पोरकट श्रेयवाद
 महा एमटीबी  30-Jan-2018

प्रजासत्ताक दिनी राजपथावर झालेल्या संचलनामध्ये शिवराज्याभिषेकाची प्रतिकृती साकारणार्‍या महाराष्ट्राच्या चित्ररथाने प्रथम क्रमांकाचे पारितोषिक पटकावले, ही खरंच अभिमानाची बाब आहे. पण, इतिहास हा नेहमी वादाचा विषयच ठरतो हे पुन्हा एकदा अधोरेखित झाले ते या चित्ररथाच्या श्रेयवादामुळे. शिवरायांच्या राज्याभिषेक सोहळ्याची प्रतिकृती तयार करण्याची मूळ संकल्पना कोणाची आणि त्याची सर्वोत्तम चित्ररथ म्हणून निवड करण्यात आल्यानंतर त्याचे श्रेय नेमके कोणाचे, यावरून कलाकारांमध्येच श्रेयवादाचे नाट्य रंगले. या संकल्पनेचे मूळ श्रेय कलादिग्दर्शक नितीन देसाई यांचे की प्रा. नरेंद्र विचारे यांचे, हा प्रश्न सोशल मीडियावर उपस्थित झाला. पण, मुळात अशाप्रकारच्या श्रेयवादाला तोंड फुटणे हीच मुळी महाराष्ट्रासाठी शरमेची बाब म्हणावी लागेल. आधीच शिवाजी महाराजांच्या इतिहासावरून महाराष्ट्रात राजकीय पोळी भाजून घेतली जाते. त्यावरून नेहमीच उलटसुलट चर्चा रंगतात. असे असताना राज्याभिषेक सोहळ्यावरून दोन कलादिग्दर्शकांमध्ये श्रेयवादाची लढाई रंगणे हे दुर्देवीच म्हणावे लागेल. या वादात प्रा. नरेंद्र विचारे यांच्या विद्यार्थ्यांनी उडी घेत नितीन देसाई कसे श्रेय लाटत आहेत याचे प्रदर्शन मांडले. या चित्ररथाची उभारणी करणारे नितीन देसाई यांनी प्रा. विचारे यांच्या संकल्पनेचे श्रेय घेण्याचा प्रयत्न केला, असे म्हटले जात आहे. त्यामुळे प्रा. विचारे यांच्या विद्यार्थ्यांनी सोशल मीडियावर ही संकल्पना प्रा. विचारे यांची असल्यासंदर्भात माहिती देणार्‍या पोस्ट केल्या होत्या. देसाई यांनी संकल्पनेचे श्रेय घेऊ नये, असेही आवाहन त्यामध्ये करण्यात आले होते.
दरम्यान, ही संकल्पना सांस्कृतिक मंत्री विनोद तावडे यांची होती. तरीदेखील श्रेयवाद रंगल्याने या पुरस्काराचा आनंद घेण्याऐवजी निर्माण झालेला वाद क्लेशदायक आहे. दोन्ही ज्येष्ठ कलावंतांना व्यासपीठावर स्थान देण्यात आले. त्यांचे मानधनही देण्यात आले. असे असतानाही हा वाद रंगल्याने कलावंतांना, त्यांच्या अनुयायांना काय म्हणावे, हा प्रश्नच आहे. महाराष्ट्राच्या परंपरेचे, इतिहासाचे दर्शन घडवतानाही श्रेयवाद रंगतो ही खेदाची बाब आहे. भविष्यात असे वाद टाळता येतील का? किंवा असे वाद होऊ न देता जर महाराष्ट्रासाठी काही करता आले तर ते कुठल्याही पुरस्कारापेक्षा नक्कीच अभिमानास्पद ठरेल.
 
