'एसडब्लूपी' म्यूचुअल फंड : सोपी व फायदेशीर गुंतवणूक
 महा एमटीबी  06-Jan-2018 'एसडब्लूपी' हा म्यूचुअल फंडातील गुंतवणुकीचा एक पर्याय आहे, विशेषत: ज्यावेळी आपल्याला एकाच वेळेस मोठी रक्कम मिळालेली असते मात्र त्यानंतर आपल्याला त्यातून नियमित उत्पन्न हवे असते, (उदा: रिटायरमेंटच्या वेळी मिळालेली भविष्य निर्वाह निधी, ग्राच्यूयीटी, लिव एन्काशमेंट आदी.) त्यावेळी या गुंतवणूक प्रकारचा फायदा घेता येऊ शकतो. अशी रक्कम आपल्याला पुन्हा मिळणार नसते, किंवा घर, जमीन, यासारख्या विक्रीतून आलेली रक्कम ही सुद्धा आपल्याला पुन्हा पुन्हा मिळणार नसते. अशी रक्कम प्रामुख्याने बँकेत किंवा पोस्टात दरमहा अथवा तिमाही व्याज मिळेल अशा रीतीने गुंतविली जात असल्याचे दिसून येते. मात्र सध्याचे ढासळते व्याज दर पाहता पोस्टात रक्कम गुंतविणे आता तितकेसे फायदेशीर ठरत नाही मग अशा वेळी म्यूचुअल फंडात एसडब्लूपी पद्धतीने केलेली गुंतवणूक निश्तितच फायदेशीर ठरू शकते. काय आहे ही योजना हे आता आपण पाहू.


या पद्धतीत म्यूचुअल फंडाच्या आपल्या सोयीच्या योजनेत एकरकमी पैसे गुंतविले जातात व त्यातून दरमहा/तिमाही/सहामाही/वार्षिक आपल्या गरजेनुसार नियमित ठराविक रक्कम आपल्याला दिली जाते व ही देण्यात येणारी रक्कम रोख न मिळता आपल्या बँक खात्यात जमा केली जाते. अशी गुंतवणूक करताना आपण आपल्या जोखीम घेण्याच्या क्षमतेनुसार गुंतवणुकीचा पर्याय निवडू शकतो, आपल्याला जर शेअर बाजाराची जोखीम घेणे शक्य असेल तर आपण इक्विटी फंडात गुंतवणूक करू शकता, जर आपल्याला इतकी जास्त जोखीम घ्यायची नसेल तर आपण बॅलन्स फंडात गुंतवणूक करू शकता (यातील शेअर बाजारातील गुंतवणूक सुमारे ६५ टक्के इतकी असू शकते.) मात्र जर आपल्याला शेअर बाजारातील जोखीम घ्यायची नसेल तर आपण डेट फंडात गुंतवणूक करू शकता. मात्र मिळणारा रिटर्न इक्विटी मध्ये सुमारे १४ ते १५ टक्के इतका, तर बॅलंसमध्ये सुमारे ११ ते १२ टक्के असतो. हेच डेट मध्ये सुमारे ९ ते १० टक्के इतका मिळू शकतो. मात्र अशी कोणत्याही प्रकारची खात्री कोणतीही कंपनी देत नाही.


इक्विटी व बॅलंस फंडातील एका वर्षानंतर काढलेल्या रकमेवर दीर्घ कालीन भांडवली नफा कर (लॉंग टर्म कॅपीटल गेन टॅक्स) लागू होत नसल्याने यातील आपणास हवी असणारी नियमित रक्कम (दरमहा/तिमाही/सहामाही/वार्षिक) रक्कम गुंतविल्यावर एक वर्षानंतर घेणे जास्त फायदेशीर ठरू शकते. आपण जर रु.३० लाख इतकी रक्कम गुंतविली आणि ९ टक्के दराने मिळणाऱ्या रकमेइतकी रक्कम दरमहा घेतली (पेन्शन प्रमाणे ) तर ५ वर्षानंतर आपली गुंतवणूक वर उल्लेखलेल्या पर्यायानुसार खालीलप्रमाणे असेल.

 

१) गुंतवणूक पर्याय इक्विटी अपेक्षित रिटर्न १५ टक्के :
३०००००० X ९ = २७०००० 
नियमित रक्कम एका वर्षानंतर रु. २७००००/१२ = २२५०० 
दरमहा घेतल्यास ६ वर्षानंतर सुमारे ५० लाख परत मिळतील

 

 
२) गुंतवणूक पर्याय बॅलंस फंड अपेक्षित रिटर्न १२ टक्के :
३०००००० X ९ = २७०००० 
नियमित रक्कम एका वर्षानंतर रु. २७००००/१२ = २२५०० 
दरमहा घेतल्यास ६ वर्षानंतर सुमारे ४० लाख परत मिळतील

 

 
३) गुंतवणूक पर्याय डेट फंड अपेक्षित रिटर्न १० टक्के :
३०००००० X ९ = २७०००० 
नियमित रक्कम एका वर्षानंतर रु. २७००००/१२ = २२५०० 
दरमहा घेतल्यास ६ वर्षानंतर सुमारे ३५ लाख परत मिळतील

 

 

याउलट पोस्टात हीच रक्कम गुंतविली तर सध्याच्या व्याज दरानुसार जेमतेम रु.१७५०० एवढीच रक्कम दरमहा मिळू शकेल शिवाय ५ वर्षानंतर मिळणारी रक्कम वाढणारही नाही. (रु ३० लाख वरील उदाहरणातील) यावरून आपल्या असे लक्षात येईल कि एकरकमी मोठ्या गुंतवणुकीतून जर आपल्याला काही रक्कम नियमित हवी असेल तर म्युचुअल फंडाची एसडब्लूपी ही गुंतवणूक योजना बँक अथवा पोस्टातील गुंतवणुकीपेक्षा नक्कीच किफायतशीर आहे मात्र त्यासाठी आपली जोखीम घेण्याची क्षमता विचारता घेऊन योग्य तो पर्याय निवडणे आवश्यक आहे.


- सुधाकर कुलकर्णी

सर्टिफायीड फायनान्सियल प्लॅनर, पुणे