प्रवाळांची दुनिया
 महा एमटीबी  25-Jan-2018

 
 

समुद्रातील प्रवाळांना Coral Reef, तर खडकांना वर्षारण्ये अर्थात rain-forests असे म्हटले जाते. ही हवेतील तापमानावर नियंत्रण ठेवण्याचे काम करतात. याशिवाय ही वर्षारण्ये वातावरणातील पर्यावरण जपणार्‍या नैसर्गिक यंत्रणेचा एक भाग म्हणून अत्यंत महत्त्वाची समजल्या जातात. या रचनेमध्ये जैविक समुदायांची नानाविध रूपांची प्रवाळे अस्तित्वात असतात.
 
प्रवाळांचे राहणीमान -
ही प्रवाळे म्हणजे निडारिअन (cnidarians ) जैविक समुदायातील छोटे प्राणीच असतात. या समुदायात प्रामुख्याने हायड्रा, जेलीफिश व समुद्री रंगीत फुले अशा प्रजातीचे स्थिर स्वरूपाचे प्राणी आढळतात. त्या प्राण्यांचे अन्न म्हणजे छोटे मासे व तरंगणारे सूक्ष्मप्राणी. ते त्यांच्या लांब सोंडेने पकडून भक्षण करतात. ही छोटे प्राणी (polyps ) बाळगलेली प्रवाळे कळपांनी राहतात. त्यांच्या शरीरातून दाट असा कॅल्शियमकार्बोनेटचा थर सतत वाहत असतो. तो त्यांच्या कळपांना चिकटून राहण्यास मदत करतो व संरक्षण देतो. या प्रवाळांच्या विविध जाती असल्याने त्यांचे ०.३ ते १० सेंटीमीटर पर्यंतच्या फरकाने आकारमान असतात.
 
या खडकात जगणार्‍या प्रवाळी प्राण्यांना त्यांच्या पोटात वनस्पतीसारख्या जगणार्‍या अल्गीशी मित्रत्वाचे नाते ठेवावे लागते. कारण, प्रवाळांना प्रकाश-संश्लेषण-प्रक्रियेमधून (photo-synthesis) खाद्य पुरवायला अल्गी मदत करतात. प्रवाळे अल्गींना घरासारखे उत्तमसंरक्षण देतात व त्यांना प्रकाश मिळविण्याची सोय करतात. पर्यावरणीय बदलाने या प्रवाळांचे विविध रंग नष्ट होऊन ते धवल बनतात. अतिनील किरणांच्या उत्सर्जनामुळे, माती साठवणीतून, प्रदूषकांमुळे, तापमानाच्या वाढीमुळे, वा समुद्रातील खारट द्रव्यांच्या फरकामुळे प्रवाळे संकटात सापडतात वा त्यांना रोग होतात.
 
ही प्रवाळे प्रकाश मिळण्यासाठी जास्त खोल पाण्यात न राहता उथळ पाण्यात असतात. उष्ण कटिबंध वा समशीतोष्ण कटिबंधात म्हणजे अक्षांश ३० अंश उत्तरेकडे वा दक्षिणेकडे एवढ्या भागातच दिसतात. ही प्रवाळे ३ प्रकारची आढळतात. फ्रिन्जिंंग प्रवाळी खडक प्रकार हा जास्त प्रमाणात किनार्‍यालगत आहे. बॅरिअर प्रवाळी खडक हे ओट्यासारखे लांबलचक मुख्य जमिनीपासून दूर ऑस्ट्रेलियाच्या जवळ दिसतात. तिसरा प्रकार ज्वालामुखीतून बनलेले व पाण्याखाली गेलेले प्रवाळी खडक जे गोलाकार वा अंडाकृती आकाराचे दक्षिण प्रशांत सागरात शेकडो ठिकाणी आढळतात.
 
प्रवाळी खडक पर्यावरण बदलाचे चांगले निदर्शक आहेत. हे प्रवाळी खडक व त्यांच्याबरोबर वाढलेले समुद्री गवत, खारफुटी वने आणि मडफ्लॅट हे अतिशय संवेदनशील असतात. या नैसर्गिक रचनांमुळे पाण्याचा दर्जा, पर्यावरणीय एकात्मता राखली जाते. ही रचना कायमतपासली गेली पाहिजे, जेणेकरून पर्यावरणीय बाधा, पाण्याचा दर्जा, किनार्‍याची झीज वगैरे गोष्टी चांगल्या प्रकारे समजू शकतील. या प्रवाळांवर दोन प्रकारची नैसर्गिक व मानवनिर्मित संकटे येऊ शकतात.
 
