बिंदू ते सिंधू समाजकार्याचा उत्साही प्रवास
 महा एमटीबी  31-Jan-2018

स्वानंद जनकल्याण प्रतिष्ठान

 
 
 
 
झर्‍याला अनेक चढउतार, डोंगरदर्‍या, खाच खळग्यातून प्रवास करावा लागतो. अनेक छोट्या-छोट्या प्रवाहांना आपल्यामध्ये सामावून घ्यावे लागते, तेव्हा कुठे मोठा प्रवाह तयार होऊन झर्‍याला नदीचे रूप मिळते. अगदी तसंच स्वानंदचंदेखील झालं. छोट्या छोट्या उपक्रमातून स्वानंदने पुण्याच्या सिंहगड परिसरात अनेक सामाजिक उपक्रमाचे जाळे विणले आहे. देशनिष्ठेसाठी समाजकल्याण हा या संस्थेचा बाणा आहे.
 
 
एकदा पुण्याच्याच एका वस्तीतील बौद्ध विहारात एक कार्यक्रम घेण्यात आला. समृद्धी वर्गातील विद्यार्थ्यांनी कार्यक्रमाची सुरुवात बौद्धवंदनेने केली आणि सांगता पसायदानाने झाली. वस्तीवरील काही व्यक्तींनी याला विरोध करण्याचा प्रयत्न केला. पण, वस्तीतील महिलांनीच हा विरोध मोडून काढला. सामाजिक समरसतेचे यापेक्षा मोठे उदाहरण काय असू शकते? स्वानंदचे कार्यकर्ते म्हणून आम्हाला ही घटना खूप प्रेरणा देऊन गेली. स्वानंद जनकल्याण प्रतिष्ठानचे कार्यकर्ते स्वानंदबद्दल बोलताना सांगत होते. प्रकाश नावंदर, नंदन पेंडसे आणि सतीश कालगावकर यांच्या कल्पनेच्या त्रिवेणी संगमातून उगम पावलेल्या स्वानंद जनकल्याण प्रतिष्ठान रूपी झर्‍याची प्रवासाची सुरुवात प्रबोधनाच्या बिंदूने झाली होती. संस्थेची प्रत्यक्ष नोंदणी डिसेंबर २०१३ ला झालेली असली तरी संस्थेची मुहूर्तमेढ मात्र २०१० सालीच रोवली गेली. यावेळी प्रबोधन हे एकच ध्येय समोर होते. स्वानंदने पहिल्याप्रथम सावरकर स्मृती व्याख्यानमाला ९,१० व ११ नोव्हेंबर २०१० ला घेण्याचे निश्चित केले. प्रेक्षकांना बसण्याची गैरसोय होऊ नये म्हणून मोठी मोकळी जागा निश्चित केली आणि ऐन व्याख्यानाच्या वेळी नोव्हेंबर महिना असूनदेखील पाऊस आला आणि नाईलाजाने व्याख्यानाची जागा बदलून ती महात्मा फ़ुले सभागृहासारख्या बंदिस्त जागेत घ्यावी लागली. पण तरीही या व्याख्यानमालेला दोनशे प्रेक्षकांची उपस्थिती होती. ही गोष्ट कार्यकर्त्यांचा उत्साह वाढविणारी ठरली. नव्याने काही कार्यकर्ते या उपक्रमात सामील होण्यास तयार झाले. त्यापैकीच मी ही एक होतो. संस्थेचे सचिव, रवींद्र शिंगणापूरकर, संस्थेच्या अविश्वसनीय प्रवासाविषयी सांगत होते.
 
