येथे(ही) लागतात जातीचे !
 महा एमटीबी  05-Jan-2018

 
 
’मॅडम, रक्तपेढीतही करियरच्या संधी आहेत ?’
तो महाविद्यालयीन तरुण कुतुहलाने विचारत होता. हा प्रश्न त्याने विचारला होता, जनकल्याण रक्तपेढीच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. तन्वी यार्दी यांना. पुण्यातील एका प्रसिद्ध महाविद्यालयातील तरुण-तरुणींचा एक गट रक्तपेढी पाहण्यासाठी म्हणून आला होता. रक्तपेढी पाहून झाल्यानंतर या मुला-मुलींसोबत प्रश्नोत्तरांचे एक सत्र झाले. डॉ. तन्वी सर्व शंकांचे निरसन करीत होत्या. रक्तप्रक्रियेच्या तांत्रिकतेवर बराच खल झाल्यानंतर शेवटी या मुलाने अगदी व्यावहारिक असा हा प्रश्न उपस्थित केला होता. यावर अत्यंत नि:संदिग्धपणे ’होय, निश्चित आहेत’ असे उत्तर देऊन डॉ. तन्वी यांनी या विषयावरदेखील पुढे एक चांगली चर्चा घडवली.
 
तरुणांमध्ये स्वभावत:च निरनिराळ्या आव्हानांना सामोरे जाण्याची एक उर्मी असते. अशा आव्हानांचा पुरेपूर अंतर्भाव असलेली अशी अनेक क्षेत्रे आहेत ज्यांचा दुर्दैवाने ’करियर’ म्हणून फ़ारसा विचारच होताना दिसत नाही. रक्तपेढीदेखील अशाच क्षेत्रांपैकी एक. रक्तपेढीबद्दल बाहेर माहिती सांगताना ’हा socio-technical project’ आहे’ असे आम्ही नेहमी सांगत असतो. म्हणजेच रक्तपेढीसारख्या प्रकल्पाला सामाजिक आणि तांत्रिक अशी दोन अंगे आहेत आणि दोन्हीही अत्यंत महत्वाची आहेत. या दोन्ही आघाड्यांवर काम करण्यासाठी अत्यंत कुशल आणि समर्पित अशा मनुष्यबळाची आवश्यकता असते. ढोबळमानाने सांगायचं झाल्यास रक्तसंकलन हे रक्तपेढीचं सामाजिक अंग आहे तर रक्तप्रक्रिया ही तांत्रिक बाजु.
 
