युवकांना कौशल्य शिक्षण घेण्याचे पालकमंत्र्यांचे आवाहन
 महा एमटीबी  30-Jan-2018


अकोला : महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण केल्यानंतर युवक आणि युवतींना नोकरीचे ध्यास लागतात, परंतु सध्याच्या स्पर्धेच्या युगात तरुणांना नोकरीसाठी अनेक आव्हानांना तोंड द्यावे लागते. त्यामुळे तरुणांनी महाविद्यालयीन शिक्षणाबरोबरच कौशल्य शिक्षण देखील घेतले पाहिजे' असे आवाहन जिल्ह्याचे पालकमंत्री रणजीत पाटील यांनी केले आहे. जिल्ह्यातील राधादेवी गोयनका महिला महाविदयालय येथे आयोजित करण्यात आलेल्या 'रोजगार मेळाव्या'त ते बोलत होते.

देशातील एकूण लोकसंख्येच्या ६० टक्के लोकसंख्या ही चाळीशीच्या आत आहे. तसेच देशाची ५० टक्के लोकसंख्या महिलांची आहे. स्त्री शक्तीला योग्य व्यासपिठ मिळाले तर देशाच्या विकासासाठी ही स्त्रीशक्ती कामी येवू शकते हा विचार करून देशाच्या बांधणीसाठी काम करीत असताना स्त्रियांनी देखील शिक्षणासोबतच आपल्या ठायी कौशल्य निर्माण करावे, असे आवाहन पाटील यांनी केले. प्रशिक्षण घेतांना प्रशिक्षणाचा सर्व खर्च शासन करणार आहे. याचा लाभ युवतींनी घ्यावा असेही ते म्हणाले. तसेच आजची पिढी ही मोबाईल फोनचा अधिक आहारी जात आहे, त्यामुळे तरुणांनी मोबाईल फोनचा वापर कमी करावा, असे ते म्हणाले.