जिंदगी लंबी नहीं, बडी होनी चाहिये !
 महा एमटीबी  26-Jan-2018

साल १९९८. स्थळ – वाईमधील नगर वाचन मंदीर, वेळ संध्याकाळी साडेसात – आठची. दोन प्रथितयश डॉक्टर्स वाचनालयाचे कुलूप काढून आत प्रवेश करतात. यांतील एक डॉक्टर वाईमधील निष्णात सर्जन तर दुसरे पाहुणे म्हणून आलेले पुण्यातील पॅथॉलॉजिस्ट. वाचनालयाला कुलूप पाहूनच खरे तर पाहुण्या डॉक्टरांच्या कपाळावर आठ्या पडलेल्या कारण एका महत्वाच्या विषयावरील बैठकीत मार्गदर्शन करण्यासाठी ते इथे आलेले आणि इथे बैठकस्थानाचे कुलूप काढण्यापासून सुरुवात. पण वाईमधील यजमान डॉक्टर मात्र स्थिर. आत प्रवेश करता क्षणी त्यांनी तडक कोपऱ्यातील केरसुणी उचलून हॉल झाडण्यास सुरुवातही केली आणि आता मात्र पाहुण्या डॉक्टरांना एकदम संकोचल्यासारखेही झाले आणि आश्चर्यही वाटले. त्यांनी ’अहो डॉक्टर थांबा’ म्हणेपर्यंत हॉल झाडूनही झाला, त्यावर बिछायत अंथरली गेली आणि आता यजमान डॉक्टरांनी पाहुण्या डॉक्टरांना सांगितले, ’तुम्ही काही वेळ इथेच थांबा, मी आलोच एक चक्कर मारुन’, आणि काही वेळातच डॉक्टर जेव्हा माघारी परतले तेव्हा त्यांच्यामागे होत्या वाई शहरातील किमान पन्नास प्रतिष्ठित व्यक्ती ! आता मात्र पाहुणे डॉक्टर आश्चर्यचकित होऊन जातात. आश्चर्य, कौतुक कशाकशाचे करावे ? कोणीही हेवा करावा अशी शैक्षणिक आणि व्यावसायिक कारकीर्द असतानाही प्रसंगी हातात झाडू घेऊन बैठकीचा हॉल स्वच्छ करण्याच्या सहजसुंदर मानसिकतेचे, लोकहिताकरिता एखादा ध्यास घेऊन त्याच्या परिपूर्तीसाठी करीत असलेल्या कठोर परिश्रमांचे की अद्भूत संघटन कौशल्याचे !
या दोन डॉक्टर्सपैकी पाहुणे पॅथॉलॉजिस्ट डॉक्टर म्हणजे रक्तपेढीविज्ञानाचे पुण्यातील तज्ज्ञ आदरणीय डॉ. दिलीप वाणी आणि वाईतील यजमान डॉक्टर म्हणजे ज्यांच्या अकाली निधनानंतर १५ वर्षांनंतरदेखील वाई व परिसरातील ग्रामस्थांना ज्यांचा एका दिवसासाठीही विसर पडला नाही असे सुविख्यात शल्यचिकित्सक कै. डॉ. विद्यासागर तथा मिलिंद सायगांवकर !! वाई शहरात रक्तपेढीच्या उभारणीकरिता अक्षरश: जीवाचे रान करणाऱ्या डॉ. सायगांवकरांनी जेव्हा या कामासाठी प्रारंभीची बैठक वाईमध्ये बोलावली होती, त्यावेळचा हा प्रसंग.
