महाराष्ट्राला मिळणार नवीन सुरेल आवाज!

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

Total Views |


 
महाराष्ट्र आणि सांस्कृतिक क्षेत्राचं नातं सर्वांनाच परिचित आहे. त्यातही संगीताशी असलेलं नातं अतूट आहे. अगदी वसंतराव, प्रभाताई, लतादीदींपासून ते अगदी आजच्या पिढीचं प्रतिनिधित्व करणारे अजय, राहुल, महेश, बेला, आर्यापर्यंतची या सर्वांनीच संगीत क्षेत्रात आपल्या वेगळ्या शैलीने आपले स्थान निर्माण केले आहेत. ही तर उदाहरणादाखल घेतलेली नावं आहेत, ही यादी पूर्ण करायची झाली तर प्रत्येक नावावर एक लेख होऊ शकेल एवढं त्यांचं या क्षेत्रातील कर्तृत्व मोठं आहे. जुन्या जाणत्या तसेच अनुभवी गायकांना जसा रसिकांचा प्रतिसाद मिळतो तसाच तो नवोदितांनाही मोठ्या प्रमाणात आजपर्यंत मिळाल्याचा इतिहास आहे.
 
अशाच एका नवोदित गायकाचा उदय येत्या रविवारी (७ जानेवारी) महाराष्ट्रात होणार आहे. निमित्त आहे ते, 'सा रे ग म प - घे पंगा कर दंगा' या 'रिऍलिटी शो'चे. गेल्या काही आठवड्यांपासून झी मराठी वाहिनीवर हा कार्यक्रम चालू असून यात अनेक नवख्या गायकांनी आपले नशीब आजमावले. अभिजित सावंत, अभिजित कोसंबी हे तारे अशाच कार्यक्रमातून आपल्या समोर आले आणि त्यातूनच नवीन नवीन आवाज आपल्याला ऐकण्याची संधी मिळाली. 'झी मराठी'ने सातत्याने असे तारे शोधून काढण्यासाठी ठराविक कालावधीनंतर अशा कार्यक्रमाचे आयोजन केले. 'सा रे ग म प - घे पंगा कर दंगा' हा कार्यक्रम आजपर्यंत झालेल्या स्पर्धात्मक कार्यक्रमातील सर्वात कमी कालावधीचा ठरला. खूपच कमी 'एपिसोड'मधून महाराष्ट्राला एक नवा आवाज मिळणार आहे.
 
 
पुणे, मुंबई, लातूर, सांगली, यवतमाळ, अहमदनगर, इंदोर या शहरातून आलेल्या 'दंगेखोर' गायक अंतिम १२ मध्ये आपले स्थान निश्चित केले आहे. यातील प्रत्येकाचा इथपर्यंतचा प्रवास खरोखरच वाखाणण्याजोगा आहे. अंतिम फेरीत पोहचलेले तीन गायक पुण्याचे आहेत व एक मुंबईचा आहे. यानिमित्ताने मुंबई तरुण भारताच्या विशेष प्रतिनिधींनी पुणे-मुंबईच्या या अंतिम फेरीतील गायकांशी संवाद साधला व थोडक्यात त्यांची प्रतिक्रिया जाणून घेतली.

 
''पुण्यातील कुंजीरवाडी गावात एका वारकरी कुटुंबात माझा जन्म झाला. माझी आई हार्मोनियवर भजन गायची. ते ऐकून कळत्या वयातच संगीत-गाण्याप्रती माझी आवड वाढू लागली. हीच आवड वृद्धिंगत करण्याच्या दृष्टीने मी पं. प्रकाश खेनट यांच्याकडे संगीताचे धडे गिरवायला सुरुवात केली. संगीताचे शिक्षण घेत असताना या क्षेत्रात काहीतरी करण्याची जिद्द स्वस्थ बसू देत नव्हती, म्हणूनच मग कुठे मित्रांसोबत गाण्याचे कार्यक्रम कर कुठे कॅफे हाऊस मध्ये ऑर्केस्ट्रामध्ये सहभाग घे अशा संगीताशी संबंधित असलेल्या बाबी मी करू लागलो. त्यातूनच चार पैसेही मिळू लागले. पण या सगळ्यात खरी संधी मिळाली ती 'सा रे ग म प - घे पंगा कर दंगा'मुळेच. ऑडिशन ते अंतिम फेरीचा प्रवास माझ्यासाठी खरंच स्वप्नवत आहे, पण अंतिम फेरीत विजेता होऊन मी हे स्वप्न जगण्याचा नक्कीच प्रयत्न करीन.'' 
- प्रेमनाथ कोतवाल (पुणे)

''माझे आणि झी मराठीचे नाते तसे लहानपानापासूनच. कारण झी मराठीच्या 'सारेगमप लिटिल चॅम्प्स'च्या पर्वात अंतिम विसात मी त्यावेळी धडक मारली होती. खरंतर आयुष्यात 'डान्सर' होण्याचं माझं स्वप्न होतं , लाहपनपासूनच गाणं लागलं की आपोआपच माझे पाय थिरकायचे ते नृत्यासाठीच. पण 'सारेगमप'च्या लिटिल चॅम्प्सची ऑडिशन दिली आणि माझ्या कडे नृत्यशिवाय गायनाचेही कौशल्य असल्याचे माझ्या पाल्यांच्या व माझ्या लक्षात आले. मग पुढे मी पं. रघुनंदन पणशीकर यांच्याकडे शास्त्रीय गाण्याचं शिक्षण घेण्यास सुरुवात केली. शिक्षण चालू असतानाच पुन्हा एकदा 'सा रे ग म प - घे पंगा कर दंगा'च्या रूपाने नव्या संधीने दार ठोठावलं आणि मी यावेळी मात्र संधीचं सोनं करण्याचा निर्णय घेतला. माझ्या निर्णयाला न्याय देत मी आज अंतिम फेरीत येऊन पोहचलो आहे. माझी गिटार जशी सावलीसारखी माझ्या सोबत असते तसेच ' 'सा रे ग म प'च्या या पर्वाचे विजेतेपदतही भविष्यात माझी सोबत करेल अशी माझी अपेक्षा आहे.''
-अभिषेक सराफ (पुणे)

