युरोपमय सह्याद्री
 महा एमटीबी  06-Jan-2018
 
 
सर्वसाधारणपणे आपल्याकडे भारतीय निसर्ग सौंदर्याला युरोपच्या सौंदर्याशी तुलना केलेली दिसते. पण ह्यात होतं असं की, बहुतांश वेळा युरोपचंच पारडं जड असतं कारण भारतीय निसर्ग संपदा ही जगासमोर तितक्या प्रकर्षाने येत नाही. किंबहुना आपल्याकडे तसे प्रयत्न करणारे निवडक लोकं आहेत. ह्याचा अर्थ आपलं सौंदर्य कमी आहे असं मुळीच नसून ते फक्त आपण जगासमोर ताकदीने मांडत नाही असं मला नेहमी जाणवतं. ह्या लेखाच्या माध्यमातून मला एक कळकळीची विनंती समस्त छायाचित्रकार आणि निसर्ग प्रेमींना करायची आहे की, गड्यांनो जितकं जमेल तितका आपला देश आणि त्याचं नेत्रदीपक सौन्दर्य हे जगाला दाखवा. मी तर तसा वासाच घेतलाय. ह्या माझ्या निःस्वार्थ मोहिमेत तुम्ही सुद्धा सामील व्हा. साऱ्या जगाला हेवा वाटेल असा भारत आपण मांडूया.
 
 
तुम्ही म्हणाल की, आजच्या लेखात हे युरोप प्रकरण कसं काय आलं ? त्याचं झालं असं की, वर तुम्ही जे छायाचित्र बघताय त्याची कहाणी युरोपशी जुळते. माझ्या काही निवडक गाजलेल्या फोटोपैकी हा एक. पण हा फोटो सुंदर असला तरी ह्याला एक दुःखाची किनार आहे. आजपर्यंत ज्यांनी ज्यांनी हा फोटो बघितला त्यातल्या बहुतेक जणांनी मला असं सांगितलं की, हे अगदी यूरोपसारखंच वाटतं. मी खूप चिंतेत पडायचो की भारतीय पर्वत हे लोकांना सुंदर का नाही वाटत ? हा फोटो पाहिल्यानंतर लोकांनी मला असं का नाही विचारलं कि हा कुठचा फोटो आहे ? ते सरळ युरोपचं नाव घेऊन मोकळे झाले. अर्थात युरोप अतिशय सुंदर आहे ह्यात शंकाच नाही. पण आपल्याकडील सौंदर्यसुद्धा त्याच तोलामोलाचं आहे ही भावना निर्माण होणं मला फार महत्वाचं वाटतं. म्हणून हे सगळं सांगण्याचा खटाटोप चालवलाय. नकळतपणे भारतीय निसर्ग सौंदर्याला कनिष्ठ दर्जा देऊन आपण आपल्याच देशाचा काहीसा अपमान केल्यासारखं वाटतं मला. जग खूप सुंदर आहे आणि भारत हा त्याचाच एक अविभाज्य भाग आहे.
 
 
हे राष्ट्रप्रेम आजवरच्या सह्याद्री भटकंतीत वाढतच गेलं. मातीत राहिल्याशिवाय मातीशी नाळ जुळत नाही तसं आहे हे. निसर्ग देवतेने आपल्या देशाला किती भरभरून दान दिलंय ह्याची पावलोपावली जाणीव होते.
 