पुढे ते म्हणाले, ‘‘ पहिल्या वर्षी आलेल्या अनुभवावरून आम्ही दुसर्‍या वर्षापासून व्याख्यानमाला नोव्हेंबरऐवजी फेब्रुवारीमध्ये घेण्याचे ठरवले आणि त्याप्रमाणे स्वा. सावरकरांच्या स्मृतिदिनाच्या दिवसापासून म्हणजे २६ फेब्रुवारी ते २९ फेब्रुवारी २०१२ पर्यंत हा कालावधी निश्चित केला. पण नेमक्या त्याच कालावधीमध्ये बारावीची परीक्षा असल्यामुळे कॉलनीतील मुलांच्या अभ्यासात व्यत्यय आल्याची तक्रार आमच्याकडे आली. त्यातून अनुभव घेऊन आम्ही पुन्हा एकदा पुढच्या व्याख्यानमालेची वेळ बदलून ती जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यात घेण्याचे निश्चित केले तेव्हापासून प्रत्येक वर्षी याच तारखांना व्याख्यानमाला प्रचंड प्रतिसादासह अखंड चालू आहे. अनेक ज्वलंत असे प्रबोधनपर विषय या व्याख्यानमालेत तज्ज्ञ मांडतात. यातून जातीभेद मिटविण्याच्या संदर्भानेदेखील आवर्जून विषयाची मांडणी केली जाते. त्याचा परिणामही पुढे अनेक प्रसंगांमध्ये आम्हाला दिसून आला. लोकांच्या प्रतिक्रिया आमच मनोधैर्य वाढवतात. यावर्षीची व्याख्यानमाला दि. १ फेब्रुवारी ते ४ फेब्रुवारी २०१८ दरम्यान होणार आहे.’’
 
गम्मत शिबीर
 
२०११ ची व्याख्यानमाला संपल्यानंतर कार्यकर्त्यांची एक बैठक घेण्यात आली. प्रचंड उत्साह आणि वाढलेला आत्मविश्वासाने कार्यकर्त्यांनी या बैठकीत आपली मते मांडली आणि त्यातूनच गम्मत शिबिराचा जन्म झाला. शहरातली लहान मुले मैदानी खेळ, गावाकडची मजा यापासून पारखी होत चालली आहेत. शहरातल्या गर्दीत घुसमटत जगत आहेत, ही पोकळी गम्मत शिबिरामधून भरून काढावी, हा यामागे मुख्य हेतू होता. त्याबरोबरच शहरातील छोटे कुटुंब असलेल्या पालकांना आपल्या मुलांना एकटे राहण्याची सवय लागावी, असे नेहमी वाटत असते. पण, दोन दिवसदेखील मुलांना कुणाकडे एकटे सोडायचे हा प्रश्न आई-वडिलांना सारखा पडलेला असतो. असे बर्‍याच कार्यकर्त्यांच्या सांगण्यातून आले. ती उणीवही यामुळे भरून काढता येणार होती, कारण हे तीन दिवस दोन रात्री असे निवासी शिबीर असणार होते. त्याबरोबरच कार्यकर्त्यांनादेखील पुन्हा एकदा मुलांबरोबर बालपण अनुभवता येणार होते, यामुळे अगदी उत्साहात सर्वांकडून यासाठी अनुमोदन मिळाले. हे शिबीर शहरापासून लांब गावाकडच्या वातावरणात असावे, अशी कल्पना होती. म्हणून पहिले शिबीर एप्रिल २०११ मधे सिंहगडाच्या पायथ्याशी भरवायचे ठरले, मग त्याचे नियोजन सुरू झाले, शून्यातून नवनिर्मितीची प्रक्रिया किती आनंद देणारी असते याचा अनुभव कार्यकर्त्यांना येत होता. सर्वजण अगदी उत्साहात न चुकता बैठकांना हजर राहत होते. न थकता नियोजनाच्या कामात भाग घेत होते, कुठल्याही इव्हेंट मॅनेजमेंट इन्स्टिट्यूटमध्येदेखील मिळणार नाही असे इव्हेंट मॅनेजमेंटचे प्रत्यक्ष ट्रेनिंगच या अनुभवातून कार्यकर्त्यांना मिळत होते, याचा पुढे संस्थेला आणि कार्यकर्त्यांनाही खूप उपयोग होणार होता. भविष्यातील वादळे झेलून घेण्याची जणू रंगीत तालीमच स्वानंद करत होते. शिबिरात कोणकोणत्या खेळांची निवड करायची?, त्यासाठी आवश्यक प्रशिक्षण स्वयंसेवकांना कसे द्यायचे?, मुलांचा दिवसभराचा वेळ कसा उपयोगात आणायचा?, आणखी कोणकोणते अनुभव या लहान मुलांना देता येईल जेणेकरून हे शिबीर त्यांच्यासाठी अविस्मरणीय ठरेल?, संध्याकाळी काय काय गमतीजमती करता येतील?, खेळाबरोबरच मुलांना काही वेगळे शिकवता येईल का? ज्याचा त्यांच्या व्यक्तिमत्त्व विकासात फायदा होईल अशा एक ना अनेक भन्नाट कल्पना यावेळी सुचवल्या गेल्या. त्यापैकी ज्या सुटेबल आणि प्रॅक्टिकल वाटल्या त्यांना शिबिराच्या शेड्युलमध्ये सामील करण्यात आले. या शिबिरात असताना मुलांची काळजी कशी घ्यायची?, कोणत्या कार्यकर्त्याकडे कोणती जबाबदारी सोपवायची या सगळ्या गोष्टी अगदी व्यवसायिक पद्धतीने आणि व्यवस्थापनाचे नियम वापरून निश्चित करण्यात आल्या. मुलांनाही काही कार्यानुभव मिळेल, अशी व्यवस्थादेखील करण्यात आली. शिवाय काही क्लासरूम लेक्चरचादेखील यात समावेश केला गेला. थोडक्यात काय तर अगदी शस्रसज्ज होऊन मैदानात उतरण्याची तयारी करण्यात आली, पण आता प्रश्न आला तो असा की, या शिबिरासाठी जो खर्च होणार आहे त्याचे नियोजन कसे करायचे? हा सर्वात मोठा प्रश्न होता, कारण फक्त प्रबोधनाचा हेतू घेऊन निर्मिती झालेल्या स्वानंदला कोणत्याच प्रकारे ना आर्थिक अनुभव होता, ना आर्थिक मदतीचा हात. त्याचा विचारदेखील संस्थेने कधी केलेला नव्हता, मग आता तर एवढं मोठं आव्हान अचानक समोर येऊन उभं राहिलं, तेव्हा काय करायचं मोठाच प्रश्न होता, पण काही पालकांनीच सुचवलं की शिबिराचा होणारा खर्च सहभागपद्धतीने पालकांमध्ये वाटला जावा. हा उपाय सोपा होता, तो सर्वांना पसंत पडला, आणि त्याप्रमाणे आयोजन करण्यात आले.
 
