मानसिकता बदलणार कधी?
 महा एमटीबी  05-Jan-2018
 
 

 
 
 
मानसिकता बदलणार कधी?
 
भाजपची सत्ता आली आणि लोकहिताच्या अनेक योजना प्रत्यक्षात आल्या. मोदी सरकारने राबविलेले ’स्वच्छ भारत’ अभियान हे जास्त लोकप्रिय ठरले आणि जास्त चर्चेतही आले. या अभियानाअंतर्गत सार्वजनिक शौचालयांच्या उभारणीवर जास्त भर देण्यात आला. शहरी तसेच ग्रामीण भागांमध्ये शौचालये बांधण्यात आली. उघड्यावर शौचालयास बसण्यामुळे होणारे तोटे, त्यातून निर्माण होणारी अस्वच्छता समाजातील प्रत्येक घटकाला डोळ्यांसमोर ठेऊन समजावून सांगण्यात आली. जाहिराती, सोशल मीडिया, पथनाट्य, रॅली, चित्रपटांच्या माध्यमातून शौचालयाचा वापर करणे किती गरजेचे आहे, हे पटवून देण्यात आले. गेल्या तीन वर्षांपासून सरकारने केलेले प्रयत्न सार्थकी लागले. शहरी तसेच ग्रामीण भागातील जनतेचे यामुळे परिवर्तन झाल्याचे दिसून येत आहे. परंतु, अजूनही काही लोकांची मानसिकता बदलली नसल्याने आता हे अभियान अधिक यशस्वी करण्यासाठी प्रयत्न करण्याची गरज भासू लागली आहे. त्याचाच एक भाग म्हणून महाराष्ट्रात आता कुठेही उघड्यावर शौचाला बसणार्‍यांवर कडक कारवाई केली जाणार आहे. सार्वजनिक शौचालये असतानाही उघड्यावर शौचाला बसल्याचे आढळल्यास संबंधित व्यक्तीकडून ५०० रु. दंड वसूल केला जाणार आहे. राज्य सरकारने तयार केलेल्या नव्या नियमावलीत याबाबत माहिती देण्यात आली आहे. तसेच सरकारने सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकणे, थुंकणे, लघुशंका करणे यासारख्या गोष्टीवरही दंडात्मक कारवाई करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यामध्ये राज्यातील अ, ब, क आणि ड श्रेणीतील महापालिकांसाठी दंडात्मक कारवाईची रक्कम एकच ठेवण्यात आली आहे. घरात किंवा शौचालये नसल्याने खूपदा गैरसोय होत असते. याचा त्रास तरुण मुली, महिलांना सहन करावा लागतो. तसेच यामुळे आरोग्याचा प्रश्‍न निर्माण होत असल्याने घरात किंवा आजूबाजूच्या परिसरामध्ये सार्वजनिक शौचालये असणे गरजेचे झाले आहे. कित्येकदा सार्वजनिक शौचालये, फिरते शौचालय असताना काही मंडळी उघड्यावर शौचास जाणे पसंत करतात. हे चित्र बदलण्यासाठी राज्य सरकारने कठोर पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे आता दंडात्मक कारवाईची मोहीम अधिक तीव्र करण्यात येणार आहे. त्यामुळे आता तरी नियमांना बगल देणार्‍यांना एक सुधारण्याची संधी देण्यात आली आहे. त्यामुळे त्यांनी आपल्या सवयी बदलून नव्या बदलांचा स्वीकार केल्यास त्यातून स्वतःचे व देशाचे हित साध्य होऊ शकते, हा विचार करण्यास हरकत नाही.
 
 
पैशाचा मोह आवरा!
 
पैशाची चणचण भासत असल्याने किंवा कर्जाचे हप्ते फेडू शकणाऱ्या व्यक्तींची आत्महत्या, पैशासाठी आईने मुलीला ढकलले वेश्याव्यवसायात, पैशासाठी बाळाची केली विक्री, प्रॉपर्टीच्या वादातून खून या अशा मन हेलावून टाकणार्‍या घटना रोज कानावर पडत असतात. अशा या घटनांमधून लोकांची मानसिकता इतकी खालच्या अमानवयी स्तरावर कशी जाऊ शकते, असा प्रश्न पडतो. स्वतःच्या फायद्यासाठी, आपला बँक बॅलन्स वाढविण्यासाठी थेट एखाद्याचा जीव घेण्यासारखे पाऊल उचलताना काहीच कसे वाटत नाही, या विचारांनी मन सुन्न होऊन जाते. आज दैनंदिन गरजा भागविण्यासाठी मोजाव्या लागणार्‍या पैशाचे मूल्य दिवसेंदिवस महाग होत चालले आहे. महागाईच्या भस्मासूराने सर्वसामान्यांचे जगणे कठीण होऊन बसले आहे. प्रत्येक गोष्टीसाठी पैसा मोजावा लागत आहे. अर्थात, त्यावर योग्य प्रकारचा तोडगा काढण्याची गरज आहे. पण, आजकाल यावर तोडगा काढण्यासाठी इतकी कठोर पावले उचलली कशी जातात? असा प्रश्‍न पडतो. उत्तर प्रदेशमधील हाफिजगंजमधील ढकियामध्ये अशीच घटना घडली आहे. पतीच्या उपचारासाठी पत्नीकडे पुरेसा पैसा नसल्याने तिने जन्म दिलेल्या १५ दिवसांच्या नवजात बालकाची ४२ हजार रुपयांत विक्री करण्यात आल्याची घटना नुकतीच घडली. आज प्रत्येक गोष्टीचा उपभोग घेण्यासाठी पैशाची गरज भासते. खासगी, सरकारी कार्यालयामध्ये काम करणारे कर्मचारी आपल्या पगाराचा आकडा कसा वाढवता येईल यासाठी प्रयत्नरत असतो. सुखासमाधानाने आनंदाने जगण्यासाठी पैसा हा हवाच, असा एक गोड गैरसमज काहींनी करून घेतला आहे. आपल्या हातात बक्कळ पैसा आला म्हणजे आयुष्यातील सगळं काही मिळालं, आपण सगळं काही साध्य करता येऊ शकतं, असा समज अनेकांचा झाला आहे. त्यामुळे या पैशाच्या मागे लागताना आपण आपल्या हातामध्ये असलेले अनेक सुखाचे क्षण गमावून बसलो आहोत. आपण आपल्या माणसांपासून दुरावले गेलो आहोत, याचे भान राहिलेले नाही. आजच्या महागाईच्या काळात घर चालवणे, मुलांचे शिक्षण तसेच इतर गरजा भागविण्यासाठी जास्त पैसे मोजावे लागतात ही बाब मान्य आहे. पैशाचे नियोजन योग्य काटकसर करून पैशाची बचत करता येऊ शकते, ही बाब अनेकांना कळत नाही. आज अभ्यासक्रमामध्ये अनेक नवनवीन पर्याय उपलब्ध झाले आहेत. आपल्या आवडीचे अभ्यासक्रम निवडून, आपल्यामध्ये असणारे कलागुण हेदेखील रोजगाराचे साधन बनू शकते, ही बाब मनावर बिंबवण्याची गरज आहे. हलाखीच्या परिस्थितीला सामोरे जाऊन संयम बाळगून पैसा कमावता येऊ शकतो, हे प्रत्येकाने लक्षात घ्यायला हव.
 
 
 
- सोनाली रासकर