 
अशीच उनाड भटकंती करता करता मी येऊन पोचलो रायरेश्वरला. छत्रपती शिवाजी महाराजांनी ज्या भूमीत स्वराज्याची शपथ घेऊन महाराष्ट्राचा अंधःकार दूर केला ती हि रायरेश्वराची पुण्य भूमी. प्रत्येक मराठी माणसाने नतमस्तक व्हावे असे हे विस्तीर्ण , भव्य आणि पवित्र असं रायरेश्वराचे पठार. सातारा जिल्ह्यातील, पण पुण्यापासून अगदी जवळ असं हे ठिकाण अतिशय सुंदर, आणि प्रसन्न असच आहे. पठारावर असलेलं शिवकालीन शिव मंदिर हे प्राचीन भारतीय वास्तुकला ह्याचं अनोखं दर्शन घडवतं. अनेक औषधी वनस्पती आणि गर्द वनराईने नटलेला हा परिसर पाहताना डोळ्याचं पारणं फिटतं. विस्तीर्ण अश्या ढोम धरणाचे पाणी म्हणजे ह्या परिसराची संजीवनीच. त्याच्या किनाऱ्यावर केली शेती इकडच्या लोकांना सुजलाम सुफलाम बनवते. पठारावर असलेली जंगम वस्ती ह्या पठाराची मनापासून निगा राखतात. येणाऱ्या पर्यटकांना आणि माझ्यासारख्या भटक्यांना आग्रहाने खाऊ घालतात. माझ्या आजवरच्या भटकंतीत ह्या जागेचं फार मोठं महत्व आहे. इथे अनेक आठवणींचा खजिना दडलाय.
 
 
तुम्ही जे वरती छायाचित्र बघताय त्यात गांधी टोपी आकाराचा केंजळगड किल्ला अगदी स्पष्ट दिसतोय. पठारावरून अगदी समोरच दिसणारा हा एक देखणा किल्ला. मी कडाक्याच्या थंडीत रायरेश्वर मोहीम आखली होती. कारण इकडचा हिवाळा हा फारच सुंदर आणि फोटोग्राफी साठी अगदी योग्य असा मौसम. सूर्योदयाला सह्याद्री दर्शन करणे हा माझा नेहमीचा शिरस्ता. त्याप्रमाणे पहाटे उठलो खरा पण थंडीने एक इंच सुद्धा हलायची इच्छा होत नव्हती. बेफाम थंड वारा शरीर गोठून देत होता. संपूर्ण पठार साखर झोपेत असताना मी मनाचा हिय्या करून अखेर बाहेर पडलो. झोपडीच्या दरवाजा उघडताच वाऱ्याच्या थंडगार लाटेने मला गारद केले. सगळीकडदे अंधार, प्रचंड धुकं आणि सैरा वैरा वाहणारा तुफान थंड वारा. पण मनात निश्चय होताच कि काही झाला तरी सूर्योदय चा फोटो हवाच. ट्रॅव्हल फोटोग्राफरला निसर्गाची कारणं देऊन कसं चालेल ? योग्य जागा निवडून कॅमेरा आणि ट्रायपॉड उभा केला. बघता बघता गर्द निळ्या आकाशात एक लालसर नारंगी किरण शिरकाव करत होती. काही क्षणांतच सारा आसमंत सूर्याच्या किरणात न्हाऊन निघणार होता. केंजळगड आता हलकेच दिसू लागा होता. एकाकी त्यामागून सूर्य नारायण आणि त्यांचे अगणित किरणं पृथवीवर झेप घेऊ लागली. त्यांच्या ह्या शर्यतीत ढोम धरणाचं पाणी चमकू लागलं. काही सेकंद मला भानावर येण्यातच गेली. हा दैवी खेळ आपल्यासारख्या सामान्य माणसाच्या समजण्या पलीकडचा आहे हे कळून चुकलं. एक सुंदर पॅनोरमा घ्यावा असं ठरवलं. फोटोग्राफी झाली. आता पक्ष्यांचं जग जागं झालं होतं. त्यांची धावपळ बघून मला क्षणभर मुंबईतली सकाळची धावपळ आठवली. इकडे सूर्याच्या किरणांवर झेप घेणारे पक्षी आणि तिकडे घडाळ्याच्या काट्यावर धावणारं माणसांचं विश्व. सगळाच विरोधाभास. असो .
 
असं हे सह्याद्रीचं अनोखं जग खूप काही देऊन जातं आणि जगण्याचा खरा अर्थ शिकवून जातं. भेटूया पुढच्या लेखात अश्याच एका भन्नाट जागेवर. फिरत राहा आणि सह्याद्रीवर प्रेम करत राहा.
 
 
- अनिकेत कस्तुरे