'त्याला' प्रेक्षकांना 'अनकंफर्टेबल' करायला आवडतं!
 महा एमटीबी  30-Jan-2018"आहो नाना, आजकालच्या चित्रपटात फारसा दम नाही राहिला.
'जो बिकता है, वो दिखता है,' याच सूत्रावर आधारित चित्रपट बनविले जातात.''
वरील वाक्याने चहाच्या टपरीवर रंगलेल्या एका परिसंवादाची सांगता झाली. मी यावर थोडा विचार केला. खरंच!! असंख्य गोळ्या मारल्यावरही गाफील झालेल्या नायकाला मारायला धावणारा खलनायक, गुंडांनी बेदम मारल्यावरही नायिकेच्या एका हाके सरशी परत गुंडांच्या ताफ्यात स्वतःला झोकून देणारा 'दबंग' नायक, उंच उंच इमारतींवरून झलांग मारली तरी एक खरोचही न येणार नायक या सगळ्याच गोष्टी आता नावीन्य नसणाऱ्या वाटू लागल्या आहेत. एकूणच या चंदेरी दुनियेत तर्कशास्त्र, वास्तव या गोष्टींचा अभाव प्रकर्षाने जाणवू लागला. पण अशा विसंगत चित्रपटांच्या 'पैंडोरा बॉक्स' मध्ये एक तार्किक अंकुर मात्र आपली नजर वेधून घेतल्याशिवाय राहत नाही. "And they lived happily ever after" असा शेवटी संदेश देणाऱ्या चित्रपटापेक्षा एका साध्या इसमाचा नायक होण्यापर्यंतचा प्रवास दाखवणारा लेखक-दिग्दर्शक, प्रेक्षक वर्गाची काहीतरी नवीन बघण्याची भूक भागवून,किंबहुना ती भूक द्विगुणित करणारा सिनेमायोगी म्हणजे अनुराग कश्यप!

गोरखपूर वरून वैज्ञानिक होण्यासाठी बाहेर पडलेला हा विद्यार्थी 'पृथ्वी थिएटर'च्या बाहेर निःशुल्क स्क्रिप्ट लिहून द्यायचा. "वो फ्री मे स्क्रिप्ट देनेवाला..." अशी त्याची ओळख झाली होती. त्याने लिहिलेल्या 'स्क्रिप्ट'साठी त्याला कधी ना क्रेडिट मिळालं ना पैसा. त्याच्या याच संघर्षाच्या काळात राम गोपाल वर्मानी हा हिरा ओळखला. त्याच्या आधीचे लेखन पाहून रामूने थेट अनुरागला 'सत्या'च लिखाण करायची संधी दिली. त्यानंतर अनुरागची गाडी सुसाट सुटली व त्याने पुन्हा कधीही मागे वळून पाहिले नाही. 'Outsider' म्हणून आलेला अनुराग, खऱ्या आयुष्यात स्वतःच 'मुक्काबाज' आहे. त्याला प्रत्येक गोष्टीसाठी अखंड झगडावे लागले. एकेकाळचा 'फ्री राईटर' आज सगळ्यात जास्त 'डिमांड' मध्ये असलेला लेखक झाला आहे.
 
 
 
जिथे मेनस्ट्रीम सिनेमा पेक्षा इतर विषयांना हात लावायला मोठ-मोठे दिग्गज धजत नाहीत, तेथे अनुराग असे विषय लिलया हाताळून ते लोकप्रियही करतो. 'ब्लॅक फ्रायडे', 'देव डी', 'गँग्स ऑफ वासेपूर', 'बॉम्बे टॉकीज', 'रमन राघव' आणि नुकताच आलेला 'मुक्काबाज' अशा एकापेक्षा एक चित्रकृतींची आतषबाजी गेल्या अनेक वर्षांपासून अनुराग करत आला आहे. त्याच्या सिनेमांचं बजेट कमी असतं, पण भव्यता मात्र जास्त असते. काल्पनिक सेट तयार करण्यापेक्षा 'लाईव्ह लोकेशन'वर शूटिंग करण्यावर त्याचा जास्त भर असतो आणि हीच ठरते त्याचा सिनेमाची 'यूएसपी'. त्याच्या सिनेमातल्या विनोदबुद्धीला आपण Dark Comedy म्हणू शकतो. म्हणजे एखाद्या विनोदावर हसू आलं तरी हसावं की नाही असा प्रश्न पडतो. प्रेक्षक अस्वस्थ होतो आणि मग हसतो. त्याला असं करण्यात खूप मजा येते. त्याला लोकांना 'अनकंफर्टेबल' करायला आवडतं!
 
