कविता ही प्रतिकांच्या भाषेत बोलणारी : श्रीकांत देशमुख
 महा एमटीबी  28-Jan-2018
 
 
 
‘‘सर्जनशील, ललित किंवा कलात्मक वाङ्‌मयाचे ज्या काही थोड्या स्थूल वाङ्‌मयप्रकारांत वर्गीकरण केले जाते, त्यात ‘काव्य’ हा वाङ्‌मयप्रकार मोडतो’’, असे दिलीप चित्रे म्हणतात. मराठी पद्यरचना किंवा कवितांना आठ ते नऊ शतकांहून अधिक वर्षांचा समृद्ध इतिहास आहे. या इतिहासात म्हाईंभटापासून ते ज्ञानेश्वर, तुकराम, सावतामाळी, तर आधुनिक काळात कुसुमाग्रज, बोरकर, ढसाळ यांनी आपल्या लेखनाने हा इतिहास अधिकाधिक समृद्ध केला. नुकताच श्रीकांत देशमुख यांच्या ‘बोलावें ते आम्ही’ या काव्यसंग्रहाला साहित्य अकादमीचा पुरस्कार मिळाला. त्या निमित्ताने मराठी कविता, मराठी कवितेतील स्थित्यंतरे, आगामी काळात वाचकांच्या भेटीला येणारी त्यांची पुस्तके याविषयी ‘महा एमटीबी’ने त्यांच्याशी साधलेला हा खास संवाद...
 

तुमच्या कवितांच्या केंद्रस्थानी प्रामुख्याने शेतकरी असण्याचे कारण काय?
 
कुठलाही लेखक तो ज्या सामाजिक वातावरणात जन्मला आहे, वाढला आहे, जे जगणं तो जवळून पाहत आलेला आहे, त्याविषयीचं प्रामुख्याने त्याने बोललं पाहिजे, यामुळे लेखनात एकप्रकारचा जिवंतपणा येऊ शकतो. माझा जन्म एका शेतकरी कुटुंबात झाला. आजही माझे कुटुंबीय शेती करतात. मी सध्या जरी नोकरी करतो असलो तरीही माझा संबंध शेतीशी आहे. केवळ माझ्या कुटुंबीयांचा शेतीचा व्यवसाय असल्यामुळे माझ्या लेखनाचे केंद्र शेती आहे, असे नाही. आपल्या देशात बहुसंख्य लोकांशी संबंधित व्यवस्था ही शेतीची आहे. पूर्वी असे म्हटले जायचे की, ८० टक्के लोक खेड्यात राहतात आणि शेती करतात. आता ते प्रमाण बदलले असेल. पण आजही भारत हा कृषिप्रधान देश आहे, हे वास्तव नाकारुन चालणार नाही. या वास्तवात दैनंदिन जगणारे कोट्यवधी लोक आहेत आणि त्या कोट्यवधींच्या कृषिसमूहाचा मी एक घटक आहे. ज्या माणसांनी मला जन्म दिला, वाढवलं, संस्कार दिले किंवा ज्या माणसांनी मला मातीपासून दूर ढकललं, ‘‘आमच्यासारखा तू सुद्धा मातीत राबशील, तर तुझ्याही पदरी निराशा येईल, हाल अपेष्टेचे जगणे तुझ्या वाटेला येईल,’’ अशी जाणीव त्यांच्या मनात सुप्त स्वरूपात होती आणि यातून शेतकर्‍याच्या मुलाने शेती व्यवसायातून बाहेर पडले पाहिजे आणि ध्येय बदलले पाहिजे, ही जाणीव खेड्यांमध्ये प्रातिनिधीक लोकांमध्ये होती. त्यामध्ये माझे वडीलही होतेच. ‘इंग्रजी शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे’, हे बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितले आणि ते घेतल्याशिवाय दलितांना पर्याय नाही. अशा प्रकारे खेड्यापाड्यातील कष्टकर्‍यांची मुलं आहेत, त्यांनाही शिकण्याशिवाय पर्याय नाही. शेतीत जे साचलेपण होतं, त्यातून मी बाहेर पडलो. हा पहिला भाग झाला. दुसरा भाग असा की, मी शासकीय अधिकारी आहे. शेतीव्यवसायावर माझा उदरनिर्वाह आता अवलंबून नाही. पण, ज्या समूहाचे प्रतिनिधीत्व करून मी आज शहरात जगतोय, त्या समूहाची अवस्था आज काय आहे? आज कृषिसंस्कृतीची अवस्था काय आहे? रुढी बदलल्या, माणसं बदलली, खेड्याचे शहरीकरण होत असतानाही इथल्या माणसांचे मूळ शेतीचे जे वर्षानुवर्षे प्रश्न आहेत ते मात्र सुटलेले नाहीत. याचा पुरावा काय, तर शेतकर्‍यांच्या होणार्‍या आत्महत्या. एका विनाशाच्या उंबरठ्यावर ही व्यवस्था उभी आहे की काय, असा भास होण्याची परिस्थिती आपल्याला वारंवार समोर दिसते. ज्या समूहाचे मी प्रतिनिधीत्व करतो, त्या समूहाशी माझी बांधिलकी आहे ती ही व्यापक अर्थाने. जे प्रस्थापित नाहीत, बिनचेहर्‍याचे आहेत, त्यांच्याबद्दल मी बोललं पाहिजे. म्हणून माझी कविता ही शेतकर्‍यांबद्दल आणि स्त्रियांबद्दल बोलणारी आहे.
 