रक्तदात्याने दिलेलं रक्त हेच रक्तपेढीच्या कार्याचे मुख्य साधन असल्याने रक्तदाता संपर्क, त्यांचं प्रबोधन, त्यांच्याशी योग्य संवाद आणि त्यांची काळजी या सर्व बाबी जितक्या चांगल्या पद्धतीने होतील तितकीच चांगली गुणवत्ता या जीवनदायिनी संजीवनीची म्हणजेच रक्ताची मिळु शकेल. अर्थातच या सर्व बाबी योग्य पद्धतीने हाताळल्या जाण्यासाठी लागणारे मनुष्यबळ हे प्रशिक्षितच असावे लागते. किंबहुना सामाजिक कार्यासाठीचे कुशल मनुष्यबळ हा तर रक्तसंकलनाचा प्राण आहे. शिवाय हे मनुष्यबळ केवळ शैक्षणिकदृष्ट्या कुशल असूनही भागत नाही तर अशा व्यक्ती स्वभावत:च सामाजिक असाव्या लागतात. एखाद्या व्यक्तीस रक्तदानासाठी प्रेरित करणे, प्रत्यक्ष रक्तदानापूर्वी रक्तदात्याच्या वैद्यकीय स्थितीसंबंधी समजून घेणे, त्या आधारावर रक्तदात्यास निवडणे अथवा वगळणे, रक्तदान झाल्यावरही नंतर घ्यावयाच्या काळजीसंबंधी माहिती देणे, आवश्यक तिथे डॉक्टरांची मदत घेणे अशी सर्व कामे करण्यासाठी सामाजिक कार्यकर्त्याचे स्वभावाने सामाजिक असणे आणि मुलाखत, समुपदेशनादी कौशल्ये आत्मसात असणे आवश्यकच असते. थोडक्यात dedication with competency अशी दुहेरी गुणवत्ता रक्तपेढीच्या सामाजिक कार्यकर्त्याकडे असायला हवी. हे सर्व असेल तर रक्तपेढीमधील काम हे निश्चितच समाधान मिळवून देणारे असते, आपल्या अंगभूत गुणकौशल्यांना पुरेपूर वाव देणारे असते. काही विशिष्ट गोष्टी रक्तदात्यांना अथवा रुग्णांना सांगताना शब्दरचना कशी असायला हवी, आवाजातील चढ-उतार कसे असायला हवेत, यांसारखे विषयदेखील आमच्या रक्तपेढीच्या बैठकांमध्ये पुरेसा वेळ देऊन चर्चिले जातात. याबाबत सामाजिक कार्यकर्त्यांचे चिंतन सातत्याने चाललेले असते. उदाहरणच सांगायचं झाल्यास, रक्तदान केल्यानंतर या रक्तावर सुरक्षिततेच्या दृष्टीने HIV, कावीळ यांसारखे संसर्ग तपासण्यासाठी काही चाचण्या केल्या जातात. असे संसर्ग एखाद्याच्या रक्तामध्ये आढळल्यास संबंधित रक्तदात्याला याबाबत कळविता येऊ शकते. मात्र त्यासाठी रक्तदान करण्यापूर्वी जी प्रश्नावली रक्तदात्याकडून भरली जाते त्यामध्ये रक्तदात्याने ’असे संसर्ग माझ्या रक्तात आढळल्यास मला त्याची माहिती दिली जावी’ अशी स्वीकृती देणे गरजेचे असते. म्हणूनच ही प्रश्नावली भरतानाच या स्वीकृतीबाबत योग्य त्या शब्दांत रक्तदात्याला सांगितले जाणे गरजेचे असते. शिवाय दुर्दैवाने असे संसर्ग कुणा रक्तदात्याच्या रक्तात आढळल्यास त्या रक्तदात्याला फ़ोन करुन बोलवून घेणे, फ़ोनवरही योग्य त्या शब्दांत त्याच्याशी संवाद साधणे हे काम वाटते तितके साधे नाही. यावेळी वापरले गेलेले शब्द संबंधित रक्तदात्याच्या आयुष्यावर दूरगामी परिणाम करणारे असतात. अनावश्यक शब्दांचा वापर झाल्याने संबंधित रक्तदाता नैराश्यामध्ये (depression) गेल्याच्याही काही घटना पूर्वी काही ठिकाणी घडलेल्या आहेत. इतक्या लांबचा विचार सामाजिक कार्यकर्त्याने करायला हवा असतो. त्यासाठी सामाजिक कार्यकर्ते संवेदनशीलही हवेत आणि संवाद, समुपदेशन वगैरे कौशल्यांमध्ये कसलेलेही हवेत. याशिवायही रक्तपेढीशी संबंधित कामांमध्ये कधी कुठली अडचण दत्त म्हणून समोर उभी ठाकेल हे सांगता येणं तसं कठीणच. अशा आणीबाणीच्या प्रसंगीही वेळेवर आणि अचूक निर्णय करण्यात सामाजिक कार्यकर्त्यांचे आपत्ती व्यवस्थापन कौशल्य कामी येते. त्यामुळेच MSW, DSW असं रितसर शिक्षण घेतलेली आणि सामाजिक क्षेत्रांत वावरण्याचा अनुभव असलेली तज्ज्ञ मंडळीच अशा प्रकारच्या कामांना योग्य न्याय देऊ शकतात, असा आमचा अनुभव आहे. थोडक्यात सामाजिक कार्यात आपली कारकीर्द करु इच्छिणाऱ्यांसाठी रक्तपेढीचे क्षेत्र निश्चितच आव्हानात्मक आहे.
 
हे झालं सामाजिकतेविषयी. आता थोडं तांत्रिक बाजुसंबंधी. रक्तदानाला जीवनदान म्हटलं जातं, ते शब्दश: खरं आहे; अनुभवसिद्ध आहे. मोठ्यातला मोठा डॉक्टरदेखील हे नाकारु शकणार नाही. पण दुसऱ्या बाजुला असुरक्षित रक्तसंक्रमण रुग्णाच्या जीवावर बेतु शकतं हेदेखील वैद्यकशास्त्रानेच सिद्ध केलेलं वास्तव आहे. म्हणजेच रक्तदान हे खऱ्या अर्थाने जीवनदान होण्यासाठी रक्तपेढीच्या तांत्रिक विभागाची भूमिका किती मोलाची असु शकते याचा आपणास अंदाज बांधता येऊ शकतो. ’डोळ्यात तेल घालुन काम करणं’ म्हणजे काय असतं, हे पहायचं असल्यास रक्तपेढी तंत्रज्ज्ञांकडे त्यांच्या कामाच्या ठिकाणी पहायला हवं. रक्तगट तपासणी (Blood Grouping), रक्तजुळवणी (Cross Matching), रक्तसंक्रमणावाटे संक्रमित होऊ शकणाऱ्या घातक संसर्गांची तपासणी (TTI – Transfusion Transmitted Infections Testing), रक्तघटकांची निर्मिती (Component Separation), रक्तसाठवणूक अशी सर्वच कामे अत्यंत महत्वाची असून ती एकाग्रचित्तानेच करावी लागतात आणि ही कामे करण्यासाठी योग्य असे शिक्षण घेणेही महत्वाचे ठरते. शैक्षणिकदृष्ट्या शास्त्र विषयातील पदवी म्हणजेच B.Sc. झाल्यानंतर DMLT (Diploma in Medical Laboratory Technology) ही पदविका घेऊन रक्तपेढीमध्ये ’तंत्रज्ज्ञ’ म्हणून काम करता येऊ शकते. तसेच रक्तसंक्रमण अधिकारी (Blood Transfusion Officer) म्हणून काम करण्यासाठी किमान MBBS ही वैद्यकीय पदवी असणे गरजेचे असते आणि त्याव्यतिरिक्त पॅथॉलॉजी विषयातील पदव्युत्तर शिक्षण हीदेखील रक्तपेढीचे काम व्यवस्थितपणे चालण्यासाठी गरजेचे असते.
 
