माणदेशी महिलांना नवचेतना देणार्‍या चेतना सिन्हा
 महा एमटीबी  05-Jan-2018
 
 
 
 
बांगलादेशच्या मोहम्मद युनूस प्रमाणेच तिने सातारा जिल्ह्यातील एका दुष्काळी भागात महिलांसाठी बँक सुरू केली, जी भारतातील पहिली महिला बँक आहे. ती महिलांसाठी ‘चेंबर ऑफ कॉमर्स’, बिझनेस स्कूल सुद्धा चालविते. तिच्यामुळे अनेक महिला आपल्या मुलांना शिकवू शकल्या, घर घेऊ शकल्या. जिथे खाण्याची भ्रांत होती तिथे आज समृद्धी आहे. तिला भेटायला थेट अमेरिकन अध्यक्ष उत्सुक असतो. जगात दावोस या शहरात जगभरातील शक्तिशाली राष्ट्रांमधील राष्ट्राध्यक्षांची, पंतप्रधानांची, उद्योगपतींची बैठक होत असते. या बैठकीचं सहअध्यक्षपद ती भूषविणार आहे. असा मान मिळविणारी ती पहिली भारतीय महिला आहे. ही अद्भुत कौशल्य लाभलेली महिला म्हणजे माणदेशी फाऊंडेशनच्या संस्थापिका अध्यक्षा आणि सामाजिक उद्योजिका चेतना गाला-सिन्हा होय.
 
 
चेतनाचं शालेय आणि महाविद्यालयीन शिक्षण मुंबईत झाले. चेतना, मुंबई विद्यापीठात अर्थशास्त्र विषयामध्ये पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रम शिकत असताना जयप्रकाश नारायण यांची चळवळ जोरात होती. जयप्रकाश नारायण यांच्या चळवळीने प्रभावित झालेल्या चेतनाने चळवळीत उडी घेतली. या चळवळीदरम्यान चेतनाची ओळख सातारा जिल्ह्याच्या माण तालुक्यातील विजय सिन्हा या शेतकर्‍याशी झाली आणि पुढे दोघांनी लग्नाचा निर्णय घेतला. शहरात वाढलेली चेतना दुष्काळी भागातील एका खेड्यात सासुरवाशीण बनून आली. लग्नाच्या दुसर्‍याच दिवशी ’’घरात शौचालय नाही का?’’ असे तिने नवर्‍याला विचारले. नवरा म्हणाला, ’’इतर बायकांप्रमाणे तुलादेखील रानात जावं लागेल. डुक्करं मागोमाग येतात. त्यांना हाकलण्यासाठी जाताना काठी घेऊन जा.’’ पुढे घरी शौचालय, गावात वीज आणि तीन-चार तास उशिरा येणार्‍या एसटी विरोधात स्टेशनमास्तरसोबत भांडण हे जणू तिच्यासाठी घोषवाक्यच झालं.
 
 
शरद जोशींच्या शेतकरी संघटनेत कामकरत असताना १९८७ च्या आसपास महिलांना स्थानिक स्वराज्य संस्थेत ३० टक्के आरक्षण मिळण्याच्या हालचाली सुरू झाल्या होत्या. या आरक्षणासंबंधी महिलांमध्ये जागृती आणण्यासाठी चेतना गावोगावी जाऊन महिलांना भेटत होती. असंच महिलांना भेटत असताना तिला एक महिला भेटली, कांताबाई साळुंखे. या महिलेला आपल्या मुलांना पावसाच्या पाण्यापासून वाचवण्यासाठी घराच्या छतावर ताडपत्री टाकायची होती. मात्र, ती ताडपत्री खरेदी करण्यासाठी तिला पैसे साठवायचे होते. तिने दररोज ५ रुपये जमा करायचे ठरविले. ती बँकेत पैसे घेऊन गेली. मात्र, एवढी क्षुल्लक रक्कमजमा करण्यासाठी बँकेने खाते उघडण्यास नकार दिला. झालेला प्रकार कांताबाईने चेतनाला सांगितला. बँक निव्वळ व्याज घेण्यासाठी नसते तर ती कोणाची तरी आत्यंतिक गरज आहे, हे चेतनाला उमगले. त्याचवेळी चेतनाने बँक सुरू करण्याचे निश्चित केले.
 