 ''पुण्याच्याच नजीक असणाऱ्या पिंपरी-चिंचवड मध्ये मी राहतो. गाण्याची खूप आधीपासूनच आवड होती, पण मी कोणत्याही प्रकारचे अधिकृत शिक्षण घेतले नाही. टीव्ही, रेडिओ किंवा जाहीर कार्यक्रमातून गाणी ऐकत ऐकतच मी संगीताचं शिक्षण घेतलं. दरम्यानच्या काळात पुण्यातील 'एल अँड टी' मध्ये नोकरी लागली, पण तरीही मी गाण्याचा माझा छंद जोपासातच राहिलो. अशातच 'सा रे ग म प - घे पंगा कर दंगा' स्पर्धा होणार असल्याचे कळाले. वेस्टर्न, सॉफ्ट रोमँटिक ही माझी गाण्यातील आवड, पण 'सा रे ग म प'च्या ऑडिशन पासून ते अंतिम फेरीपर्यंत विविध ढंगांची गाणी गाण्याची संधी मिळाली. विशेष म्हणजे मी म्हणलेल्या 'गेले ते दिन गेले' किंवा 'याड लागलं' या गाण्यांना परीक्षकांची चांगली दाद मिळाली. बायको आणि आईच्या पाठिंब्यामुळे इथवरचा प्रवास यशस्वी करू शकलो आहे. 'सा रे ग म प - घे पंगा कर दंगा'चा विजेता होऊन तुम्हा सर्वांचा पाठिंबाही मिळवण्यासाठी मी प्रयत्नशील राहीन''

-अक्षय घाणेकर (पुणे)

 

''मी मोठेपणी 'पायलट' होईन असं शाळेत असताना ठरवलं होतं. पण अनावधानाने शाळेतल्या गायन स्पर्धेत एकदा भाग घेतला आणि प्रथम क्रमांकाचं बक्षीसही मिळवलं. इथूनच माझा गाण्याचा प्रवास सुरु झाला. पुढे मी सौ. वर्षा भावे व पं. सुरेश बापट यांच्याकडून शास्त्रीय आणि सुगम संगीताचे शिक्षण घेतले. एक पाऊल पुढे जात आपल्या गाण्याला अभिनयाची साथ देण्यासाठी 'संगीत मत्स्यगंधा' या नाटकात मी पराशर ऋषींची भूमिकाही केली. संगीत नाटकाचा काळ संपला अशी ओरड असतानाही मी यामध्ये काम करण्याचा निर्णय घेतला व त्याचा मला फायदाच झाला. 'सा रे ग म प'च्या माध्यमातून मला माझी ओळख निर्माण करण्याची संधी मिळाली आहे आणि ही संधी मी दवडू देणार नाही!''
-नचिकेत लेले (कल्याण, मुंबई)

 

असा असेल महाअंतिम सोहळा

उद्या म्हणजेच ७ जानेवारीला दुपारी १२ ते रात्री १० वाजेपर्यंत हा महाअंतिम सोहळा “लाईव्ह” रंगणार आहे. ह्यातूनच महाराष्ट्राला "पंगेखोर" महाविजेता मिळणार आहे, महाविजेत्याला ५ लाख रुपयांचेबक्षिस, त्यासोबत झी मराठीच्या मालिकेचं शीर्षक गीत गाण्याची संधी मिळणार आहे. तर “द्वितीय क्रमांका” ला मिळतील ३ लाख रुपये आणि “तृतीय क्रमांका” ला २ लाख रुपये बक्षीस त्यासोबतच झी मराठीच्या मालिकेचं शीर्षक गीत गाण्याची संधी देखील मिळेल. या सोहळ्यात रवी जाधव, बेला शेंडे आणि स्वानंद किरकिरे या परीक्षकांसोबत अन्नु कपूर हे विशेष परीक्षक म्हणून उपस्थित राहणार आहेत. त्याचबरोबर अक्षय कुमार देखील महाअंतिम सोहळ्यासाठी विशेष अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत..


हे आहेत महाअंतिम सोहळ्यातील १२ 'दंगेखोर' स्पर्धक
१. प्रेमनाथ कोतवाल (पुणे) २. अभिषेक सराफ (पुणे) ३. अक्षय घाणेकर (पुणे) ४. नचिकेत लेले (कल्याण)
५. केतकी चैतन्य (रत्नागिरी) ६. सिद्धी बोन्द्रे (रत्नागिरी) ७. सरस्वती बोरगावकर (लातूर)
८. अभिषेक तेलंग (सांगली) ९. आदिश तेलंग (सांगली) १०. उज्वल गजभार (यवतमाळ)
११. योगेश रणमळे (अहमदनगर) १२. अनुजा झोकरकर (इंदोर)

 
 
@@AUTHORINFO_V1@@