डॉ. विद्यासागर सायगांवकरांचा जन्म सातारा शहरात ८ मे १९६३ रोजी झाला. आई आणि वडील दोघेही अध्यापक. बालपणापासूनच अत्यंत तल्लख असलेल्या डॉ. विद्यासागर यांची शैक्षणिक कारकीर्द अगदी चौथीच्या स्कॉलरशिपपासून ते एम.एस. होईपर्यंत अव्वल राहिली. डॉ. सायगांवकरांनी दहावीपर्यंत द्रविड हायस्कुल, वाई, त्यानंतर बारावीपर्यंत गरवारे महाविद्यालय, पुणे आणि वैद्यकीय शिक्षण बी.जे. वैद्यकीय महाविद्यालयातून पूर्ण केले. न्युरॉलॉजीमध्ये एम.एस. झालेले डॉ. विद्यासागर हे महाविद्यालयातही कायमच प्राध्यापकप्रिय विद्यार्थी होते. सन १९८९ मध्ये पदव्यूत्तर वैद्यकीय शिक्षण पूर्ण झाल्यानंतर डॉ. विद्यासागर यांनी वाईमध्ये वैद्यकीय व्यवसायास प्रारंभ केला आणि सन २००१ मध्ये वयाच्या अवघ्या अडतीसाव्या वर्षी त्यांचे अकाली देहावसान झाले. व्यावसायिक डॉक्टर म्हणून जेमतेम १२ वर्षांची कारकीर्द. बस्स !! पण आजही जेव्हा जेव्हा डॉ. विद्यासागर यांचे नाव वाई व भोवतालच्या परिसरात घेतले जाते, तेव्हा लोक भावूक होतात, त्यांच्या अकाली जाण्याच्या वेदनेने हळहळतात आणि त्यांच्या आठवणींनी व्याकूळ होतात. विशेष म्हणजे या लोकांमध्ये सर्व प्रकारच्या लोकांचा समावेश आहे. अगदी सामान्य फ़ेरीवाले, शेतमजूरांपासून ते आजच्या वाईमधील प्रथितयश डॉक्टर – वकीलांपर्यंत सर्वजण डॉक्टरांच्या आठवणीने सद्गदित होतात, हे वास्तव आहे. याचा अर्थ उघड आहे की, डॉ. विद्यासागर यांचा केवळ एक डॉक्टर इतकाच परिचय पुरेसा नाही. एक संवेदनशील सामाजिक कार्यकर्ता त्यांच्या रक्तातच होता आणि हा कार्यकर्ता घडला होता ते घरांतील संस्कारांबरोबरच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शाखेतून.
बालपणापासूनच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक असलेल्या डॉ. विद्यासागर यांनी या स्वयंसेवकत्वाचा कायमच अभिमान बाळगला. किंबहुना आधी संघकार्यकर्ता आणि नंतर डॉक्टर असाच त्यांचा नित्य व्यवहार राहिला. वाई तालुक्याचे संघचालक असे त्यांच्याकडे दायित्व होते आणि या दायित्वाला शंभर टक्के न्याय देण्याचा त्यांनी कसोशीने प्रयत्न केला. त्यांच्याबरोबर काम केलेल्या अनेकांची त्यांच्याबद्दलची प्रेमळ तक्रार हीच राहिली आहे की, त्यांनी वैद्यकी व्यवसाय म्हणून कधीच केली नाही. त्यांच्या वैद्यकीय कारकीर्दीमध्ये सेवाभाव हाच प्रधान राहिला. संघाच्या शाखेतून सहजपणे झालेला हा सेवेचा संस्कार त्यांनी अखेरपर्यंत सांभाळला, प्रसंगी स्वत:च्या स्वास्थ्याकडे अतिदुर्लक्ष करुनही. कदाचित कामावरील अशी अकृत्रिम निष्ठा आणि परिश्रमांची पराकाष्ठा हेच त्यांच्या लोकप्रियतेचे गमक असावे.