या शिबिरामध्ये एक पक्षीतज्ज्ञदेखील नेण्यात आला होता, ज्याने निसर्गातले वेगवेगळे पक्षी मुलांना प्रत्यक्ष दाखवून त्यांची माहिती आणि वैशिष्ट्ये मनोरंजक पद्धतीने सांगितली. त्यामुळे मुलांच्या मनावर ती कायमस्वरूपी कोरली गेली. तेव्हापासून आजपर्यंत स्वानंद दरवर्षी न चुकता गम्मत शिबीर भरवत आहे, आत्तापर्यंत पुण्याजवळील फ़ुलगाव, उरवडे, कासारआंबोली अशा निसर्गरम्य परिसर असलेल्या गावात ही शिबिरे घेण्यात आली. त्यामुळे पुढच्या प्रत्येक शिबिराला मुलांची संख्या आणि उत्साह वाढतोच आहे. मागील शिबिरात सामील झालेली मुले पुढील शिबिरात कार्यकर्ता म्हणून येण्यास उत्सुक असतात, यातून स्वानंदशी अनेक कार्यकर्तेदेखील जोडले जात आहेत, अशा अनेक प्रवाहांना सामावून घेत स्वानंदचा प्रवाह आता मोठा होत चालला आहे. गम्मत शिबीर म्हणजे नुसती गम्मत न राहता ज्ञान शिबीर झाले आहे.
 
