एड्‌सग्रस्तांच्या जीवनात रोवले आनंदाचे रोपटे
 महा एमटीबी  26-Jan-2018
 
 
 
एड्स... या आजाराविषयीची धास्ती, एड्सग्रस्तांकडे बघण्याचा दृष्टिकोन थोड्याफार प्रमाणात बदलला असला तरी तो पूर्णपणे नष्ट झाला, असं अजूनही ठामपणे म्हणता येणार नाही. जनजागृतीमुळे तसेच सरकारी तसेच खासगी रुग्णालयांमध्ये आज एड्‌सग्रस्तांवर उपचार करण्याच्या सोयींमुळे त्यांचे मनोबल वाढविण्यासाठी प्रयत्न केले जात असले तरी त्यातील एड्‌स झालेले रुग्ण खचून जातात. त्यांच्या आयुष्यातील अनेक समीकरणे बिघडतात. अशावेळेस जोडीदारासोबत, कुटुंबातील इतर सदस्यांचा आधार हा खूप महत्त्वाचा ठरत असतो. पण, वयात आलेल्या, लग्नाच्या उंबरठ्यावर असलेल्या एड्‌सग्रस्त रुग्णांना जोडीदार म्हणून स्वीकारण्याचे धाडस कोणी करायला मागत नाही. त्यात त्यांना होणा-या शारीरिक आणि मानसिक त्रासाबद्दल मनमोकळेपणाने बोलण्यास अडचण निर्माण होते. अशा एड्‌सग्रस्त रुग्णांच्या आयुष्याला कलाटणी देण्यासाठी अनिल वळीव यांनी पुढाकार घेत आज तमाम एड्‌सग्रस्तांच्या आयुष्यात आशेचा किरण निर्माण केला आहे.
 
’पॉझिटिव्ह साथी’ नावाची वेबसाईट तयार करून अनिल यांनी आतापर्यंत १,५०० एड्‌सग्रस्तांचे विवाह जुळवून दिले आहेत. अनिल वळीव हे महाराष्ट्राच्या आरटीओ विभागात सहायक आरटीओच्या पदावर पुणे येथे कार्यरत आहेत. एड्‌सग्रस्तांसाठी काम सुरू करण्याच्या आधी तसेच त्यांनी आधी अमरावती, लातूर, सोलापूर येथे काम सांभाळले आहे. जेव्हा ते अमरावतीला होते तेव्हा ट्रकचालकांसाठी रस्ता सुरक्षेसंदर्भात अनेक कार्यक्रम त्यांनी घेतले. ट्रकचालकांना दर तीन वर्षांनी आपले परवान्याचे नूतनीकरण करण्यासाठी एका कार्यशाळेमध्ये यावे लागत असे, जिथे रस्ता सुरक्षेविषयी ते मार्गदर्शन करत. एड्‌सग्रस्त रुग्णांच्या जीवनामध्ये एक पोकळी निर्माण झालेली असते. ते एकटे पडलेले असतात. अशावेळेस त्यांनी मनमोकळपणाने व्यक्त होणे खूप गरजेचे असते. औषधोपचारासोबतच त्यांचे मानसिक स्वास्थ्य चांगलं असणे गरजेचे आहे. हीच बाब ओळखून एड्‌सग्रस्तांना मदत करण्याचा निर्णय घेतल्याचे अनिल वळीव सांगतात.
 
अनिल यांनी एड्‌सबाधितांना मदत करण्याचा निर्णय घेतल्यानंतर त्याच्या कुटुंबाने, तसेच मित्र-परिवाराने पाठिंबा दिला तसेच त्यांच्यासाठी काय करता येईल, याविषयी चर्चा करून त्यांना अनेक सल्ले दिले. अनिल यांच्या मित्र-परिवारातील एका मित्राला एड्‌सची लागण झाली आणि त्याचे संपूर्ण आयुष्य विस्कटून गेले. अनिल यांच्या डोळ्यादेखत हे सगळं घडल्याने त्यांना एड्‌सग्रस्तांना सोसाव्या लागणा-या यातनांची जाणीव झाली. तिथूनच त्यांनी एड्‌सग्रस्तांना मदतीचा हात देण्याचा, त्यांचं आयुष्य बदलण्याचा दृढनिश्चय केला. अनिल यांनी २००७ मध्ये ’पॉझिटिव्ह साथी’ या नावाने एक वेबसाईट सुरू केली. या वेबसाईटच्या माध्यमातून कोणीही एड्‌स पीडित महिला अथवा पुरुष स्वतःसाठी योग्य जोडीदाराची निवड करू शकतो. तो इथे आपल्याबद्दल माहिती देऊ शकतो आणि समोरच्याला जर त्यांनी दिलेली माहिती पसंत पडली असेल, तर तो त्यांना संपर्कही करू शकतो. या संकेतस्थळावर कोणीही आपली माहिती मोफत देऊ शकतो आणि लग्नानंतर ती माहिती काढून टाकू शकतो.
 
या कामाची सुरुवात करताना अनिल या कामाला घेऊन थोडे साशंक होते की, एड्सबाधित लोक हे पसंत करतील की नाही, अशी चिंता त्यांना सतावत होती. मात्र, काही काळ गेल्यानंतर अनिल यांच्या कामाबद्दल रुग्णांना विश्वास वाटू लागला आणि त्यांना त्यांचा जोडीदार गवसला. आता राज्यांतून अनेक रुग्ण या संकेतस्थळाच्या माध्यमातून अनिल यांना संपर्क साधतच आहेत. पण, त्याचबरोबर बंगळुरू, हैद्राबादमधूनही प्रतिसाद मिळू लागला आहे. तसेच राज्यातील काही शहरांमध्ये वधू-वरसूचक मेळावा देखील ते घेत आहेत. भविष्यात अनिल यांना एड्‌सग्रस्त जोडीदारांच्या मुलांसाठी काम करण्याचे वेध लागले असून त्यांनी त्यादृष्टीने प्रयत्न सुरू केले आहेत.
 
 


- सोनाली रासकर