एक अपवाद...
 महा एमटीबी  05-Jan-2018
 
 
 
 
 
सध्या जगात मानवरहित अर्थव्यवस्था उभी राहत आहे. मानवरहित अर्थव्यवस्थेत यांत्रिक उद्योगावर अधिक भर असतो. या मानवरहित अर्थव्यवस्थेतला एक उद्योग म्हणजे ऑनलाईन शॉपिंग.
 
सध्या भारतात ‘फ्लिपकार्ट’ आणि ‘अॅमेझॉन’सारख्या मोठ्या संस्था या उद्योगात कार्यरत आहेत. त्यानंतर ‘इ-बे’, ‘स्नॅपडील’, ‘येप मी’, ‘जंगली’, ‘क्लब फॅक्टरी’ या छोट्या कंपन्यासुद्धा आपले अस्तित्व राखून आहे. विशिष्ट उत्पादने विकणार्‍या कंपन्याही अस्तित्वात आहेत. उदाहरणार्थ, ‘पेपर फ्राय’ नावाची वेबसाईट फर्निचरच विकते, तर ‘मिंत्रा’ या वेबसाईटवर फक्त कपड्यांची उत्पादने मिळतात, तर आज या सगळ्यांची उजळणी करण्याचे कारण असे की, ‘फ्लिपकार्ट’ आणि ‘ऍमेझॉन’वरील उत्पादने ‘ई-कार्ट’ नावाची संस्था ग्राहकांपर्यंत पोहोचविते.
 
या संस्थेत ‘फ्लिपकार्ट’ने १६२३ कोटी रुपये गुंतवले आहेत. ‘ई-कार्ट’ने गेल्या वर्षीच्या महिन्यात ६४१ रुपये उत्पन्न फ्लिपकार्टकडून मिळवले. ‘ई-कार्ट’ ही संस्था ‘फ्लिपकार्ट’नेच २००६ साली सुरू केली होती. या संस्थेने आतापर्यंत १ कोटी उत्पादने ३८०० पत्त्यांवर पाठवली आहेत. ही संस्था सध्या ‘अॅमेझॉन’ आणि ‘फ्लिपकार्ट’साठी काम करते. सध्या रोजगार मिळत नसल्याची मोठी ओरड आपल्याला दिसते. पण, या मानवरहित अर्थव्यवस्थेत ही संस्था अपवाद राहिली. ‘ई-कार्ट’ हे फक्त उदाहरण आहे.
 
ख्यातनामलेखक व. पु. काळे म्हणतात की, ’’कुठलाही प्रश्न सोडविण्यासाठी तीन गोष्टी लागतात. माणूस, पैसा आणि वेळ. या तीन टप्प्यांपलीकडील समस्याच नसते.’’ ही घरपोच सेवा भारतीय पोस्टच्या पथ्यावर पडली आहे. ऑनलाईन डिलिव्हरीसारखी सेवा भारतीय पोस्टही देते. सध्या या सेवा ठराविक शहरांमध्येच दिल्या जातात. अजून त्या गावखेड्यापर्यंत पोहोचायच्या आहेत. भारतीय पोस्ट सारखी संस्था त्याला हातभार लावेल यात शंका नाही. ही सेवा आत काही वाचनालयेही चालवत आहेत. डोंबिवलीतील ‘पै लायब्ररी’ आणि मुंबईस्थित ‘बिग बुक्स’ ही दोन अग्रणी नावे. ऑनलाईन हवे ते पुस्तक निवडावे आणि दुसर्‍या दिवशी ते तुम्हाला घरपोच मिळते. सध्या धकाधकीच्या जीवनात व्यक्तीला ठराविक ठिकाणी जाऊन वस्तू विकत घेणे शक्य नसते. तेव्हा या सारख्या वेबसाईट कामी येतात. त्यात ऑनलाईन पेमेंट आणि कॅश ऑन डिलव्हरी सारखे मोठे पर्यायही उपलब्ध आहेत. मानवरहित अर्थव्यवस्थेत ही सेवा अपवाद राहिली, हे आश्चर्यजनकच आहे.
 
 
- तुषार ओव्हाळ