 
१९९६ साली चेतनाने बँक सुरू करण्याबाबत रिझर्व्ह बँकेकडे अर्ज केला. मात्र, अनुमोदक निरक्षर असल्याचे कारण देऊन रिझर्व्ह बँकेने अर्ज फेटाळला. चेतना खिन्न मनाने गावी परतली. यावेळी त्या निरक्षर महिलांनी चेतनाला सांगितले की, "आम्हाला भले लिहिता-वाचता येत नसेल परंतु आकडेमोड मात्र आम्ही करू शकतो. आम्हाला हिशोब करता येतो." चेतनाला त्या महिलांच्या बोलण्याने हुरूप आला. महिलांसह ती परत रिझर्व्ह बँकेच्या अधिकार्‍यांना भेटायला गेली. महिला म्हणाल्या, "तुमचे अधिकारी कॅल्क्युलेटरवर जे व्याजदरांचे गणित करू शकतात ते आम्ही निव्वळ हाताने करू शकतो." या महिलांनी ते प्रत्यक्षात करून दाखविले. अधिकार्‍यांना खात्री पटली आणि चार महिन्यांत रिझर्व्ह बँकेचा परवाना मिळून भारतातील पहिल्या महिला सहकारी बँकेची माणदेशी महिला सहकारी बँकेची स्थापना झाली. ते वर्ष होतं १९९७.
 
 
 
 
 
 
या बँकेतून महिलांना उद्योग व्यवसाय सुरू करण्यासाठी कर्ज मिळू लागले. अनेक महिलांनी कर्ज घेऊन नव्याने व्यवसाय सुरू केले, तर काहींनी आपल्या व्यवसायाचा विस्तार केला. अशीच एक मेंढ्या चरणारी केराबाई बँकेत आली. दूर गावात राहणार्‍या मुलासोबत बोलण्यासाठी तिला मोबाईल घ्यायचा होता, एक तिच्यासाठी आणि सासूसाठी. बँकेच्या कर्मचारी महिलेने विचारले, "पण मोबाईल चालवता येतो का?" केराबाई म्हणाल्या, "न्हाय येत. पन तुमी का न्हाय शिकवत?" केराबाईच्या या प्रश्नाने चेतना सिन्हांना मात्र महिलांच्या अनेक समस्यांवरचं उत्तर मिळालं. त्यातून आकारास आलं माणदेशी फाऊंडेशनचं बिझनेस स्कूल. पिठाची गिरणी कशी सुरू करावी? ज्यूस सेंटर कसं चालवावं? फास्ट फूड सेंटर कसं उभारावं? शेळ्या-मेंढ्यांचं पालन कसं करावं ते अगदी आलेल्या ग्राहकांना कशा पद्धतीने सेवा द्यावी? आपल्या उत्पादनासाठी बाजारपेठ कशी मिळवावी? हे सारं बिझनेस स्कूलमध्ये शिकवलं जाऊ लागलं. या बिझनेस स्कूलचा परिणाम असा की, ९५३ गावांतील ६३ हजार महिला या बिझनेस स्कूलमधील विविध उपक्रमांशी जोडल्या गेल्या. यांपैकी ७४ टक्के महिलांनी स्वतंत्र व्यवसाय सुरू केले. या महिलांच्या वैयक्तिक वार्षिक मिळकतीत सरासरी १३ हजार २०० रुपयांनी वाढ झाली. माणदेशी एमबीए हा अभ्यासक्रमपूर्ण करणार्‍या महिलेच्या वार्षिक मिळकतीत सरासरी २० हजार ७६० रुपयांनी वाढ झाली. ४४ टक्के लाभार्थी महिलांच्या सोने, गाई, शेळ्या, मशीन्स अशा स्वरूपाने मालमत्ता वाढली.
 