समुद्रात गेल्या ४ दशकात प्लॅस्टिक घनकचरा जमा झाला आहे. त्यातून प्रदूषण वाढून समुद्रातील अनेक जातीचे पक्षी, कासवे, मासे व समुद्रातील सस्तन प्राणी यांच्याकरिता फार मोठा धोका निर्माण झाला आहे. कारण प्लास्टिक द्रव्य हे अपचनकारी आहे व ते प्राण्यांच्या पोटात अडथळा आणतात. नवीन अभ्यासातून असे आढळले आहे की, ही प्रवाळे हा प्लास्टिकचा घनकचरा चवीने खाऊ शकतात, पण याला अजून सबळ पुरावा मिळालेला नाही.
 
प्रवाळी खडक विविध प्रकारच्या वनस्पतींना व प्राण्यांना आसरा देतात. हे प्राणी व वनस्पती खाद्य व राहायला घर म्हणून येथे वास्तव्याला असतात. त्यात अल्गी, स्पन्ज, मोल्युसेस (सी स्लग, ऑयस्टर, क्रॅब, श्रिम्प, समुद्री किडे, स्टार फिश व सागर अर्चिन्स, फंगी, टर्टल व मासे) इत्यादी प्राण्यांना आसरा मिळतो.
 
 
प्रवाळांची मुख्य ठिकाणे -
१. हिंदी महासागर व प्रशांत महासागरात भारताच्या पश्चिमकिनार्‍यावर, भारत व श्रीलंकेच्या मध्ये (रामसेतूजवळ) तांबडा समुद्र सोडून इतर भागात) व पश्चिमी प्रशांत महासागरातील उष्ण कटिबंधात आफ्रिका खंडाच्या पूर्व किनारी भागात आढळतात.
२. उष्णकटिबंधातील पश्चिमी अटलांटिक महासागरात फ्लोरिडा, बहामास, ऑस्ट्रेलियन समुद्रकिनारी आणि दक्षिण अमेरिकेच्या ईशान्येकडच्या भागात.
३. तांबड्या समुद्राजवळ
 
 
ग्रेट बॅरिअर खडकाची वैशिष्ट्ये -
ग्रेट बॅरिअर प्रवाळी खडक ही जगातील सर्वात मोठी प्रवाळी खडकांची रचना आहे. ही रचना ९०० बेटांवरची, विविध २९०० खडक असलेली व सुमारे २६०० किमी पर्यंत पसरलेली आहे. यांचा आकार इटली, जर्मनी, मलेशिया वा जपान देशाएवढा आहे. विमानातून वा अंतरिक्षातून हा भाग चांगला दिसू शकतो. या प्रवाळ बेटांचे क्षेत्रफळ ३,४४,४०० चौ.किमी. आहे. ही रचना तीन लाख वर्षांहून जुनी आहे. याचा त्रिमिती नकाशा तयार केला आहे.
 
या खडकांमध्ये ३० प्रकारचे देवमासे (whale), डॉल्फिन मासे, घड्याळ मासे (porpoises), ३०० पक्षी जाती, १५०० हून अधिक जातीचे मासे आणि शार्क व रे च्या १३० जाती आढळतात. या व इतर प्रवाळी खडकांमध्ये अल्गीची वाढ होते. प्रवाळातील नायट्रोेजन व फॉस्फरस अपचित द्रव्ये सूर्यप्रकाशात ऊर्जा निर्माण करतात. धवल रंगाच्या प्रवाळांना अल्गीमधून रंगांच्या छटा मिळतात. परंतु, पर्यावरणीय ताण, तापमानातील बदल यामुळे अर्ध्या प्रवाळामध्ये अपाय घडून ते मृतावस्थेला पोहोचले आहेत. निरुपयोगी झाडाझुडपांप्रमाणे असलेली अल्गी मृतप्राय झाली आहेत. यावर उपचार म्हणून व्हिनेगार वापरले जाते. पर्यावरणीय तज्ज्ञ फॉसिल इंधन वापरणार्‍यांना दोष देत आहेत, कारण फॉसिल इंधन वापरातून तापमानात बदल घडले व प्रवाळ जाती नष्ट व्हावयाला लागल्या. तापमान नेहमीच्या स्थितीला आल्यावर प्रवाळ परत आधीच्या स्थितीला येऊ शकते. पण, त्याला १० ते १५ वर्षांचा काळ जावा लागतो. या ऑस्ट्रेलियन किनार्‍यावरील ग्रेट बॅरिअर प्रवाळी खडक रचना, जागतिक संघटनेने वारसा यादीमध्ये आणली आहे. ऑस्ट्रेलियन सरकारने या प्रवाळ खडक रचनेची किंमत युएस डॉलर ४२ अब्ज एवढी केली आहे. ही रचना पर्यावरणाचे उत्कृष्ट उदाहरण मानले आहे.
 