सामान्यत: रुग्णालयात रुग्ण दाखल होतो. त्याच्यावर उपचार केले जातात. आवश्यकता असेल तर शस्त्रक्रिया केली जाते. काही दिवस निरीक्षणासाठी रुग्णालयात राहून शेवटी बिल वगैरे देऊन रुग्ण बाहेर पडतो. सर्वसाधारणपणे रुग्णालयांमध्ये असेच घडते. पण उपचारांचा खर्च, शस्त्रक्रियेचा खर्च असे कुठलेही खर्च रुग्णाकडून न घेता उलट डॉक्टरच रुग्णाला औषधपाण्यासाठी आणि आपल्या गावी परतण्यासाठी गाडीखर्च म्हणून पैसे देऊन त्याची पाठवणी करतात, असे कधी घडते का हो ? पण वाईमध्ये अशा शेकडो घटना लोकांनी अनुभवल्या आहेत त्या डॉ. सायगांवकरांच्या बाबतीत. एखादा गरजू रुग्ण डॉ. सायगांवकरांच्या रुग्णालयात आला आणि ’तो खूप अवेळी आला’, ’त्याच्याकडे उपचारांसाठी पुरेसे पैसे नाहीत’, किंवा ’तो अत्यंत गंभीर स्थितीत आहे म्हणून अन्यत्र हलवला तर बरे’ अशा कुठल्याही सबबींमुळे उपचाराविना परत गेला असे डॉ. विद्यासागर यांच्या बाबतीत कधीही घडलेले नाही, याचा दाखला आजही वाईमध्ये अनेकजण देऊ शकतील. प्रसंगी रुग्णालयातील खाटांमध्ये भर घालून रुग्णावर त्वरेने उपचार होतील याकडे डॉक्टरांनी नेहमीच लक्ष दिले. कामाच्या अतिव्यापामुळे काही शस्त्रक्रिया आपल्या डॉक्टर मित्रांना करायला सांगाव्यात, या मित्रांनी शस्त्रक्रिया अतिमहत्वाच्या नसल्याने जेवणानंतर बघू म्हणून काही वेळ घ्यावा आणि प्रत्यक्ष शस्त्रक्रिया करायला रुग्णालयात पोहोचल्यानंतर पाहतात तर स्वत:चे जेवणखाण बाजुला ठेवून या शस्त्रक्रिया स्वत: डॉ. विद्यासागर यांनीच हसत हसत करुन टाकलेल्या असाव्यात असेही प्रसंग त्यांच्या डॉक्टर मित्रांनी अनुभवले आहेत. रुग्णालयात येणारी कुठलीही केस डॉ. विद्यासागर यांनी नाकारली नाही. अनेक अवघडातील अवघड शस्त्रक्रिया आपले वैद्यकीय कौशल्य पणाला लावून डॉक्टरांनी यशस्वीपणे पार पाडल्या. डॉ. सायगांवकर नक्की विश्रांती कधी घेतात हा त्यावेळी अनेक वाईकरांना पडलेला मोठा प्रश्न होता. कारण भल्या सकाळी सुरु झालेले रुग्ण तपासण्याचे काम रात्री ११/१२ पर्यंतही चाले. त्यानंतर संघाच्या बैठका. आवश्यकता पडल्यास त्यानंतर स्कुटरला किक मारुन आजुबाजुच्या खेड्यांमध्ये संपर्क, एक तर संघाच्या कार्यकर्त्यांना भेटायला किंवा एखाद्या गरजू रुग्णाला तपासायला. ही सर्व कामे उरकून शक्य झाल्यास एखाद्या गावातील प्रभात शाखा वगैरे करुन पुन्हा हसत हसत कामावर हजर, अशी डॉक्टरांची दैनंदिनीच होऊन गेली होती. रात्री वाईमध्ये असले तरी रुग्णालय आणि संघकाम इ. उरकून जेवायला रात्रीचे १२ वाजत आणि यानंतरही तातडीचे बोलावणे अगदी कोठूनही आले तरी सेवेसाठी डॉक्टर नेहमीच तयार. अगदी शेवटच्या दिवसांतही हे परिश्रम जराही कमी झाले नाहीत.
