी प्रसन्न होतेच, हा साधारण अनुभव सगळ्यांनाच येतो. ज्येष्ठ लेखक राजन खान म्हणतात की, ‘‘ज्ञान असून उपयोग नाही, ज्ञानाचा उपयोग कसा करावा, त्याचेही ज्ञान असावे.’’ पुस्तक वाचून अंतर्मुख होऊन त्याचे चिंतन करत नसेल, तर तो खरा वाचक नाही. वाचन फक्त मनोरंजन आणि वेळ घालवण्याचे साधन नाही. वाचनाने जर तुम्ही अंतर्मुख होत नसाल, आत्मपरिक्षण करत नसाल तर तुमचं वाचन कुठे तरी चुकतंय. वाचन ही काय पात्रता नव्हे. वाचनानंतर तुमच्या आयुष्यात ज्या सकारात्मक गोष्टी घडतात, ती तुमची पात्रता असते. मग ती सृजनशील आशय निर्मिती असो, व्यक्तिमत्त्व विकास असो किंवा स्वभावात पडलेला फरक. तुमच्या आयुष्यात सकारात्मक बदल घडत नसेल, तर पुस्तकं वाचण्यात तुम्ही कुठे तरी कमी पडताय हे नक्की!
 
पण काही असो. वाचनाचे फक्त फायदे आहेत, तोटे नाही. माणूस हा व्यवहारी असतो. फायदे-तोटे पाहून तो आयुष्यात निर्णय घेत असतो. कमी तोटे, धोके पत्करून जास्त फायदे कसे पदरात पडतील, हे लक्षात घेऊन तो चालत असतो.वाचनाचे निव्वळ फायदे असल्याने, वाचत नसाल तर वाचायला सुरूवात करायला काय हरकत आहे?
 
 
 
- तुषार ओव्हाळ