 
अंदमान, निकोबार व लक्षद्वीप बेटावरील प्रवाळ संकटात -
भारतीय केंद्रीय प्रदेशाखाली सर्वात लहान प्रदेश बेटे वातावरण बदलामुळे व ‘अल निनो’ वादळामुळे तेथील प्रवाळे ब्लिच होऊन धवल बनली आहेत. त्यामुळे जैवशास्त्रतज्ज्ञांनी याबद्दल संकटाची चाहूल व्यक्त केली आहे. सर्वेेक्षणांती २ अंश तापमान वाढलेले आढळले. काही प्रवाळे बिघडलेली आढळली.
 
 
‘गल्फ ऑफ मन्नार’ व ‘गल्फ ऑफ कच्छ’ वरील प्रवाळे -
गुजरातमधील ‘गल्फ ऑफ कच्छ’वरील प्रवाळे गुजरातच्या किनार्‍यावरून नाहिशी झाली. ती परत आणण्यात आली. जीवशास्त्र संस्थेकडून (ZSI ) ‘गल्फ ऑफ मन्नार’मधून काही प्रवाळे ‘गल्फ ऑफ कच्छ’पर्यंत नेऊन कच्छमध्ये ती परत लावली गेली. ती उत्तमप्रकारे रुजली.
 
ही प्रवाळे जी भरपूर उपयोगाची व रंगीत फ्लोरा व फौना बिघडली तर परत पूर्वपदावर येऊ शकतात. त्यांना प्रवाळ रचना सुस्थितीत ठेवण्याकरिता जागतिक बँकेकडून निधी पुरविला जातो.
 
झेडएसआयचे वेंकटरमन म्हणतात की, ’’कच्छमधील पिरोतन, नरारे, पोशित्रा आणि मिठापूर बेटांवरील प्रवाळे पूर्वस्थितीत आणण्याकरिता ३ वेळेला मन्नारहून कच्छला आणली गेली. ती तशी आणणे चार-पाच पायर्‍यांमध्ये केले जाते. मन्नारहून आणणे, लागवड करणे, तपासणे व नवीन प्रवाळांचे संरक्षण करणे.
 
ते स्वच्छता करतात, हे तपासणे झेडएसआयचे संशोधक आठवड्याला दोन वेळेला फेर्‍या मारतात. ते माती व वाळू काढून स्वच्छता करतात, प्रवाळावरील किडे व वीड्‌ससुद्धा काढून टाकतात.
 
 
नवीन प्रवाळे बसवण्याची प्रक्रिया -
‘गल्फ ऑफ मन्नार’मधून प्रवाळांच्या काही फांद्या जमविणे, ऑक्सिजन असलेल्या प्लास्टिक बॅगमध्ये भरणे व थर्मोकोलच्या बॉक्समध्ये साठा करून ठेवणे, मदुराई विमानतळापर्यंत नेणे, तेथून मुंबई विमानतळावर आणणे व तेथून जामनगरला नेणे, वाहून आणलेले प्रवाळे नर्सरीमध्ये लागवडीखाली आणणे व त्यानंतर दोन दिवस वातावरणात टिकवायची व त्यानंतर काही निवडलेल्या ठिकाणी लावायची.
 
 
प्रवाळांच्या वाढीचा प्रवास -
मॉन्टीपोरा प्रवाळ महिन्याला ६-७ मिमी वाढतात. ऍक्रोपोरा जिनस प्रवाळे महिन्याला २-५ मिमी वाढतात. प्रवाळी खडकांचे फायदे या प्रवाळी खडकांवर समुद्रातील तिसरा हिस्सा माशांच्या जाती आढळतात. ही प्रवाळ खडके चांगल्या स्थितीत ठेवणे जरूरी आहे.
 
या प्रवाळातून विविध रसायने व नवीन औषधे मिळतात. कर्करोग, अस्थिरोग, दमा, हृदयविकार, अल्सर, जीवाणूंची बाधा व इतर आजारांकरिता येथे संशोधनातून औषधांची उपलब्धी होऊ शकेल. तसेच खाद्यपदार्थांची पूरके, एन्झाईम्स आणि कॉस्मेटिक्स मिळू शकतील.
 
या प्रवाळ खडकाच्या ठिकाणी सहली व करमणुकीच्या संधी मिळतील. नवीन प्रवाळ खडके निर्मिण्यापेक्षा बिघडलेल्या प्रवाळ खडकांना पूर्वस्थितीत आणण्याकरिता जास्त खर्चाचे पडत नाही. अशी ही प्रवाळे मानवाकरिता फायद्याची आहेत म्हणून त्यांचे जतन केले पाहिजे.
 
- अच्युत राईलकर