संकट कितीही मोठे असो, त्या संकटास जाऊन भिडण्याची आणि लढून यश मिळविण्याची धमक हा डॉ. विद्यासागर यांचा स्वभाव होता. कृष्णा नदीच्या पुरात पुलावरुन उडी टाकून उलट्या दिशेने घाटापर्यंत पोहत जाणे हा आवडता खेळ असलेल्या डॉक्टरांच्या बाबतीत हे अगदी स्वाभाविकही होते. एकदा अपरात्री स्कुटरवरुन जवळच्या गावात एका अत्यवस्थ रुग्णाला तपासण्यासाठी जात असताना स्कुटर अचानक नादुरुस्त झाली. इतक्या रात्री कुठलीही वाहने थांबायला तयार होईनात. शेवटी डॉक्टरांनी आपली नादुरुस्त स्कुटर रस्त्याच्या मधोमध आणून लावली आणि मग मात्र एका टेंपोला थांबावेच लागले. अर्थातच या प्रसंगावधानामुळे डॉक्टर योग्य वेळेत रुग्णापर्यंत पोहोचू शकले. याच मनस्वी स्वभावामुळे वाईमध्ये रक्तपेढी उभारावी हे जेव्हा त्यांनी ठरवले त्यानंतर हे स्वप्न प्रत्यक्षात येण्यासाठी डॉक्टरांनी अक्षरश: रक्ताचे पाणी केले. वास्तविक वाईचा विस्तार आणि गरज लक्षात घेता आणि मुख्य म्हणजे रक्तपेढी उभी करण्यासाठी लागणाऱ्या प्रचंड भांडवलाचा विचार करता ही गोष्ट प्रत्यक्ष रक्तपेढीविज्ञानाशी संबंधित तज्ज्ञ मंडळींनाही अनावश्यक आणि अशक्यप्रायही वाटत होती. पण स्वत: डॉ. सायगांवकरांचा याबद्दलचा आग्रह ठाम राहिला. हा आग्रह तीव्र संवेदनेपोटीच होता. कारण वेळेवर रक्त उपलब्ध न झाल्याने दोन रुग्णांचे झालेले मृत्यू त्यांनी पाहिले होते. म्हणूनच प्रस्तावित रक्तपेढीमुळे इथला एक जरी रुग्ण वाचला तरी रक्तपेढी उभी करण्याचे सार्थक झाले असे मी मानेन असे त्यांचे म्हणणे असे. दुसरा प्रश्न भांडवलाचा. चांगल्या कामासाठी लोकांकडे हात पसरायला लाजायचे कशाला, या त्यांच्या संघीय बाण्याने हा दुसराही प्रश्न सोडविला. केवळ सहा/सात महिन्याच्या कालावधीत डॉ. विद्यासागर यांनी आपल्या संघातील तसेच डॉक्टर सहकाऱ्यांच्या मदतीने सुमारे ४० लाख रुपये जमा केले. हे करत असताना किती लोकांचे उंबरठे कितीदा झिजवावे लागले याची गणती नाही. बरे हे सगळे चालु असताना नित्याची वैद्यकीय सेवा, संघकाम, तातडीची सेवा यात खंड नाही. अर्थात केवळ पैसे जमा झाल्याने रक्तपेढी उभारली जाते असे नाही. त्यासाठी सुयोग्य जागा, प्रशिक्षित मनुष्यबळ, उपकरणे, लायसेन्स मिळविण्याकरिता करावे लागणारे सोपस्कार अशा कितीतरी गोष्टींकडे लक्ष द्यावे लागत होते. परंतू डॉक्टरांच्या निग्रही स्वभावामुळे एक एक अडचणी सुटत गेल्या आणि हळूहळू रक्तपेढीचे स्वप्न दृष्टीपथात येऊ लागले. परंतू याच सुमारास डॉक्टरांच्या छातीत वेदना सुरु झाल्या आणि तपासणीअंती हृदयरोगाचे निदान झाले. पुण्याला बायपासची शस्त्रक्रिया होऊनही आवश्यक ती विश्रांती न घेतल्याने pericardial effusion (हृदयाच्या आवरणाला सूज) हा विकार उद्भवला आणि मग मात्र परिस्थिती बिघडतच गेली. तीन वर्षे अथकपणे रक्तपेढी उभी करण्यासाठी झटलेल्या डॉक्टरांच्या समोर दि. २ ऑक्टोबर २००१ रोजी रक्तपेढीचे उद्घाटन झाले पण दुर्दैवाने अवघ्या आठवडाभरातच म्हणजे दि. ९ ऑक्टोबर २००१ रोजी वयाच्या केवळ अडतीसाव्या वर्षी डॉ. विद्यासागर सायगांवकरांनी जगाचा निरोप घेतला. वाईचे जगप्रसिद्ध विचारवंत तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांच्यानंतर वाई शहराने पाहिलेली दुसरी भव्य महायात्रा होती डॉ. विद्यासागर सायगांवकर यांची. याप्रसंगी संपूर्ण वाई शहर डॉक्टरांना अंतिम निरोप देण्याकरिता लोटले होते.
