रतनगडाचे 'नेढे '
 महा एमटीबी  27-Jan-2018
 
 
इच्छा तेथे मार्ग असं आपण आजवर अनेकवेळा ऐकलंय. पण प्रत्यक्षात ते करताना आपली चांगलीच कसोटी लागते. सह्याद्रीच्या आजवरच्या भटकंतीत 'इच्छा तेथे मार्ग 'ह्या वाक्याचा फारच उपयोग करावा लागला. मुळातच भटकण्याचा 'किडा' चावल्यामुळे रानावनातून, काट्याकुट्यातून, नदी , ओढे, तुडवण्याची सवयच लागलीये शरीराला. पावलागणिक आपल्यासमोर दत्त म्हणून उभं राहणारं संकट खूप काही देऊन जातं . बऱ्याच जणांना मी वेडा वाटतो. आणि ते साहजिकच आहे म्हणा. इथे शहरात जाडजूड पगार आणि 'comfort zone ' मधलं आयुष्य सोडून कोण कशाला जंगलात आणि दऱ्या डोंगरात भटकेल. मी त्यांच्यासारखा नाही म्हणून मी वेडा. असेनाका वेडा. पण वेडी माणसंच इतिहास घडवतात असं खुद्द इतिहास सांगतो. गडकिल्ले भटकून भटकून मी मात्र ठार वेडा झालोय आणि ह्याचा मला अभिमान वाटतो. पण कणभर सुद्धा गर्व बाळगला नाही. सह्याद्रीने मला लीन व्हायला शिकवलंय. प्रत्येकाचा कोणी विधाता असतो हे त्याने अनेकवेळा सिद्ध केलंय. अजस्त्र, अक्राळ विक्राळ आणि रौद्र सह्याद्री पाहताच अंगावर शहारे येतात. अचानक डोळ्यांना अंधुक दिसायला लागतं. दोन मिनटं समजत नाही काय चाललंय . डोळे चोळायला जातो तोच बोटं ओली झालेली असतात. पापण्या गहिवरून गेलेल्या असतात. आनंदाने मनाचा संपूर्ण ताबा घेतलेला असतो. सह्याद्रीच्या फेसाळणाऱ्या धबधब्याप्रमाणे डोळ्यांना जलवाहिनी फुटलेली असते. हा असतो परमोच्च आनंद. देव कितीजणांनी बघितलाय ठाऊक नाही मला, पण मी खात्रीने सांगू शकतो कि मला देवत्वाची अनुभूती कैकवेळेला सह्याद्रीने करून दिली आहे. आणि म्हणून मी वेडा. होय. शहाणं राहून माणूसपण हरवलेली माणसं बघितलं की माझं वेडेपण मला अधिकच प्रिय वाटू लागतं. असो.
तर मग असाच भटकत भटकत येऊन पोचलो सगळ्यांचा आवडता, सह्याद्रीचे अनमोल रत्न असणारा 'रतनगडावर '. कात्रीने कापल्यासारख्या डोंगरकड्यांनी आणि कात्राबाईच्या खिंडीचा शेजारी असणारा हा बुलंद, बलदंड, अतिशय देखणा, अवशेष संपन्न, अफाट जंगलाने वेढलेला आणि आपल्या खांद्यावर 'नेढे' बाळगणारा 'रतनगड'. आता नेढे म्हणजे काय ? तर उभ्या कातळाला आर पार नैसर्गिक छिद्र पडलेले असते. ह्याला 'नेढे 'म्हणतात. हे इतकं मोठं असतं कि ह्यात १५-२० माणसं अगदी सहज उभे राहू शकतात. निसर्गाची ही अनोखी किमया पाहून आपण थक्क होऊन जातो. इथे बेफाम सुटलेला वारा अनुभवणं फारच चमत्कारिक असतं .

 
 

तुम्ही वरती जे छायाचित्र पाहताय ते ह्याच रतनगडाच्या नेढ्यातील आहे. इथवर पोहोचण्यासाठी मात्र फार कष्ट पडले मला . कारण ह्यावेळेस मी माझ्या गाडीने न जाता 'एस टी 'ने प्रवास केला. दर मजल करत मुरशेत गाव गाठलं आणि इथून खऱ्या त्रासाला सुरुवात झाली. बोटवाल्याने आम्हाला वेगळ्याच ठिकाणी नेऊन सोडलं. अश्या ठिकाणी सोडलं जिथून पायथ्याची 'रतनवाडी ' गाठण्यासाठी आम्हाला तुफान पायपीट आणि २-३ टेकड्या पार कराव्या लागल्या. तब्बल ४ तासांच्या अखंड पायपिटीनंतर आम्ही एकदाचे रतनवाडीत पोचलो. 'अमृतेश्वर' मंदिरासमोर पथारी पसरली आणि दोन तास शवासन केलं. म्हणजेच झोपलो.
आता किल्ला गाठायचा होता. अंगात बळ आणून फोटोग्राफीचा संसार पाठीवर चढवला आणि हर हर महादेव म्हणत ट्रेक सुरु झाला. घनदाट जंगलाने फार दिलासा मिळत होता. पण शरीर फार थकून गेलं होतं. 'गणेश दरवाजा' बघायचाच असा पक्का इरादा करून मी आणि माझा मित्र वैभव गड चढाईस लागलो. दोन तास सगळी क्षमता पणाला लावून आम्ही गणेश दरवाजा गाठला आणि जगण्याचं सोनं झाल्यासारखा अनुभव आला. घामाने ओले चिंब झालेलो आम्ही दोघांनी जमिनीवर लोळण घेतली. समोर कात्राबाईचा कडा , मागे राणीचा हुडा आणि सर्वत्र अफाट सह्याद्रीचे कडे. थोडंफार खाऊन आम्ही सूर्यास्त शूट केला आणि गुहेत येऊन झोपलो. दुसऱ्या दिवशी सकाळी गडफेरी करत 'नेढे ' गाठले. रतनगड फेरी सार्थकी लागली.
भेटू पुढच्या अंकात. भटकत राहा !!!

- अनिकेत कस्तुरे