'माझे वडिल मुख्यमंत्री होते त्यामुळे जेनेलिया दोन दिवस माझ्याशी बोलली नाही'
 महा एमटीबी  03-Jan-2018

 
मुंबई : 'तुझे मेरी कसम' या हिंदी चित्रपटातून रितेश देशमुख आणि जेनेलिया डिसुझा यांनी अभिनयाच्या क्षेत्रात पहिले पाऊल ठेवले. विजया भास्कर यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले होते. याच चित्रपटातून रितेश आणि जेनेलियाची ही 'जोडी' म्हणून चाहत्यांच्या पसंतीस पडली. ३ जानेवारी २००३ साली हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. आज या गोष्टीला १५ वर्ष पूर्ण झाल्याने रितेश देशमुखने याविषयीच्या आठवणी सोशल मीडियावरून ताज्या केल्या आहेत. तो एक आठवण सांगताना म्हणतोय, ''चित्रीकरण सुरु झाल्यानंतर जेनेलिया पहिले दोन दिवस माझ्याशी काहीच बोलली नव्हती, कारण माझे वडिल त्यावेळी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते.''
 
 
 
पुढे आणखी एका पोस्ट मध्ये रितेश लिहितोय, ''जेनेलियाने मला पहिला प्रश्न विचारला होता, 'तुझे सुरक्षारक्षक कुठे आहेत?' त्यावर मी उत्तरलो, 'मला अशी कोणतीही सुरक्षा नाहीये.'' या चित्रपटाने माझे आयुष्य बदलले, यानिमित्ताने एक आर्किटेक्ट अभिनेता बनला व माझी सहकलाकार पुढे जाऊन माझी बायको झाली; असेही रितेशने त्याच्या एका पोस्ट मध्ये नमूद केले आहे.
 
 
 
 
 
विशेष म्हणजे रितेशने आज 'तुझे मेरी कसम'चे दिग्दर्शक विजया भास्कर व निर्माता रामोजी राव यांचे आदरपूर्वक आभार मानले आहेत. पंधरा वर्षानंतर आज रितेश आणि जेनेलिया या दोघांच्याही चाहतावर्गात प्रचंड मोठी वाढ झालेली आहे. त्यामुळे रितेशच्या या पोस्टला सोशल मीडियावरून चांगलाच प्रतिसाद मिळताना दिसतो आहे.