स्वप्न साकारून आले
 महा एमटीबी  31-Jan-2018

 
तुम्ही भविष्यात काय करू शकता, हे तुम्ही वर्तमानकाळात उपसत असलेल्या कष्टांवर, भविष्यातील स्वप्ने साकारण्यासाठी मेहनतीवर अवलंबून असतं. या सर्व प्रवासात कितीही अडथळे आले तरी त्याला हसत-खेळत सामोरं गेल्यास तुमचं स्वप्नं प्रत्यक्षात साकार होतं, असा लाखमोलाचा सल्ला दिला आहे तो यंदाचा ‘पद्मश्री’ पुरस्कार जाहीर झालेल्या आदिवासी गोंड कलाकार भज्जू श्याम यांनी. त्यांच्या कार्याची दखल घेत भज्जू श्याम यांची ‘पद्मश्री’ पुरस्कारासाठी निवड करण्यात आली.
 
मध्य प्रदेशच्या जबलपूर येथील पाटणगड येथे जन्मलेल्या ४६ वर्षीय भज्जू श्याम यांचे बालपण आदिवासी भागामध्ये अतिशय हलाखीच्या परिस्थितीमध्ये गेले. आज भज्जू श्याम यांनी पेन्टिंगच्या जगामध्ये आपली एक वेगळी छबी निर्माण केली आहे. एकेकाळी सुरक्षारक्षकाची नोकरी करून उदरनिर्वाह करणारे भज्जू श्यामयांची चित्रे पुस्तकांमध्ये झळकू लागली आहेत. ‘द लंडन बुक’ या पुस्तकाच्या आतापर्यंत ३० हजार प्रति विकल्या गेल्या असून पाच भाषांमध्ये हे पुस्तक छापण्यात आले आहेत. भज्जू श्यामयांचा जन्म१९७२ मध्ये झाला. घरची आर्थिक परिस्थिती बेताची असल्यामुळे लहान-सहान गोष्टींचा उपभोग घेण्यासाठी, दैनंदिन गरजा भागविण्यासाठी त्यांना संघर्ष करावा लागला. वयाच्या १६ व्या वर्षी त्यांनी काही कारणांमुळे घर सोडलं. भज्जू यांनी नर्मदा येथील अमरकंटक येथे झाडे लावण्याचे काम हाती घेतले. परंतु, तिथे त्यांचं मनं रमलं नाही आणि त्यांनी भोपाळमध्ये स्थायिक होऊन तिथे सुरक्षारक्षक म्हणून काम करण्यास सुरुवात केली. त्यानंतर काही काळ त्यांनी इलेक्ट्रिशियन म्हणून काम केले. वयाच्या २५ व्या वर्षी आर्थिक परिस्थिती सुधारत असताना १९९३ मध्ये भज्जू यांच्या भोपाळमध्ये राहणार्‍या काकांनी त्यांना बोलावून घेतले आणि तोच काळ त्यांच्यासाठी ‘टर्निंग पॉईंट’ ठरला. भज्जू यांचे काका जनगढ सिंह हे एक चित्रकार होते. खरंतर जनगढ यांनी भज्जू यांना नोकरी मिळवून देण्याचे आश्वासन देऊन त्यांना भोपाळमध्ये बोलवून घेतले. त्यानंतर हळूहळू जनगढ यांनी विविध पेन्टिंग करताना भज्जू यांच्यावर छोट्या-छोट्या जबाबदार्‍या सोपविल्या. या लहान जबाबदार्‍या पेलत असतानाच भज्जू यांच्यामध्ये दडलेला एक चित्रकार घडत गेला.
 
खरंतर भज्जू यांची आई घरामध्ये पारंपरिक चित्र काढत असताना भज्जू त्यांना मदत करत असे. परंतु, तेव्हा त्यांनी ते काम फारस गांभीर्याने केले नाही. परंतु, काकाकडे आल्यानंतर भज्जू यांना त्यांच्यामध्ये असलेल्या कौशल्याची जाणीव झाली. दिवसेंदिवस भज्जू यांच्यामधील चित्रकार जागा होऊ लागला. त्याच्यातील कला बहरू लागली. यशाची अनेक दालने त्यांच्यासाठी खुली झाली. हे सगळं सुरू असतानाच १९९८ मध्ये दिल्लीमध्ये आयोजित केलेल्या एका प्रदर्शनामध्ये भज्जू यांच्या पाच चित्रांची विक्री करण्यात आली. आश्चर्याची बाब म्हणजे, यातून त्यांना १२०० रुपये मिळाले. खरंतर लहानपणापासून आर्थिक संकटांना तोंड दिलेल्या भज्जू यांना ते १२०० रुपयांचे मूल्य खूप जास्त होते. बघता बघता भज्जू यांची चित्रे थेट साता समुद्रापलीकडे पोहोचली. पॅरिस आणि लंडनमध्ये आयोजित केलेल्या प्रदर्शनामध्ये त्यांची चित्रे झळकू लागली. तिकडच्या लोकांमध्ये तो चर्चेचा विषय बनला. तसेच लंडनमध्ये प्रसिद्ध असलेल्या ‘मसाला जोन’ या रेस्टॉरंटच्या भिंतीवर त्यांच्या चित्राला स्थान देण्यात आले आहे. भज्जू यांना आतापर्यंत राज्य पुरस्कारासह इतरही अनेक पुरस्कार मिळाले आहेत. तसेच नेदरलँडस्, जर्मनी, इंग्लंड, इटली, किर्गिस्तान आणि फ्रान्समध्ये त्यांच्या चित्रांचे प्रदर्शन तसेच कार्यशाळा ते घेत आहेत. काळ्या रंगाचा कोट, साधा पण उठून दिसेल असा पेहेराव, चेहर्‍यावर झळकणारा नम्रपणा चारचौघांमध्ये जास्त खुलून दिसतो. आयुष्याच्या एका टप्प्यावर मिळालेले यश, प्रसिद्धी मिळवल्यानंतरही त्यांच्यातील हा साधेपणा विशेष भावतो.
 
 
- सोनाली रासकर