 

 
अभिव्यक्तीसाठी कवितेचे माध्यम निवडण्याचे नेमके कारण काय?
 
मी फक्त कवितेचेच माध्यम निवडले असे नाही. पण, कविता हा मला जवळचा वाड्‌मय प्रकार वाटतो. त्याचं कारण असं की, बहुसंख्य वाड्‌मय हे पद्य वाड्‌मय आहे. म्हणजे चक्रधारांचे लीळा चरित्र, नंतरचे बखर वाड्‌मय सोडले तर ज्ञानेश्वरांपासून ते तुकोबांपर्यंत सगळं वाड्‌मय पद्य वाड्‌मय आहे. सर्व संत साहित्यात शेतकरी जाणिवांचा अंश आपल्याला सतत जाणवतो. आपल्याकडे जी मध्ययुगीन परंपरा आहे, ती प्रामुख्याने शेतकरी समाजाची आहे. या वाड्‌मयाला अध्यात्माची चौकट आहे. पण, त्या चौकटीतही ते शेतीविषयी बोलतात. आधुनिक काळात महात्मा जोतिबा फ़ुलेंनी शेतकर्‍यांच्या प्रश्नांवर सर्वंकष पद्धतीने शेतीच्या दुःखाविषयी भाष्य केले होते. त्यानंतर विठ्ठल रामजी शिंदे असतील, सत्यशोधक समाज असेल, क्रांतिसिंह नाना पाटील असतील हे सगळे शेतीविषयी बोलले आहेत. तेव्हा, मुद्दा असा आहे की, कविता हा अभिव्यक्तीसाठी माध्यमप्रकार का निवडला, तर कविता ही संपृक्त अवस्थेत व्यक्त होण्याचे चांगले माध्यम आहे. जे माध्यम स्वतःशी बोलत असताना इतरांशीही बोलत असतं. यामुळे स्वसंवाद, दुसर्‍याशी संवाद आणि समूह संवाद साधता येतो. आपल्याकडे वेदना, विद्रोह हा बहुतांश कवितेतून व्यक्त झालेला आहे. कविता हा वाड्‌मय प्रकार संवेदनशीलकडे जास्त जवळ जाणारा वाड्‌मय प्रकार आहे. कविता हा सर्वश्रेष्ठ वाड्‌मय प्रकार असल्याचे माझे मत आहे. आमचे सर्वश्रेष्ठ पूर्वज म्हणून मी ज्ञानोबा आणि तुकारामांकडे पाहतो. जोपर्यंत मानवी समूह आहे, तोपर्यंत तुकोबांचे साहित्य जिवंत राहील. यांच्या नितांत जवळ जाण्यासाठी कविता हा प्रकार मला जास्त भावतो. याशिवाय मी वैचारिक, कादंबरी, ललित लेखनही केलेले आहे. ‘कुळवाडी भूषण’ या माझ्या पुस्तकात मी शिवाजी आणि शेती यांची मांडणी केली आहे. या आधी अशी मांडणी शरद जोशी यांनी केलेली होती. ‘पडझड वार्‍याची भिंत’ या नावाने मी ललित लेखनही केलेले आहे. जेव्हा मला कवितेतून व्यक्त होण्यास मर्यादा आल्या, तेव्हा मी इतर ललित वाड्‌मय प्रकारांतही व्यक्त झालो आहे.
 
तुमचे आवडते कवी आणि कविता कोणत्या?
 
आधी सांगितल्याप्रमाणे ज्ञानोबा ते तुकारामांचे भक्ती वाड्‌मय प्रकार मला आवडतात. सत्यशोधक परंपरेचे महात्मा जोतिबा फुलेंपासून विठ्ठल रामजी शिंदे ही जी परंपरा आहे, ती मला जास्त महत्त्वाची वाटते. आधुनिक मराठी कवितेत बहिणाबाई चौधरी असतील, ना. धो. महानोर, भालचंद्र नेमाडे, तुळशी परब, नारायण सुर्वे, नामदेव ढसाळ यांचे लेखन मला विशेष महत्त्वाचे वाटते. नव्या पिढीतील काही मोजकीच नावे आहेत, त्यापैकी प्रविण बांदेकर, वीर धवल परब, सदानंद देशमुख, आसाराम लोमटे, जयंत पवार, सतीश तांबे, रवी कोरडे, ऐश्वर्य पाटेकर, केशव देशमुख, पी. विठ्ठल असे महत्त्वाचे कवी आहेत ज्यांनी चांगले आणि दर्जेदार लेखन केले आहे. इतरही नावं घेता येतील. मीरा राठोड हे चांगले कवी आहेत, त्यांची समज चांगली आहे.
 