एखाद्या व्यक्तीला जे काम करण्यास किमान ५० वर्षे लागतील ते काम डॉ. विद्यासागर यांनी केवळ १२ वर्षांतच केले, इतका त्यांचा कामाचा वेग प्रचंड होता, असे त्यांच्याबरोबर काम केलेले संघाचे कार्यकर्ते तसेच त्यांचे डॉक्टर मित्रही सांगतात. अगदी शेवटी हृदयरोगाच्या निदानानंतरही डॉक्टर पुण्याहून वाईला परतले, त्याच रात्री एका रुग्णाला रक्तस्त्राव होतो आहे, हे समजताच निदानाविषयी घरी ’विशेष काही नाहीय’ इतकेच सांगून डॉक्टर त्या रुग्णासाठी स्कुटर काढून बाहेर पडलेसुद्धा. असा धगधगता कर्मयोग डॉ. विद्यासागर प्रत्यक्ष जगत होते. आज जर ते असते तर वाईमध्ये एखादा प्रचंड मोठा वैद्यकीय प्रकल्प उभा राहिलेला पहायला मिळाला असता असेही अनेक डॉक्टरांच्या बोलण्यात आज येते. शिक्षणामुळे त्यांची डॉक्टर ही ओळख बनली असली तरी बऱ्याच अन्य विषयांतही डॉ. विद्यासागर यांना उत्तम गती होती. शेती हादेखील त्यांच्या अभ्यासाचा विषय होता. त्यांनी स्वत:ची शेती घेऊन त्यात वेगवेगळे प्रयोगही केले होते. शेती विषयाचे अभ्यासक म्हणून त्यांच्या दूरदर्शनवर मुलाखतीही झाल्या आहेत, ही गोष्ट बऱ्याच कमी लोकांना ठाऊक आहे. पशुपालन हाही त्यांच्या जिव्हाळ्याचा विषय होता. गायी, म्हशी, घोडा, ससे, कुत्रे असे पशु पाळून त्यांची उत्तम प्रकारे देखभालही डॉक्टरांनी केली होती. महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना आवड म्हणून डॉक्टर पौरोहित्यही शिकले होते आणि गणेशोत्सवात गणपती बसवायला जाण्याच्या निमित्ताने अनेक ठिकाणी त्याचे प्रात्यक्षिकही त्यांनी केले होते.
आयुष्याच्या शेवटच्या टप्प्यात रक्तपेढी उभारण्यासाठी त्यांनी घेतलेले कष्ट हा तर एक स्वतंत्र अध्यायच आहे. डॉक्टर गेल्यानंतरही सुमारे १० वर्षे तेथील डॉ. फ़णसळकर, श्री भाऊ मेहता, डॉ. श्री. व सौ. पतंगे, डॉ. श्री. व सौ. घोटवडेकर अशा कार्यकर्त्यांनी/डॉक्टरांनी श्रद्धापूर्वक, प्रसंगी पदरमोड करुनही रक्तपेढीचे काम सुरुच ठेवले. त्यानंतर काही अपरिहार्य कारणास्तव रक्तपेढीऐवजी ’रक्तसाठवणूक केंद्र’ (Blood Storage Centre) असा बदल झाला असला तरीही वाई आणि परिसरातील गरजू रुग्णांना वेळेवर सुरक्षित रक्तघटक मिळावेत हे डॉ. विद्यासागर यांचे स्वप्न मात्र निश्चितपणे साकार झाले आहे.
स्वत:चा देहभाव, अहंभाव विसरुन केवळ ’उरलो उपकारापुरता’ या वृत्तीने डॉक्टर आयुष्यभर जगले आणि वागायला, बोलायला अगदी सर्वसामान्य वाटत असले तरी आपल्या असामान्य कर्तृत्वाने डॉ.विद्यासागर सायगांवकर पुढच्या अनेक पिढ्यांना प्रेरणा देत आकाशाएवढे मोठे झाले.
शेवटी – हा लेख लिहिण्यासाठी पुणे व वाई येथील डॉ. सायगांवकरांबरोबर प्रत्यक्ष काम केलेल्या अनेक लोकांच्या ठरवून भेटी घेतल्या. यात डॉ. सायगांवकरांच्या पत्नी डॉ. माधुरी सायगांवकर यांचाही समावेश होता. डॉ. माधुरी यांना जेव्हा ’आम्हाला डॉक्टरांबद्दल काही सांगा’ अशी विनंती आम्ही केली तेव्हा त्यांनीअत्यंत भावनिक होत आणि विनम्रतापूर्वक, ’डॉ. विद्यासागर आमच्या वाट्याला कधीच आले नाहीत, त्यामुळे त्यांच्याविषयी मला विशेष काहीच सांगता येणार नाही हो !’ इतकेच सांगितले.
उभे आयुष्य लोकांसाठीच जगलेल्या डॉ. विद्यासागर यांच्या कामाचे याहून मोठे मूल्यांकन काय होऊ शकते ?
- महेंद्र वाघ