चालुक्य वंश
 महा एमटीबी  07-Jan-2018
 

 
दक्षिणेत विशेषतः कर्नाटक व महाराष्ट्रात पाचव्या शतकात उदयास आलेला हा एक प्रसिद्ध वंश. या वंशाची एक शाखा म्हणजे बदामीचे चालुक्य व त्यांचे वंशज कल्याणीचे चालुक्य. याशिवाय त्यांच्या इतर लहान शाखा गुजरात, तेलंगण व इतरत्र पसरल्या होत्या. बदामी हे उत्तर कर्नाटकातल्या बागलकोट जिल्ह्यातले एक शहर आहे. वातापि या नावानेही ओळखले जाणारे हे शहर इ.स. ६ ते ८ या शताब्दीपर्यंत चालुक्यांची राजधानी म्हणून ओळखले जात असे.
 
वेंगीचे चालुक्य
वेंगीचे चालुक्य घराणे : यांचा कालखंड इ.स. ६१५ ते ९७० असा आहे. चालुक्य घराण्याच्या चार वेगवेगळ्या शाखा भारतातल्या वेगवेगळ्या भागांवर राज्य करीत होत्या. त्यापैकी पूर्व भारतातल्या आंध्र प्रदेशात वेंगीच्या चालुक्य घराण्याची स्थापना विष्णुवर्धन या चालुक्य सम्राटाने केली.
 
चालुक्य वंशाचे पहिले राजघराणे कर्नाटकातील वातापी येथे स्थापन झालेले होते. वेंगीच्या चालुक्य घराण्याची स्थापना करणारा विष्णुवर्धन हा वातापिच्या चालुक्य घराण्यातील राजा दुसरा पुलकेशी याचा भाऊ होता. दुसर्‍या पुलकेशीला पूर्व भारत जिंकून घेण्याच्या कामात विष्णुवर्धनाने मोलाचे साहाय्य केले होते. त्यामुळे दुसर्‍या पुलकेशीने विष्णुवर्धनला पूर्व भारताचा राजप्रतिनिधी नियुक्त केले. त्यानंतर अल्पावधीतच विष्णुवर्धनाने स्वतंत्र राज्याची घोषणा करून ’महाराज’ ही पदवी धारण केली. विष्णुवर्धनने वेंगी हे नगर आपल्या राज्याची राजधानी बनवले. दक्षिण कोसल, कलिंग व नेल्लोरपर्यंतचा पूर्व भारतातील प्रदेश त्याच्या राज्यात अंतर्भूत होता. त्याच्या मृत्यूनंतर सुमारे चारशे वर्षांपर्यंत वेंगीचे चालुक्य घराणे पूर्व भारतात राज्य करीत होते. विष्णुवर्धनच्या मृत्यूनंतर त्याचा मुलगा जयसिंह राजा झाला. याच्या काळात पल्लव सम्राटाकडून बदामीच्या चालुक्यांवर आक्रमण करण्यात आले त्यांनी वेंगीच्या चालुक्याकडे म्हणजेच जयसिंहाकडे मदत मागितली. पण जयसिंहाने त्यांना मदत केली नाही. इ.स. ७५३ मध्ये बदामीच्या चालुक्यांचा अस्त झाला व तिथे राष्ट्रकूटांची सत्ता आली. जोपर्यंत बादामी येथे चालुक्य वंशाची सत्ता कायमहोती, वेंगीच्या चालुक्यांना उत्कर्षाची संधी मिळाली नाही. पण इ.स. ७५३ मध्ये राष्ट्रकूटांनी चालुक्यांची सत्ता संपुष्टात आल्यानंतर वेंगीच्या राजवंशात अनेक प्रतापी राजा होऊन गेले, ज्यांनी राष्ट्रकूट आणि शेजारी राज्यांवर आक्रमण करून युद्धे केली. यांच्यात विक्रमादित्य द्वितीय (७९९-८४३) आणि विजयादित्य तृतीय (८४३-८८८) यांचा विशेष उल्लेख होतो. या दोन्ही राजांनी राष्ट्रकूटांच्या प्रचंड सामर्थ्यासमोर आपले वर्चस्व अबाधित राखले. यांच्या पश्चात झालेल्या राजांनीही यशस्वीपणे आपले स्वातंत्र्य बराच काळ राखून ठेवले होते.
 