हलगर्जीपणाचा बळी
 
आजही ‘डॉक्टर म्हणजे देव’ हे खूळ भारतीयांच्या डोक्यात कायम आहेच आणि म्हणूनच रुग्णाला दवाखन्यात दाखल करण्यात आल्यानंतर तो बरा होईपर्यंत डॉक्टर काहीही करू शकतात, या आशेवर रुग्णाचे नातेवाईक रुग्णालयात प्रतीक्षा करत असतात. रुग्ण बरा झाल्यास डॉक्टर देव असतो, रुग्ण दगावल्यास क्षणार्धात मात्र तो हिंसेचा बळी ठरतो. वेळप्रसंगी रुग्णालयाची तोडङ्गोड होते. डॉक्टरांना मारहाण केली जाते. या मारहाणीच्या निषेधार्थ डॉक्टरांच्या संघटना संपाचे हत्यारही उगारतात. परिणामी, शासनाला काही ना काही उपाययोजना कराव्या लागतात आणि संप मागे घेण्यात येतो. पण, मुंबईच्या नायर रुग्णालयात घडलेला धक्कादायक प्रकार हा केवळ आणि केवळ हलगर्जीपणाचा बळीच म्हणाला लागेल.रुग्णालय प्रशासनाचा बेजबाबदार कारभार यामुळे अधोरेखित होतो. राजेश मारू त्याच्या बहिणीच्या सासूला बघायला नायर रुग्णालयामध्ये आला होता. पण, वॉर्डबॉय विठ्ठल चव्हाण आणि महिला कर्मचारी सुनीता सुर्वे यांनी त्यांच्या कामात केलेला हलगर्जीपणा राजेशच्या जीवावर बेतला. एमआरआय रूममध्ये धातूच्या वस्तू नेण्यास मनाई असतानाही वॉर्डबॉय विठ्ठल चव्हाण याने ऑक्सिजन सिलिंडर राजेशला आत नेण्यास सांगितले. म्हणजे विठ्ठल चव्हाण याला एमआरआय रूममध्ये जाताना काय काळजी घ्यावी हे माहीत नव्हते का? असा प्रश्न उपस्थित होतो. रुग्ण दगावल्यानंतर संतप्त नातेवाईकांकडून होणारी रुग्णालयाची तोडङ्गोड जर डॉक्टरांच्या संघटनेकडून खपवून घेतली जात नसेल, तर डॉक्टरांकडून झालेल्या या हलगर्जीपणाविरोधात नातेवाईकांनी काय करायचे? डॉक्टरांसाठी काम करणार्‍या संघटना याप्रकरणी आपली भूमिका स्पष्ट करणार का? रुग्णाच्या सेवेत हलगर्जीपणा करणार्‍या डॉक्टरांवर काय कारवाई होणार? यांसारखे अनेक प्रश्न अशा घटनांमुळे उपस्थित होतात. भविष्यात अशा घटना घडल्यास त्यासाठी रुग्णाला न्याय मिळेल, असा सक्षम कायदा करणे आवश्यक आहे. भरगच्च बिल रुग्णाच्या नातेवाईकाच्या हाती सोपवून मोकळी होणारी डॉक्टरी जमात आता दिवसेंदिवस ‘व्हाईट कॉलर’ क्राईमकडे झुकते आहे. रुग्णांची ङ्गसवणूक, दवाखान्यात सोयीसुविधा नसणे, सुरक्षा नसणे, याबाबत रुग्णांना तातडीने न्याय मिळेल, अशी व्यवस्था निर्माण करण्याची गरज आहे. रुग्णाच्या प्रकृतीची काळजी घेणे जसे डॉक्टरांच्या हाती आहे, त्याच पद्धतीने रुग्णाच्या नातेवाईकांच्या सुरक्षिततेची काळजी ही त्या त्या रुग्णालयाची जबाबदारी आहे. रुग्णाच्या नातेवाईकांच्या सुरक्षेसाठी प्रयत्न करणे काळाची गरज आहे; अन्यथा डॉक्टरांवरील हल्ले कमी होण्याऐवजी राजेश मारू प्रकरणामुळे वाढण्याचीच जास्त शक्यता आहे.
 
 
- तन्मय टिल्लू