संस्कारांची पुस्तकाद्वारे नव्याने ओळख

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    04-Jan-2018
Total Views |
 
 
 
 
नाशिक ही पौराणिक नगरी आहे. येथे अनेक यात्रेकरू येत असतात. विविध मंदिरे असल्याने येथे विविध पूजा करण्यासाठी तसेच अनेक धार्मिक विधी करण्यासाठी पुरोहित तत्पर असतात. त्यातून पुरोहितांच्या पिढ्या तयार झाल्या आहेत. या पुरोहितांना कुटुंबातून मार्गदर्शन होत असते. धार्मिक विधी करण्याबाबत जुने पुरोहित मार्गदर्शन करीत असतात.
 
भारतीय हिंदू संस्कार हे खरोखर आदर्श आहेत. कालमानपरत्वे त्यात बदल झाले असले तरी त्यातील सार ओळखून त्यांचे आचरण करणे आवश्यक आहे. संस्कारामुळे समाज घडत असतो. संस्कारहीन मनुष्य म्हणजे केवळ पशू. काही नवे लोक या पूजाविधी क्षेत्रात येतात, तेव्हा त्यांना पौरोहित्य करताना अनेक अडचणी येतात. विविध विधी विधान, त्यांचे शास्त्रोक्त मंत्र माहिती असतातच असे नाही. नाशिकचे तरुण पुरोहित आणि नाशिक पंचांग निर्मिती करणारे हर्षद महाजन यांचे बंधू भूषण महाजन यांनी जेव्हा या व्यवसायात पदार्पण केले, तेव्हा त्यांना हीच अडचण जाणवली. त्यातून त्यांनी याबाबत माहिती संकलित करून स्वतःचे ज्ञान वाढविण्याचा प्रयत्न केला. आपल्याप्रमाणे अनेक नवोदितांना ही माहिती द्यायला हवी, असे त्यांच्या मनाने घेतले. त्यातून त्यांनी या विषयावर ग्रंथनिर्मिती करण्यास सुरुवात केली.
 
वे. राजाराम खोचे यांच्याकडून त्यांनी पौरोहित्याचे शिक्षण घेतले. सर्वात प्राथमिक बाब म्हणजे पूजा सांगणारे गुरुजी आणि गृहस्थ यांना नित्य संध्यावंदन आवश्यक असते. त्यावर त्यांनी ’संध्या भूषणम्’ हे २४ पानी पुस्तक लिहिले. त्यानंतर त्यांनी शहरातील मान्यवर वेदिक तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेऊन ‘संस्कारभूषणम् ’ (१५२ पाने) हा ग्रंथ सिद्ध केला. आपल्याकडे जन्मापासून बारसे, (नामकरण) पासून लग्न विधी असे विविध प्रमुख १६ संस्कार महत्त्वाचे आहेत. त्यांची माहिती त्यांनी ग्रंथित केली आहे. दशग्रंथी पंडित शांतारामशास्त्री भानोसे यांच्या हस्ते त्यांनी या ग्रंथाचे प्रकाशन केले. गर्भाधानपासून विवाह संस्कारापर्यंत षोड्‌श संस्कारांवर हा ग्रंथ आहे. यात मंत्र आणि कृती दोन्ही दिल्याने तो अत्यंत उपयुक्त ठरतो आहे. महाराष्ट्रातून त्याला मागणी आहे. त्यानंतर त्यांनी अलीकडेच त्यापेक्षा अधिक माहिती देणारा सविस्तर विवेचन करणारा ‘यज्ञभूषणम्’ हा ग्रंथ सिद्ध केला. हा ग्रंथ ३२० पृष्ठांचा आहे. सर्वसामान्य, नवोदित पुरोहित, जुने पुरोहित सर्वांना उपयुक्त असे लेखन आहे. चांगली मागणी आहे. ’संस्कारभूषणम्’ची पहिली आवृत्ती दीड वर्षात संपली. आता नव्या आवृतीचे कामसुरू आहे. सध्या त्यांचे ’प्रतिष्ठाभूषणम्’ या ग्रंथाचे लेखन सुरू आहे. मूर्ती, प्राणप्रतिष्ठा विधी यावर हे लेखन आहे. जुन्या ग्रंथांचे संदर्भ घेऊन सर्व लेखन केल्याने ते अभ्यासपूर्ण झाले आहे.
 
भूषण महाजन यांचे वय केवळ ३० वर्षे आहे. नाशिकमधील मोठमोठे पंडित देखील या विषयावर बोलतात. मात्र, ग्रंथलेखन करण्यासाठी पुढे येत नाहीत. जुने संदर्भ शोधणे, त्यांची माहिती घेणे, त्यांचे लेखन करणे, संस्कृतबरोबर मराठीत या संस्कारांची माहिती देणे, त्याचे योग्य मुद्रितशोधन असे अनेक अडथळे पार करीत त्यांनी तळमळीने हे लेखन केले. बदलत्या काळानुसार हे लेखन आवश्यकच आहे. या विषयावर अन्य अनेक पुस्तके असली तरी नाशिकमधील परंपरा आणि पद्धती यांचे संकलन होण्याच्या दृष्टीने हे लेखन आधुनिक काळाशी साजेसे आहे. त्याचा चांगला उपयोग होणार आहे. पारंपरिक संस्कारांची पुन्हा नव्याने ओळख देणारे असून त्यांच्याकडून अशाच आणखी लेखनाची अपेक्षा आहे. त्यासाठी त्यांना शुभेच्छा!
 
 
 
- पद्माकर देशपांडे

 
 
 
@@AUTHORINFO_V1@@