दहाव्या शतकाच्या अंती वेंगी चालुक्यांना चोळराजा राजराज प्रथम याच्या स्वरूपात एका नव्या आव्हानाला सामोरे जावे लागले. आतापर्यंत राष्ट्रकूटांचे सामर्थ्य क्षीण झाले होते आणि कल्याणी नगराला आपली राजधानी बनवून चालुक्य पुन्हा एकदा दक्षिणेचे सम्राट झाले होते. चोळसम्राटाने केवळ कल्याणीचा राजा सत्याश्रय यालाच नव्हे, तर वेंगीच्या चालुक्य राजालाही पराभूत केले होते. यासमयी वेंगीचा राजा शक्ती वर्मा याने चोळसम्राटाचा पुरेपूर समाचार घेतला आणि अनेक युद्धांमध्ये विजय मिळवला. परंतु, त्याचा उत्तराधिकारी विमलादित्य याने मात्र चोळसम्राटापुढे शरणागती पत्करली.
 
चोळराजा राजराज प्रथम याने विमलादित्याबरोबर आपल्या मुलीचा विवाह करून त्याला आपला सहायक बनवले. विमलादित्य याच्यानंतर त्याचा पुत्र विष्णुवर्धन चालुक्य नरेश झाला. त्याचा विवाहदेखील चोळ वंशाच्या राजकुमारीबरोबर झाला. त्याचा पुत्र राजेंद्र हा ’कुलोत्तुंग’ या उपाधीने चालुक्य सम्राट ठरला. त्याचा तसेच इतरही वेंगी चालुक्य नरेशांचा विवाह संबंध चोळ राजकुमारींबरोबर झाल्याने चोळ आणि चालुक्यांमध्ये घनिष्ठ संबंध प्रस्थापित झाले.
 
चोळराजा अधिराजेंद्र याला संतती नसल्याने इ.स. १०७० मध्ये त्याच्या मृत्यूनंतर वेंगीचा चालुक्य नरेश राजा राजेंद्र कुलोत्तुंग याने चोळ वंशाचे राज्य प्राप्त केले. तो चोळ राजकुमारीचा पुत्र असल्याने चोळ आणि वेंगीचे चालुक्य राज्य अशी दोन्ही साम्राज्ये एकत्र आली आणि राजेंद्र कुलोत्तुंग याच्या वंशजांनी या दोन्ही साम्राज्यांचा बरीच वर्षे उपभोग घेतला. कल्याणीच्या चालुक्य वंशाने दक्षिणेत बराच मोठ्या भूभागावर आपले वर्चस्व अबाधित ठेवले होते आणि अनेक प्रतापी चालुक्य राजांनी दक्षिणेत चोळ, पांड्य आणि केरळपर्यंत व उत्तरेत बंग, मगध आणि नेपाळपर्यंत आपले साम्राज्य वाढवले. मात्र बाराव्या शतकाच्या अंती चालुक्यांची शक्ती क्षीण होत गेली तेव्हा त्यांच्या अनेक सामंतांनी त्यांच्यापासून विभक्त होऊन आपली स्वतंत्र राज्ये स्थापली. चालुक्यांच्या अभिलेखात अशा अनेक मंत्र्यांच्या तसेच अधिकार्‍यांच्या नावांची नोंद आहे, ज्यांनी चालुक्यांचे साम्राज्य वाढावे, यासाठी अतोनात प्रयत्न केले. हे अधिकारी एकाचवेळी अनेक पदांवर कार्य करीत असत. राजाच्या सैन्यदलात विशिष्ट गौरवप्राप्त अधिकारी आणि सैनिकांचे ’सहवासी’ नावाचे असे एक पथक असे, जे सदैव त्याच्याबरोबर असे आणि वेळप्रसंगी राजाच्या जिवाला धोका निर्माण झाल्यास आपल्या प्राणांचे बलिदान करण्यासही मागेपुढे पाहात नसत.
 