विसाव्या आणि एकविसाव्या शतकातील कवितांमधील स्थित्यंतरांविषयी काय सांगाल?
 
कवितांमध्ये स्थित्यंतरे नक्कीच आहेत. साधारणतः नव्वदोत्तर मराठी कविता आहे, ती कालिकदृष्ट्या नव्हे, तर संवदनेच्या पातळीवरही बदललेली दिसत आहे. तिची शैली बदलली आहे, रंग-ढंग बदलला आहे, तिची आशयसूत्रेही बदलेली आहेत. खेडी ही खेडी राहिलेली नाही आणि तशी ती रहावी याचा काही अट्टहास नाही. हे बदल लादलेले असो किंवा नकळत झालेले असो, हे बदल मात्र झालेले आहेत. परंपरांचा गोडवा गाण्यापेक्षा परंपरेत ज्या चांगल्या गोष्टी आहेत, जे शुद्ध मानवतेला जवळ करणारे आहे, असे सगळे आपण स्वीकारले पाहिजे आणि आधुनिकरणात जे मानवतावादाला जवळ करणारे आहे, तेही स्वीकारले पाहिजे. जेव्हा आपण आधुनिकरण आणि जागतिकरणाचा पुरस्कार करतो, तेव्हा या व्यवस्थेत जो सक्षम असेल तोच जगतो... मग जो सक्षम नसेल त्याचे काय? त्याला जगण्याचा अधिकार नाही का? त्याने मरून जावे का? तर अजिबात नाही. लेखक-कवी चांगली व्यवस्था निर्माण करत नाहीत, तर चांगल्या व्यवस्थेसाठी जे पोषक वातावरण आहे, ते वातावरण निर्माण करण्यासाठी मदत करतात. नव्वदीच्या नंतर जे कवी आहेत, त्यांच्या कवितेत हे चित्र दिसतं. हरवलेली मानवी मूल्य, यांत्रिकीकरण, अंगावर येणारी माध्यमे यात कवी अडकत चालला आहे, हेही तितकच खरं आहे. जगण्यातील प्रतिध्वनी या कवितेत उमटत आहे. नवे शब्द वापरले म्हणजे कविता जागतिक होत नाही. संगणक हे तुमच्या कवितेत प्रतीक म्हणून आले पाहिजे. कारण, कविता ही प्रतीकाच्या भाषेत बोलत असते. वस्तुनिष्ठता ही कवितेत नसते. कविता ही काळाबद्दल बोललीच पाहिजे. सृजनशील व्यक्तीत काळाचा अवकाश कवेत घेण्याची क्षमता असली पाहिजे. सृजनशील व्यक्ती म्हणजे कोण? कवी, लेखक, पत्रकार, चित्रकार, पटकथाकार यांच्यात वेगळे जग दाखवण्याची क्षमता त्यांच्यात आहे. सृजनशीलतने जगण्याच्या अवकाशात खोलवर उडी घेतली पाहिजे. नव्वदोत्तर काळात जगण्याचे बदल या कवितेत उमटले आहेत आणि ही चांगली गोष्ट आहे.
 
 

 
भविष्यात तुमचा कुठला कवितासंग्रह वाचकांच्या भेटीला येणार आहे?
 
‘पिढीजात’ ही कादंबरी मी लिहिलेली आहे. फुले आणि आंबेडकरांचा ब्राह्मणांना कधीच विरोध नव्हता. तो ब्राह्मणशाहीला होता. शुद्र जर सत्तेवर आले, तर शोषण व्यवस्था संपुष्टात येईल, असे फुलेंचे म्हणणे होते. स्वातंत्र्यानंतर बहुजनांची सर्व ठिकाणी सत्ता आली. मग ती राजकीय असो वा प्रशासकीय असो. माझ्यासारख्या बहुजन व्यक्तीला असा प्रश्न पडला की, बहुजन समाजाला मी पुरेसा न्याय देऊ शकलो का? तर त्याचे उत्तर ‘नाही’ असे आहे. श्रीकांत देशमुख जर कुणबी समाजातला अधिकारी असेल आणि कुणबी समाजातील अनेक शेतकरी आत्महत्या करत असतील तर मी नेमकं काय करायचं? भिंत सारवल्यानंतरही एक पपडी असते. आम्ही त्या पपडीसारखे आहोत. हा पपोडा त्या भिंतीतून निर्माण झाला आहे. पण, तरीही त्या भिंतीचा तो भाग नाही. अशी त्रिशंकू अवस्था आहे. माझे चांगले घर शहरात आहे, पण माझ्या भावाचे घर आजही त्या खेड्यात वाईट अवस्थेत आहे. तर असे प्रश्न पडलेला नायक या कादंबरीत आहे. या नायकाला प्रशासनात आलेले राजकीय, सामाजिक प्रश्न या कादंबरीत शब्दबद्ध केले आहेत. याशिवाय दोन काव्यसंग्रह आणि एक कादंबरी वाचकांच्या लवकरच भेटीला येणार आहे.
 
 
मुलाखत - तुषार ओव्हाळ