टायगरच्या हस्ते ‘बोनस’ चित्रपटाचा मुहूर्त संपन्न
 महा एमटीबी  31-Jan-2018
 
 
 
 
 
 
‘बोनस’ हा सगळ्यांच्याच आवडीचा विषय आहे. बॉलिवूडचा टायगर सलमान खान याने लायन क्राऊन एंटरटेनमेंट निर्मित ‘बोनस’ या चित्रपटाचा नुकताच मुहूर्त संपन्न केला आहे. यावेळी त्यांच्या सोबत लायन क्राऊन एंटरटेनमेंटचे गोविंद उभे, रतिश पाटील, संदेश पाटील आणि एम. नितीन उपस्थित होते.
 
 
आपल्या पहिल्याच चित्रपटाच्या निमित्ताने प्रेक्षकांना बोनस देऊ करणारे लायन क्राऊन एंटरटेनमेंटचे निर्माते या चित्रपटाविषयी बोलताना म्हणाले, “बोनस” हा शब्द आनंद आणि उत्साहाशी निगडीत आहे. आमच्या या चित्रपटाच्या निमित्ताने अवघा महाराष्ट्र ‘बोनस’चा आनंद आणि उत्साह साजरा करू शकेल, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.”
 
बोनस हा सिनेमा माणूसकीवर आधारित असून आयुष्यातील महत्त्वशील पैलूवर भाष्य करतो आणि सोबतच हा सिनेमा एक मजेशीर सफरही करून देईल असे त्यांनी यावेळी सांगितले.
 
मराठी सिनेसृष्टीत बोनस हा लायन क्राऊन एंटरटेनमेंटचा पहिलाच चित्रपट असला तरी त्यांनी हिंदी चित्रपट आणि अनेक हिंदी आणि मराठी मालिकांची निर्मिती केली आहे. या चित्रपटाची कथा सौरभ भावे यांनी लिहिली असून या चित्रपटाचं छायाचित्र दिग्दर्शन संजय मेमाणे करणार आहेत. तर या चित्रपटाला संगीताचा साज रोहन-रोहन या तरूण संगीतकार जोडीने चढवला आहे. गश्मीर महाजनी आणि पूजा सावंत हे कलाकार या चित्रपटात पहिल्यांदाच एकत्र दिसणार आहेत. या चित्रपटाच्या निमित्ताने लवकरच संपूर्ण महाराष्ट्राला ‘बोनस’मिळणार आहे असे म्हणण्यास हरकत ठरणार नाही.