सैन्यात सर्व जातीधर्माच्या लोकांचा समावेश असे. सेनाधिपती, दंडनायक, महादंडनायक, कतितुरगसाहिनी असा सैन्यातील अधिकार्‍यांचा उल्लेख अभिलेखात आढळतो. शासनव्यवस्थेत स्थानिक संस्थांना विशेष महत्त्व असे. त्यातील काहींचे स्वरूप सामाजिक तसेच धार्मिक असे. नगराचा कारभार पाहणार्‍या सभा ’महाजन सभा’ या नावाने लोकप्रिय होती. गावातील सामूहिक संस्थांचा कारभार हा परस्पर संमतीने आणि सहकार्याने होत असे. गावातून संकलित केल्या जाणार्‍या करांना पन्नाय, दंडाय, अरुवण, बल्लि, करवंद, तुलभोग आदी नावांनी संबोधले जात असे. घरावरील कराला ’मनेवण’ म्हटले जात असे, तर नर्तिकांकडून ’कन्नडिवण’ गोळा केला जात असे. विवाहासाठी तयार करण्यात आलेल्या शामियानावरही (मंडप) कर आकारला जात असे. या काळाची संस्कृती उदार तसेच विशाल होती. या काळात स्त्रियांवर फारशी बंधने नव्हती. उच्चवर्गातील स्त्रियांना शिक्षण घेण्याची मुभा होती. सतीप्रथेचाही उल्लेख या कालखंडात आढळतो. तसेच या कालखंडात नर्तिकांचाही उल्लेख बर्‍याच प्रमाणात आढळतो. आपल्या दिवंगत नातलगांच्या स्मृतिप्रीत्यर्थ एखाद्या वास्तूचे निर्माण ’परोक्षविनय’ म्हणून ओळखले जात असे. या काळातील अभिलेखात ’पोलो’ शी साधर्म्य असलेल्या एका खेळाचा उल्लेख आढळतो. चालुक्य वंशाची मंदिरे ही सामाजिक तसेच आर्थिक साम्राज्याची केंद्र असत. ज्यांच्यात नृत्य, गीत अथवा नाटकांचे आयोजन केले जात असे.
 
शेतीतील पाण्याचे महत्त्व समजून पिकांसाठी जलाशयांचे निर्माण वा त्यांची दुरुस्ती केली जात असे. आर्थिकदृष्ट्या उपयोगी पिके उदा. पान, सुपारी, कापूस, फळे यांची पिके घेतली जात असत. इथले व्यापारी भारतातील तसेच विदेशातही व्यापार करीत असत. चालुक्यकालीन मुद्रा होत्या पोन अथवा गद्याण विस आणि काणि. जयसिंह, जगदेकमल्ल आणि त्रैलोक्यमल्ल या चालुक्य सम्राटांच्या नावावर सोन्याच्या तसेच चांदीच्या मोहरा उपलब्ध होत्या. सहनशीलता आणि उदारता हे या युगाच्या धार्मिक जीवनाचे वैशिष्ट्य होते. सर्व धर्माच्या तसेच जातीच्या संप्रदायांना समान रूपात राजाकडून तसेच सामंतांकडून दानदक्षिणा मिळत असे. ब्राह्मण धर्मात शंकर आणि विष्णूची पूजा केली जात असे. यांच्या काळात संस्कृत व कन्नड भाषांमध्ये अनेक उत्तम प्रकरणे, काव्ये रचली गेल्यामुळे यांचे नाव भारतीय वाङ्‌मयात सुविख्यात झाले. इराणचा राजा द्वितीय खुसरौ याचा या वंशातील दुसरा पुलकेशी राजाशी पत्रव्यवहार व राजदूतांची देवघेव झाल्याने त्याविषयीचा एक उल्लेख एका ङ्गारसी बखरीत आढळतो.
 