 
कौतुक सोहळा
 
गम्मत शिबिराच्या निमित्ताने अनेक विद्यार्थी तसेच पालक स्वानंदशी जोडले जात होते. त्यामुळे पालकांशी स्वानंदचा संवाद वाढत होता, मुलांमध्ये सामाजिक आत्मभान निर्माण व्हावे यासाठी काही करता येईल का? असा मुद्दा समोर आला आणि कौतुक सोहळ्याचा जन्म झाला. विद्यार्थी शिकत असताना, यशाचे अनेक टप्पे पार करत करत पुढे जात असतात, स्वत:ची ओळख निर्माण करायचा प्रयत्न करत असतात, त्यांच्या जीवनातल्या या अतिशय सुंदर आणि महत्त्वाच्या प्रवासात, त्यांचे पालक, शिक्षक, मित्र, समाज, यांचा देखील वेगवेगळ्या प्रकारे त्यांच्या यशात सहभाग असतो, याची जाणीव मुलांना झाली पाहिजे जेणेकरून पुढे जाऊन ते समाजाचे ऋण फेडण्यासाठी देशहितार्थ विचार करायला सुरुवात करतील, समाजाचा विचार करत आपल्या दिशा ठरवतील, समाजकार्यात आपला सहभाग नोंदवतील आणि देशाचे उत्तम नागरिक बनतील. या उदात्त हेतूनेच कौतुक सोहळ्याचे आयोजन दरवर्षी करण्यात येते. इयत्ता १० वी, १२ वी, पदवी, पदविका असे महत्त्वाचे टप्पे यशस्वीरित्या पार केल्याबद्दल विद्यार्थ्याचं कौतुक करावे, त्यांना विविध वाचनीय पुस्तके भेट द्यावीत, एकमेकांचे अनुभव शेअर करावेत, त्यांच्या पुढच्या प्रवासाला शुभेच्छा द्याव्यात, त्याचबरोबर तज्ज्ञांकडून त्यांना मार्गदर्शनाची संधी उपलब्ध करून द्यावी, असे या कार्यक्रमाचे स्वरूप असते. प्रचंड प्रतिसादात दरवर्षी याचे आयोजन केले जाते.
 
 
ई-कचरा व जुने कपडे संकलन
 
मार्च २०१५ पासून स्वानंदने काही सहयोगी संस्थांना बरोबर घेऊन, रस्ते तसेच भागाभागातील मोठ्या गृहनिर्माण सोसायट्यांमधून महिन्याच्या दुसर्‍या व चौथ्या रविवारी जुने कपडे, खेळणी, जुनी इलेक्ट्रॉनिक्सची उपकरणे, रद्दी इत्यादी गोळा करण्याचा उपक्रम सुरू केला आहे. या गोळा केलेल्या साहित्यातून वस्तीतील प्रशिक्षित महिलांकडून विविध गृहोपयोगी वस्तू तयार करून घेतल्या जातात. यात कापडी, कागदी पिशव्या, फाईल फोल्डर, पायपुसणी, आसन पट्टी, इ. वस्तूंचा समावेश असतो, तसेच वापरण्यायोग्य कपडे, वस्तू, खेळणी या अनाथालय, वसतिगृह यासारख्या गरजू संस्थांना दिल्या जातात. ई-कचर्‍याच्या स्वरूपात जमा होणार्‍या वस्तू उपकरणं दुरुस्त करून गरजू संस्थांना दिल्या जातात. उरलेल्या कचर्‍याची शास्रीय पद्धतीने विल्हेवाट लावण्यासाठी संबंधित संस्थांना हस्तांतरित केला जातो. या उपक्रमातून समाजात पर्यावरणाविषयी जागृती निर्माण करण्याचा प्रयत्न केला जातो.
 
दीपसंध्या
 
कार्यकर्ता समाजासाठी काम करत असतो, समाज या गोष्टीचं कौतुकदेखील करतो, पण कार्यकर्त्याच्या कुटुंबात मात्र तो काय समाजकार्य करतो हे माहीत असतंच असं नाही, कुटुंबाला कार्यकर्त्याविषयी अभिमान वाटावा, तो किती चांगलं आणि समाजहिताचं काम करतो हे कुटुंबाला कळावं, कार्यकर्त्याला घरातून प्रोत्साहन मिळावं आणि कार्यकर्त्यांच्या परिवारांचा एकमेकांशी परिचय वाढावा या हेतूने दीपसंध्येचं आयोजन केलं जातं, त्रिपुरारी पोर्णिमेला, दीपोत्सव साजरा करून, स्नेहभोजनाचा आणि गप्पांचा समावेश असतो.
 

