पाकिस्तानने धरला रशिया, चीन आणि युरोपचा रस्ता

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    30-Jan-2018
Total Views |


सैनिकी साहित्यांसाठी यापुढे अमेरिकेचे सहाय्य नाही

पाक संरक्षण मंत्र्यांची घोषणा





इस्लामाबाद :
अमेरिका आणि पाकिस्तान यांच्यात मैत्रीपूर्ण संबंधांमध्ये निर्माण झालेला तणाव आता अखेरच्या टोकाला पोहचत असल्याचे दिसत आहे. कारण यापुढे पाकिस्तानसाठी अमेरिकेकडून कसल्याही प्रकारचे सैनिकी सहाय्य घेण्यात येणार नसल्याचे पाकिस्तानकडून स्पष्ट करण्यात आले आहे. पाकिस्तान आपल्या परराष्ट्र धोरणांमध्ये आता काही महत्त्वाचे बदल करणार असून सैनिकी साहित्यांसाठी तसेच साहाय्यासाठी यापुढे पाकिस्तान अमेरिकेवर अवलंबून राहणार नाही, अशी घोषणा पाकिस्तानचे संरक्षण मंत्री खुर्रम दस्तगीर यांनी केली आहे. त्यामुळे दोन्ही देशांमधील संबंध आता नेमक्या कोणत्या वळणावर जाणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

इस्लामाबाद येथे झालेल्या पत्रकार परिषदेत दस्तगीर यांनी आज ही घोषणा केली. 'पाकिस्तान आपल्या परराष्ट्र धोरणांमध्ये काही नवीन बदल करत असून आपल्या शेजारील आणि युरोपीय देशांची संबंध आणखीन बळकट करण्यासाठी यापुढे प्रयत्न करण्यात येणार आहे' असे दस्तगीर यांनी म्हटले. तसेच आपल्या शेजारील राष्ट्रांबरोबर असलेले संबंध आणखीन दृढ करण्यासाठी यापुढे पाकिस्तान आपल्याला लागणारे सैनिकी साहित्य आणि सहाय्यांसाठी चीन, रशिया आणि युरोपियन देशांवर अवलंबून राहील, असे दस्तगीर यांनी स्पष्ट केले आहे.



गेल्या वर्षभरात अमेरिका आणि पाकिस्तान यांच्यातील संबंधांमध्ये कमालीचा तणाव निर्माण झाला आहे. अमेरिकेतील ट्रम्प प्रशासनाने दहशतवादावरून पाकिस्तानला गेल्या वर्षभरात अनेक वेळा लाथाडले आहे. तसेच अमेरिकेकडून देण्यात येणारी सर्व प्रकारची आर्थिक मदत देखील रोखली आहे. याचाच फायदा घेत अमेरिका पारंपारिक शत्रू समजल्या जाणाऱ्या रशियाने पाकिस्तानला मदतीचा हात पुढे केला आहे. तसेच चीनचे सहाय्य तर नेहमीच पाकिस्तानला मिळत आले आहे. त्यामुळे अमेरिकेला उत्तर देण्यासाठी पाकिस्तान आत नवीन खेळी खेळत असल्याचे दिसत आहे, त्यामुळे पाकिस्तानच्या या नव्या डावाचा पाक-अमेरिका संबंधावर आणि मुख्य म्हणजे पाकिस्तानवर काय परिणाम होतो ? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
@@AUTHORINFO_V1@@