 
 
‘माणदेशी फाऊंडेशन’तर्फे ‘चेंबर ऑफ कॉमर्स’ देखील चालविले जाते. महिलांनी महिलांसाठी चालविलेले कदाचित भारतातील हे पहिले ‘चेंबर ऑफ कॉमर्स’ असावे असे म्हटले जाते. एप्रिल २०१४ मध्ये माणदेशी फाऊंडेशनअंतर्गत चेंबर ऑफ कॉमर्सची म्हसवड, सातारा आणि पुणे येथे स्थापना झाली. ज्या महिलेला उद्योग सुरू करायचा आहे किंवा जी महिला उद्योग-व्यवसायात कार्यरत आहे, अशी कोणतीही महिला या ‘चेंबर ऑफ कॉमर्स’ची सदस्या होऊ शकते. सदस्य झाल्यानंतर प्रत्येक सदस्याला तीन महिन्यांचा एक अभ्यासक्रमपूर्ण करावा लागतो. यामध्ये उद्योजकीय विकास, आर्थिक नियोजन, प्रशासन, विपणन, कायदेशीर सल्ला आणि व्यवसाय नोंदणी यांची ओळख असे विषय शिकविले जातात. सोबतच अनुभव मिळण्यासाठी २ अभ्यास दौर्‍यांचे आयोजन देखील केले जाते. आतापर्यंत ‘चेंबर ऑफ कॉमर्स’ने ४३२ कार्यक्रमराबविले असून १५ हजार ६८२ महिलांपर्यंत ते पोहोचले आहेत. आतापर्यंत ६,२७३ महिलांनी अकाऊंट विषयाचे प्रशिक्षण घेतले असून १० हजार १९३ महिलांना बिझनेस स्कूलच्या शिक्षकांनी मार्गदर्शन दिले आहे. या सगळ्यांचा परिणाम पाहणे महत्त्वाचे आहे. ३० टक्के महिलांनी त्यांच्या उद्योगामध्ये वार्षिक नफा ३५ टक्क्यांनी वाढल्याचे अनुभवले. २० टक्के महिलांनी नोंदणी करून स्वत:चा उद्योग उभारला. ५२ टक्के महिलांनी त्यांच्या मालमत्तेत झालेली वाढ ’याचि देही याचि डोळा’ पाहिली. ३५ टक्के महिलांचे व्यवसाय आठवडी वा विभागीय बाजारपेठेमुळे विस्तारले. २२०० नवीन रोजगार निर्माण झाले.
 
 
 
‘माणदेशी फाऊंडेशन’चा ‘माणदेशी महोत्सव’ सध्या प्रभादेवीच्या रवींद्र नाट्यमंदिरात सुरू आहे. तिथे ‘माणदेशी’च्या या सार्‍या महिला उद्योजिका स्वत:चे उत्पादन घेऊन आल्या आहेत. दुष्काळाचा बाऊ न करता प्रतिकूलतेलाच संधी मानून त्याचं सोनं कसं करावं, हेच जणू आपण या माणदेशी उद्योजक भगिनींकडून शिकतो. एक स्त्री शिकली तर संपूर्ण कुटुंब शिकतं, असं महात्मा फुले म्हणत म्हणूनच त्यांनी सावित्रीबाई फुलेंना शिकवलं आणि स्त्रीशिक्षणाची कवाडे मुलींसाठी खुली झाली. चेतना सिन्हा देखील सावित्रीच्या लेकी होऊन महिलांना उद्योजकतेचे धडे देत आहेत. आज भारताला महान राष्ट्र होण्यासाठी खर्‍या अर्थाने चेतना देणार्‍या अशा अनेक चेतना सिन्हांची गरज आहे.
 
 
-प्रमोद सावंत