समृद्धी वर्ग
 
२०१६ च्या मे महिन्यात एम.एस.डब्ल्यू. म्हणजे समाजकल्याण क्षेत्रात पदव्युत्तर शिक्षण घेत असलेले सहा विद्यार्थी स्वानंदकडे आले, त्यांना स्वानंदच्या माध्यमाद्वारे समाजकल्याणाचा प्रोजेक्ट करायचा होता, जो त्यांच्या अभ्यासक्रमाचाच एक भाग होता, स्वानंदकडे त्यांना समाजाभिमुख कामाचा अनुभव मिळेल, असा विचार करूनच त्यांनी स्वानंदच्या माध्यमातून प्रोजेक्ट करण्याचे निश्चित केलेले होते. स्वानंदने त्यांना आपल्या सगळ्या उपक्रमाची माहिती तर दिलीच पण खास त्यांच्यासाठी म्हणून एक योजना तयार केली. ज्यामध्ये या विद्यार्थ्यांना एक चांगला अनुभव मिळणार होता. स्वानंदने पुण्यातील सिंहगड रोडलगतच्या आठ गरीब वस्त्यांची निवड केली आणि या विद्यार्थ्यांना या वस्त्यांमध्ये सर्वेक्षण करण्यासाठी पाठवले, त्यामध्ये येथे राहत असणार्‍या कुटुंबाची सामाजिक, आर्थिक परिस्थिती, मुलांची संख्या त्यांची शैक्षणिक परिस्थिती अशा अनेक गोष्टींचा समावेश होता. अत्यंत चांगल्या प्रकारे हा सर्वे पूर्ण झाला. त्यानंतर स्वानंदने त्यांच्याकडे जमा झालेल्या माहितीचे वर्गीकरण केले. त्यामधून या वस्त्यांमध्ये काय काय समस्या आहेत हे लक्षात आल्यावर, स्वानंद एका नव्या उपक्रमाकडे जाण्यास सिद्ध झाले. येथील महिलांना रोजगाराची आवश्यकता आहे, असे लक्षात आल्यावर, स्वानंदने आपल्या ई-कचरा व जुने कपडे संकलन या उपक्रमाअंतर्गत जमा होणार्‍या वेस्टमधून कापडी व कागदी पिशव्या बनविण्याचे काम येथील महिलांना दिले. त्यासाठी त्यांना रितसर प्रशिक्षण देण्यात आले. यातून या महिलांना स्वानंद करत असलेल्या सामाजिक उपक्रमांची माहिती मिळाली. या महिलांनी स्वानंदकडे आग्रह धरला की आमच्या मुलांसाठीदेखील काहीतरी करा, या वस्त्यांमध्ये सर्वच जातीधर्माचे लोक राहत असल्या कारणाने सामाजिक समरसतेचा संदेश आपण करत असलेल्या कामातून समाजात जाईल व त्यातून जातीभेदाची दरी कमी होण्यास मदत होईल, याची जाणीव स्वानंदला होती. शिवाय या निमित्ताने येथील मुले मुलीही चांगल्या अनुभवातून समृद्ध व्हावीत, हा विचार करून स्वानंदने येथील मुलांसाठी समृद्धी वर्ग सुरू करण्याचा निर्णय घेतला. यासाठी वस्तीतल्याच जास्त शिक्षण झालेल्या मुलींना/महिलांना येथे स्वयंशिक्षिका म्हणून नेमण्यात आले. त्यांना रितसर प्रशिक्षण देण्यात आले, मुलांना एकत्र कसे आणायचे, समूहगीते कशी घ्यायची, उपलब्ध असलेल्या जागेत मैदानी खेळ कसे घ्यायचे, मुलांमध्ये आपापसात मैत्रीची साहचार्याची भावना कशी विकसित करायची, मुलांना स्वयंशिस्त कशी लावायची अशा