सुशिक्षित बेरोजगार
 महा एमटीबी  26-Jan-2018
 
 
 
 
 
आपल्याकडे सुशिक्षित अडाणी आणि सुशिक्षित बेरोजगारांचे प्रमाण खूप वाढले आहे. एका विषयात पदवी घ्यायची आणि नोकरी मिळवायची हा साधा सरळ हिशोब एक व्यक्ती करत असतो. पण, हा प्रवास साधासोपा नसतो. पदवी घेतल्यानंतर विशिष्ट कौशल्य नसल्याने व्यक्ती अकुशल कामगार बनते. परिणामी नोकर्‍या मिळत नाही, अशी ओरड केली जाते. कुठलेही काम करायचे म्हटले की त्याला एक विशिष्ट तंत्र, कौशल्य लागते. ते आत्मसात केल्यानंतर त्यातली आव्हाने शोधून या बेरोजगारीवर मात करणे सहज सोपे आहे.
 
 
नुकतंच सांगली बाजार समितीत शिपाई आणि लेखनिक पदासाठी एमबीए आणि अभियंत्यांनी अर्ज केल्याची घटना उघडकीस आली. ही घटना तशी काही नवी नाही. या आधीही या अशा जागांसाठी उच्चविद्याविभूषित लोकांनी अर्ज केले आहेत. यावरून देशात किती बेरोजगारी आहे अशी ओरड करणारे लोक कमी नाहीत. प्रश्न असा आहे की, एमबीए करून एक व्यक्ती व्यवसाय उभारू शकत नाही. त्यामुळे दोष शिक्षणव्यवस्थेत तरी आहे किंवा पदवी ग्रहण करणार्‍या व्यक्तीमध्ये आहे. आपली शिक्षणव्यवस्था ही फक्त कारकून निर्माण करणारी आहे. ही व्यवस्था ब्रिटिशांनी निर्माण केली. अर्थात, ती त्यांनी त्यांच्या फायद्यासाठीच निर्माण केली. ब्रिटिश सोडून गेले, पण ही व्यवस्था फार बदलली नाही. अभ्यासक्रम अधिक व्यवसायाभिमुख होण्यासाठी विशेष अभ्यासक्रमही सुरू झाले. पण, बेरोजगारी वाढतच राहिली. यासाठी केंद्र सरकारने ‘स्किल इंडिया’ सारखी योजनाही राबवली. कोट्यवधींचा निधीही यासाठी दिला. या योजनेला पूरक अशी ‘स्टार्ट अप इंडिया’सारखी योजनाही सरकारने आणली. जेणेकरून नवउद्योजकांना उद्योग उभारण्यास वाव मिळावा. या योजना काही अंशी यशस्वी झाल्याही. पण, बेरोजगारी कमी करण्यासाठी कौशल्ये आणि तंत्र आत्मसात करणे गरजेचे आहे.
 
 
आई-वडिलांनी सांगितले म्हणून, मित्रांनी विशिष्ट अभ्यासक्रमाला प्रवेश घेतला म्हणून नावडते क्षेत्र निवडल्यास असे प्रकार वाढतात. आपली ‘पॅशन’ काय आहे, हे वेळीच ओळखणे गरजेचे आहे. उदरनिर्वाहासाठी सरकारने रोजगार हमी योजनाही राबवल्या. अकुशल कामगारांसाठी ही योजना यशस्वी झाली. पण, कुशलता वाढवणे हे सरकारचे कामआहे, अकुशलता नाही. २१व्या शतकात मूल्याधिष्ठित बाजारातील स्पर्धेत प्रत्येकाला संधी आहे. हे आव्हान नसून संधी आहे, हे समजणे गरजेचे आहे. एकूणच कौशल्ये आत्मसात केल्यास बेरोजगारीसारखे प्रश्न सु्‌टण्यास वेळ लागणार नाही.
 
 
- तुषार ओव्हाळ