'आप'की आँखो मे...
 महा एमटीबी  05-Jan-2018
 

'टूटे हुए दिलसे ही कला निकलती है,’ असा सिद्धांत आहे. काल जेव्हा कुमार विश्वास यांच्या ’आप’मधील स्वपक्षीयांनीच त्यांचे पंख कापले, तेव्हा कवीमनाच्या विश्वास यांनी, ‘’शहीद तो कर दिया लेकिन मेरे शव की विटंबना मत करना,’’ असे उद्गार काढले. काल तर त्यांच्या कवीमनाला धुमारेच फुटले होते. का नाही फुटणार? मित्रानेच केसाने गळा कापला. कुणास ठाऊक, ’मुझे मेरे दोस्तोंसे बचाओ, दुश्मनोंसे मे खुद निपटलूँगा,’ असेही त्यांच्या मनी आले असावे. पण, पक्षातील बाहेरच्या माणसांना राज्यसभेची उमेदवारी देऊन केजरीवाल यांनी एक धक्काच दिला. खरंतर सी.ए. इन्स्टिट्यूटच्या माजी अध्यक्षांना त्यांनी उमेदवारी दिली, ही चांगली गोष्ट. पण, पक्षात आपलाच शब्द अंतिम आहे, हे ठसविण्यात ते यशस्वी झाले.
 
आम आदमी पक्षावर नुकताच एक लघुपट प्रदर्शित झाला. पक्ष स्थापनेपासून ते केजरीवाल पहिल्यांदा मुख्यमंत्रीपदाची शपथ घेईपर्यंत त्यांचा प्रवास त्यामध्ये दाखवला आहे. एक पक्ष एका आंदोलनातून निर्माण होतो. पक्षाचा प्रवास काही साधा सरळ नसतो. अनेक हेलकावे खात तो प्रस्थापित पक्षात जाऊन बसतो. पक्षाच्या सुरुवातीलाच ’आप’ने शीला दीक्षित यांच्या विरोधात बंड पुकारले. दीक्षित यांनी राजकारणात जी गोष्ट करायला नको होती तीच केली. आपल्या शत्रूला नगण्य समजण्याची. त्याच केजरीवाल यांनी दीक्षित यांचा पराभव केला. हा त्यांनी पक्षाबाहेरील विरोधकांचा केलेला नायनाट. स्पर्धा जिंकण्याचे दोन पर्याय असतात. पहिला अर्थात, मेहनत करून स्पर्धा जिंकणे आणि दुसरा स्पर्धकच संपवणे! केजरीवाल यांनी दुसरा पर्याय निवडला. योगेंद्र यादवसारख्या चाणक्याला पक्षातून हाकलण्यात त्यांना यश आले.
 
योगेंद्र यादव हे पक्षाचे सहसंस्थापक. वर्षानुवर्षे त्यांनी राज्यशास्त्राचा अभ्यास केला. तो अभ्यास त्यांना खर्‍या राजकारणात उपयोगी पडला नाही, हे दुर्दैव. पूर्वी ’आप’मध्ये कुठल्याही प्रकारची लॉबिंग चालणार नाही, असे खडसावून सांगणारे केजरीवाल स्वतः एकाधिकारशाही राबवतात. २०१३च्या दिल्ली विधानसभा निवडणुकीदरम्यान एक विनोद व्हायरल झाला होता. शीला दीक्षित म्हणतात की, ‘करवटे बदलते रहे सारी रात हम, ‘आप’ की कसम.’ आता ही परिस्थिती पाहून गुलजार यांचे गीत समोर येते ’आप’की आँखो मे कुछ महके हुए से राज है|’
 
 
- तुषार ओव्हाळ