रक्तपेढीच्या तांत्रिक कामाची ज्यांना माहिती असते ती मंडळी ’रक्तपेढीमधील तांत्रिकता हे वैद्यकीय क्षेत्रातील एक स्वतंत्र विश्व आहे’ हे निश्चितपणे जाणतात. परंतु बऱ्याच जणांना याचा अंदाजच येत नाही. एक अनुभव तर मी स्वत: बऱ्याचदा घेतला आहे की, कुठल्यातरी रुग्णालयात एखाद्या रुग्णावर काही महत्वाची शस्त्रक्रिया चालु असून रक्तघटकांच्या संक्रमणाविषयी स्वत: उपचार करणारे डॉक्टरच साशंक आहेत किंवा गोंधळात आहेत. या शंका म्हणजे ’रुग्णाचा रक्तगट दुर्मीळ व अनुपलब्ध असल्याने तातडीने काय करता येईल’, ’अमुक एका आणीबाणीच्या स्थितीत नक्की कुठला रक्तघटक द्यायला हवा’ अथवा ’विघटित झालेल्या रक्तघटकांचे पुनर्गठन (Reconstitution) करावे का ? कसे ?’ अशा थेट रुग्णाच्या जीवाशी संबंध असणाऱ्या असतात. अशा वेळी ही डॉक्टर मंडळी तातडीने जनकल्याण रक्तपेढीचे प्रमुख डॉ. अतुल कुलकर्णी किंवा तत्सम तज्ज्ञांशी संपर्क करुन या शंकांचे निरसन करुन घेतात आणि नंतर म्हणजे रुग्णाचे संकट टळल्यानंतर रक्तपेढीच्या डॉक्टरांबद्दल मनस्वी कृतज्ञताही व्यक्त करतात. खरे तर, रुग्णावर शस्त्रक्रिया करणारे हे डॉक्टर्सदेखील ज्ञानवृद्ध असतातच पण वर म्हटल्याप्रमाणे रक्तसंक्रमण हे स्वतंत्र विश्व असल्याने त्यातील अनेक परिभाषा स्वतंत्रपणे अभ्यासाव्याच लागतात. आता तर रक्तपेढीविज्ञान (Transfusion Medicine) या नावाची स्वतंत्र वैद्यकीय शाखादेखील सुरु झाली असून या शाखेचा MD हा स्वतंत्र पदव्युत्तर कोर्सही प्रचलित होत आहे. अर्थात ते गरजेचे आहेच, कारण त्याशिवाय आधुनिक वैद्यकशास्त्रास पूर्णत्व येणारच नाही. याव्यतिरिक्त रक्तपेढीसारख्या क्षेत्रात संशोधनासही प्रचंड वाव आहे. असंख्य रक्तदात्यांनी दिलेले रक्त, त्यावर झालेल्या चाचण्या, नाकारले गेलेले अथवा वाया गेलेले रक्त, रक्तदानासंबंधी समाजाचा दृष्टीकोन, रक्तदान प्रबोधनाची गरज, थॅलेसेमिया रुग्णांचे प्रमाण, त्यांच्या समस्या, त्यावरील उपाय इ. कितीतरी बाबींवर समाजोपयोगी संशोधन होऊ शकते. अर्वाचीन काळात ऑस्ट्रियन शास्त्रज्ञ कार्ल लॅंडस्टीनर यांनी शोधून काढलेली प्रचलित रक्तगटपद्धती वैदयकीय क्षेत्रास एक वरदानच ठरली आहे. अर्थात सध्याही अशी संशोधने चालु आहेतच. रक्तदात्यांना एका सूत्रात गुंफ़ण्यासाठी कुणी मोबाइल ॲप बनवण्याच्या मागे आहे तर कुणी ब्लड बॅंकिंग सॉफ़्टवेयर विकसित करु पहात आहे. म्हणजेच संशोधनादीची आवड असणाऱ्यांसाठीही रक्तपेढी हे क्षेत्र निश्चितच आव्हानात्मक आहे, असे म्हटल्यास वावगे ठरु नये.
 
पहिल्या प्रसंगात उल्लेख केलेल्या महाविद्यालयीन तरुणांच्या रक्तपेढी भेटीत वरील सर्व विषयांचा उहापोह झाला आणि मग ’रक्तपेढीत करियरच्या संधी आहेत का’ असे विचारणारा तरुण उस्फ़ूर्तपणे उद्गारला, ’अच्छा ! म्हणजे इथेही जातीचेच लागतात तर !’ यावर हसत हसत डॉ. तन्वी म्हणाल्या, ’अगदी बरोबर. येथेही लागतात ’जातीचे’, येरागबाळाचे काम नव्हे ते !.’
 
 
- महेंद्र वाघ