यांच्या कालावधीतील नाणी अद्याप सापडली नाहीत. यांनी गुजरातेत स्थापलेल्या घराण्यातील जयाश्रय राजाचे नाणे अलीकडेच सापडले. यांनी बांधलेल्या मंदिराची स्थापत्य शैली वेगळी असल्याने कालांतराने ती ’चालुक्य शैली’ म्हणून नावारूपास आली. तत्कालीन काही अभिलेखांमध्ये त्यावेळच्या काही शिल्पकारांचाही नामोल्लेख आढळतो. जसे की शंकरार्य, नागोज आणि महाकाल. चालुक्य मंदिरांच्या बाह्यभिंतींवर आणि दरवाजांवर सूक्ष्म अलंकारिक चित्रे आढळतात. तसेच त्या काळातील प्रसिद्ध मंदिरांवरील विमाने (दगडांचे एकावर एक थर) तसेच इतर विषयांमध्येही या मंदिराचे बांधकाम विकसित होते. याचे उत्कृष्ट उदाहरण म्हणजे होयसल मंदिरे. अशाच प्रकारची उल्लेखनीय उदाहरणे म्हणजे लक्कंदी येथील काशीविश्वेश्वर, इत्तगी येथील महादेव तसेच कुरुवत्ती येथील मल्लिकार्जुन मंदिरे ही आहेत. कन्नड साहित्याच्या इतिहासात हे युग अत्यंत समृद्ध मानले जाते. कन्नड भाषेच्या स्वरूपात याच कालखंडात काही बदल झाले. याच काळात षट्‌पदी आणि त्रिपदी छंदांचा प्रयोग वाढला. साहित्य विकासात जैन विद्वानांचा सिंहाचा वाटा होता. नागवर्मा द्वितीय याने या कालखंडात काव्यालोकन, कर्नाटकभाषाभूषण आणि वास्तुकोष यांची रचना केली. कन्नड गद्याच्या विकासात वीरशैव लोकांचे विशेष योगदान होते. या काळातील जवळपास २०० लेखकांचा उल्लेख आढळतो ज्यात विशेष करून काही लेखिकाही आहेत.
 
बदामी येथे चार गुंफा मंदिरे आहेत, ज्यांपैकी ३ हिंदू मंदिरे तर १ जैन मंदिर आहे. यातील पहिली गुंफा ही भगवान शंकराला समर्पित केलेली आहे, ज्यात शंकराची १८ फूट उंच नटराजाची मूर्ती आहे, जिला १८ हात आहेत आणि जे विविध नृत्याच्या मुद्रा सादर करीत आहेत. याच गुंफेत महिषासुरमर्दिनीचीही उत्तम चित्रे कोरलेली आढळतात. दुसर्‍या गुंफेत भगवान विष्णूची चित्रे आढळतात. गुंङ्गेचे छत ब्रह्मा, विष्णू, शिव यांच्या चित्रांनी सुशोभित केलेले आहे. तिसरी गुंफा बदामीच्या त्याकाळच्या वास्तुकला आणि मूर्तिकलेचे भव्य रूप दर्शविणारी आहे. तसेच इथे बर्‍याच देवदेवतांची चित्रे आहेत तसेच इ.स.पूर्व ५७८ या कालखंडातील शिलालेख इथे आढळले आहेत.
 
चौथ्या गुंफेत मात्र प्रमुख जैन ऋषी आणि महावीर तसेच पार्श्वनाथ यांची चित्रे आढळतात. एका कन्नड शिलालेखानुसार हे मंदिर १२व्या शताब्दीतील आहे. चालुक्यांनी प्रशासन, धर्म, साहित्य, कला या सर्वांना प्रोत्साहन तर दिलेच पण त्यांच्या उत्कर्षासाठी स्वतः जातीने लक्ष दिले.
 
बदामीच्या चालुक्यांनी जवळपास २०० वर्षे राज्य केले. त्यांचा अखेरचा राजा कीर्तिवर्मन याचा राष्ट्रकूट नरेश दंतिदुर्गने पराभव केला आणि संपूर्ण चालुक्य साम्राज्य आपल्या राष्ट्रकूट साम्राज्यात सामावून घेतले. अशातर्‍हेने एका समृद्ध, पराक्रमी साम्राज्याची इतिश्री झाली. परंतु, आपल्या पराक्रमाने तसेच आपल्या विशिष्ट अशा स्थापत्त्यशैलीमुळे हे घराणे सर्वदूर कीर्तिमान ठरले.
 
 
 - रश्मी मर्चंडे