अनेक गोष्टी प्रशिक्षणादरम्यान या शिक्षिकांना शिकविण्यात आल्या. शनिवार, रविवार संध्याकाळी एक ते दीड तास अशी या वर्गाची योजना केली. मुले नियमित येथे येऊन विविध खेळ खेळतात, समूहगीते म्हणतात, बोधकथा ऐकतात. डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलामांचा जन्मदिवस वाचन प्रेरणा दिवस म्हणून साजरा केला जातो. ग्रंथदिंडी काढली जाते. पहिले दोन वर्ग स्वयंसेवी शिक्षिकांची नेमणूक करण्यात आली होती, परंतु आज जवळजवळ १४ वस्त्यांवर समृद्धी वर्ग चालतात आणि २८ शिक्षिकांची नेमणूक त्यासाठी करण्यात आलेली आहे. वर्ग नियमित चालण्याच्या दृष्टिकोनातून सर्वच ठिकाणी आता या शिक्षिकांना मानधन दिले जाते, त्याचा या वर्गांवर सकारात्मक परिणाम झाला. वस्तीतील मुले जिल्हा परिषदेच्या शाळेत तर जात होती परंतु घरी अभ्यास करत नव्हती. काही मुले आडदांडपणे कुणाचेच ऐकत नव्हती, आज वेगळे आणि सकारात्मक चित्र पाहायला मिळते. महिन्यात दोनदा वर्गात शिकवणार्‍यांत शिक्षिकांची बैठक असते. यावेळी वर्गात झालेले उपक्रम, पुढचे नियोजन, अडीअडचणी, अचिव्हमेंट अशा गोष्टींवर चर्चा केली जाते. तीन महिन्यातून एकदा पालक सभा असते. यावेळी पालक या वर्गाची उपलब्धी किंवा सूचना सांगतात. समृद्धीच्या कामाची पोचपावती समाजातून मिळतच असते. त्याबाबत एक घटना सांगण्यासारखी आहे, सिंहगड रोडवरील पानमळा येथील वस्तीतील समृद्धी वर्गाच्या शिक्षिका मीराताई वाघमारे यांना जिल्हा परिषदेच्या शाळेतील मुख्याध्यापिकेचे बोलावणे आले. शिक्षिका घाबरली, तिला वाटले, आपल्याकडून काही चूक झाली की काय? तिने स्वानंदच्या ऑफिसमध्ये फोन केला. तिला ऑफीसमधून सांगण्यात आले की, ’’तू घाबरू नकोस शाळेत जाऊन ये आणि काय होते ते सांग.’’ ती शाळेत जाऊन मुख्याध्यापिकांना भेटली. विचारलं, ’’काय झाल?’’ मुख्याध्यापिकांनी तिचं प्रथम अभिनंदन केलं आणि विचारलं, ’’तुम्ही समृद्धी वर्गात खूप चांगलं शिकवता असं मला विद्यार्थ्यांकडून कळलं. काही विद्यार्थी जे वर्गात येत नव्हते, आले तर आडदांडपणा करायचे, भांडण करायचे, कुणाचं ऐकत नव्हते. अशा विद्यार्थ्यांमध्ये गेल्या काही दिवसांत खूपच सुधारणा दिसून येत आहे.’’ स्वानंदसारख्या संस्था सेवाभावी वृत्तीने समाजासाठी नवनवीन उपक्रम राबवत असतात. स्वानंदला भविष्यात ३२ सेवावस्तीमध्ये समृद्धी उपक्रम सुरू करायचा आहे. त्यासाठी सर्वच दृष्टीने लोकसहभाग अपेक्षित आहे. समाजातील सर्व घटकांनी समाजकार्यासाठी स्वानंदला सढळ हाताने मदत करावी, असे आवाहन स्वानंद करते.
 
 
 
 - काशीनाथ पवार (९७६५६३३७७९