मार्च अखेर टायगर-रणबीर आमनेसामने?
 महा एमटीबी  04-Jan-2018

श्रद्धा कपूर आणि टायगर श्रॉफ या बॉलिवूडच्या नवीन जोडीचा 'बागी' नावाचा चित्रपट एप्रिल २०१६ साली प्रदर्शित झाला होता. याच चित्रपटाचा 'सिक्वेल' येत्या मार्च महिन्यात म्हणजेच ३० मार्च रोजी प्रदर्शित होतोय, यामध्ये टायगर श्रॉफ व दिशा पटानी आपल्याला प्रमुख भूमिकेत दिसतील. चित्रपट प्रदर्शनाची तारीख जाहीर करणारे 'बागी-२'चे पोस्टर आज प्रदर्शित झाले आहे. पण यानंतर अशी चर्चा रंगात आहे की, याच दिवशी संजय दत्त याचा बायोपिक असणारा रणबीर कपूरचा 'संजू' हा चित्रपट देखील प्रदर्शित होणार आहे. याचाच अर्थ रणबीर आणि टायगर आता आमनेसामने येणार का असे प्रश्न उपस्थित होत आहेत.
 
 
 
राजकुमार हिरानी यांनी 'संजू' हा चित्रपट दिग्दर्शित केला आहे व चित्रपटाची घोषणा करताना चित्रपट ३० मार्च रोजी प्रदर्शित होईल असं त्यांनी नमूद केले होते. त्यामुळे आज 'बागी-२'चे पोस्टर प्रदर्शित झाल्यानंतर या चर्चेला उधाण आले आहे. 'बागी-२' चित्रपटाचा निर्माता साजिद नाडीयदवाला असून शब्बीर खान याने हा चित्रपट दिग्दर्शित केला आहे. विशेष म्हणजे टायगर बरोबर यावेळी श्राद्धाच्या जागी दिशा दिसणार आहे. आणि गेल्या अनेक महिन्यांपासून टायगर व दिशा यांच्यातील नात्याबद्दल सगळीकडेच चर्चा रंगत आहे. नुकताच या दोघांनीही मालदीव येथे सुट्टीचा आनंद घेतल्याचे वृत्त सर्वत्र झळकत होते. त्यामुळे साहजिकच मोठ्या पडद्यावरील या दोघांची 'केमिस्ट्री' पाहण्यासाठी रसिक उत्सुक असणार. बागी-२ चे पोस्टर बघितल्यावर हा संपूर्ण चित्रपट 'ऍक्शनपट' असल्याचे लक्षात येते.
 

 

दुसरीकडे 'संजू' चित्रपटाचे अजून पहिले पोस्टर देखील प्रदर्शित झालेले नाही. त्यामुळे प्रदर्शनाबाबत अजूनही साशंकताच आहे. पण खरंच हे दोन मोठे चित्रपट एकाच दिवशी प्रदर्शित झाले तर मात्र हा सामना फारच रंगतदार होईल व त्याचा निकाल पाहणे खरंच औत्सुक्याचे ठरेल.