त्याच्या सिनेमात तो बहुतांश वेळा सत्य परिस्थिती दाखवतो. जर तुम्ही 'मुक्काबाज' सिनेमा पहिला, तर त्यातून तुम्हाला भारतात 'बॉक्सिंग'ची सत्य परिस्थिती दिसते. आपल्या देशात 'बॉक्सिंग' पहायला जाणार प्रेक्षक खूप कमी आहे. त्यामुळे अर्थातच या चित्रपटाला खूप काही उदंड प्रतिसाद मिळाला नाही. विशेष म्हणजे या चित्रपटात कुठेही 'व्हीएफेक्स'चा वापर करून प्रेक्षक वाढविण्याचा प्रयत्न केला नाहीये. यालाच म्हणतात Realistic सिनेमा!! अनुरागची आणखी एक खासियत म्हणजे त्यानी ज्या अभिनेत्याला ब्रेक दिलाय त्याचं पुढे बॉलीवूडमध्ये 'भलचं' झालाय. आत्ता सुद्धा ज्या विनीत कुमार सिंगला प्रमुख कलाकार म्हणून चित्रपटात घेण्यास अनेक दिग्दर्शक तयार नव्हते त्याच विनीतला अनुरागने संधी दिली. विनीतने याआधीही अनुरागच्या 'गँग्स ऑफ वासेपूर' व 'बॉम्बे टॉकीज'मध्ये भूमिका केली आहे. पण 'मुक्काबाज' हा त्याचा पहिलाच 'सोलो' चित्रपट! काय झकास अभिनय केलाय विनीतने यामध्ये, त्याने श्रवणच्या व्यक्तिरेखेसाठी घेतलेली प्रचंड मेहनत 'मुक्काबाज'मधून दिसून येते. नवाझुद्दीन सिद्दीकी, हुमा कुरेशी हे बॉलीवूडला अनुरागनेच दिलेले हिरे आहेत. नवाझ एक असा नट होता ज्याला कुठल्याही सिनेमात 'साईड ऍक्टर' म्हणून पण रोल मिळत नव्हता, त्याला अनुरागने आपल्या सिनेमात हिरोचा रोल दिला. नवाझ मध्ये असलेल्या खऱ्या 'टॅलेंट'ची ओळख जगाला करून देण्यामागे अनुराग कश्यपचा फार मोठा हात आहे.
 

 
 
अनुरागच्या सिनेमातल्या गाण्यांचं एक वेगळंच वैशिष्ट्य असतं. 'टॅलेंट' ओळखण्यासाठी पण 'टॅलेंट' लागतं आणि त्यात अनुराग कश्यप चोख आहे. मग ती दुर्गा असो (जिला लोकल ट्रेन मध्ये ऐकून GOW मध्ये तिच्या कडून 'छि छा लेदर' हे गाणं म्हणवून घेतलं) किंवा मुक्काबाज सिनेमातल्या 'पैतरा' गाण्यात नाचणारा अंकीत सिंह असो (ज्याला वरणासीत घाटावर नाचताना पाहून सिनेमात काम दिलं).
 
 
 
 
 
 
वास्तवाचे दाहक दर्शन हे अनुरागच्या चित्रपटांचे वैशिट्य असते. तो फार 'डार्क फिल्म' करतो असे आरोप त्याच्यावर झाले आहेत. पण तो दाखवतो त्यातून समाजाचेच कोणतेतरी प्रतिबिंब परिवर्तित होत असते. त्याचा कुठलाही चित्रपट आज पुन्हा काढून बघितला तर त्या चित्रपटातले पात्र कुठे ना कुठे अस्तित्वात असल्याचेच दिसून येते. अनुरागचा 'रमन राघव' अंगावर येतो, सुन्न करतो पण समाजातील अशी विकृती दाखवण्याचं धाडस फक्त अनुरागचं करू शकतो हे देखील तो सिद्ध करून जातो. चंदेरी दुनियेचा 'Outsider' ते 'Insider' होण्याच्या प्रवास त्यांनी खूप जवळून पहिला आहे. प्रेक्षक आणि सिनेमा पाहण्याचा दृष्टिकोन या दोन्ही बाबी झपाट्याने बदलतायत. या बदलला आपलेसे करणारा आणि प्रेक्षकांना 'अनकंफर्टेबल' करून त्यांना काही क्षण विचार करायला लावणारा अनुराग हा नव्या दमाचा दिग्दर्शक आहे. अनुरागचा सिनेमा एक दर्पण बनून तुम्हाला तुमचं खरं व्यतिमत्व दाखवतो. आपल्या आत खोलवर एक श्रवण सिंह (मुक्काबाजचा नायक) लपलेला आहे, हे आपल्याला सिनेमा पाहिल्यावर कळतं. आता प्रश्न हा आहे की खरंच आपण आपलं अंतरंग बघायला तयार आहोत का?

- रश्मी जोशी