स्त्री कल्याणाची निरंतर कृती
 महा एमटीबी  24-Jan-2018
 
 
 
 
 
 
 
पुरुष असो वा स्त्री, ज्या वेळी अन्याय-अत्याचारा विरोधात लढण्याची वेळ येते त्यावेळी एकट्याची ताकद खरच कमी पडते. अशा वेळी सर्वांची मिळून एकत्र ताकद काय करू शकते याची जाणीव व्हायला लागते. अशा जाणिवेतूनच महिलांवर होणार्‍या अत्याचाराला प्रत्युत्तर देण्यासाठी काही महिला उत्स्फूर्तपणे एकत्र आल्या आणि सुरू झाला ‘स्त्री आधार केंद्रा’चा प्रवास. रमेश देवबा शेलार म्हणजेच शेलार गुरुजी ‘स्त्री आधार केंद्रा’चे संघटक आणि सल्लागार अगदी भान हरपून आपल्या लाडक्या संस्थेच्या वाटचालीची माहिती देत होते. पुण्यातील एका उपनगरात आमचं काम कधी सुरू झालं, हे कळलं देखील नाही, म्हणून त्याची नक्की तारीख, वार सांगता येणार नाही. पण साधारण १९८० च्या सुमारास सुरू केलेल्या कामाची सार्वजनिक विश्वस्त संस्था म्हणून सोसायटी रजिस्ट्रेशनच्या अंतर्गत अधिकृत नोंदणी झाली ती १९८४ साली.’’ असे त्यांनी सांगितले
संस्थेच्या कामामुळे केंद्राशी जोडल्या जाणार्‍या महिलांची संख्या जशी वाढायला लागली तसाच त्यांच्यामधला आत्मविश्वास, निश्चय, निर्भयता या गोष्टीदेखील वाढत गेल्या. एखाद्या नदीसारखं या केंद्राचं काम अव्याहत चालू आहे आणि पुढेही चालू राहील. या प्रवाहात अनेक नवनवीन विचारधारा घेऊन कार्यकर्ते, स्वयंसेवक येऊन मिळत गेले, अनेक जणांचं वेगवेगळ्या प्रकारचं योगदान मिळत गेलं आणि ‘स्त्री आधार केंद्रा’चा विस्तार वाढत गेला.
 
 
 
असा वाढत गेला ‘स्त्री आधार केंद्रा’चा वटवृक्ष.
पहिल्या टप्प्यात सूक्ष्म पातळीवर काम करतानाच जास्तीत जास्त सामुदायिक उपक्रम कसे राबवता येतील, हा संस्थेचा मूलमंत्र होता. त्याबरोबरीनेच महिलांमध्ये शिक्षणाचा प्रसार करणे, त्यांची जागरुकता वाढवणे यामुळे थोड्याच कालावधीत संस्थेची दबाव गट म्हणून ओळख झाली आणि त्यातूनच कोअर टीमची निर्मिती झाली. दुसर्‍या टप्प्यात संघटना उभारणीच्या कामात लक्ष देताना महिलांना पाठिंबा देण्यासाठी गटांची स्थापना करण्यात आली, संस्थेचं काम अधिक वैशिष्ट्यपूर्ण कसं होईल, याची काळजी घेत संस्थेमध्ये महिलांसाठी रोजगारनिर्मिती करण्यावर देखील भर देण्यात आला. त्यातूनच महिलांना प्रशिक्षण देण्यासाठी कर्मचार्‍यांची नेमणूक केली गेली.
तिसर्‍या टप्प्यात अनेक व्यक्ती, संस्था केंद्रांबरोबर जोडल्या गेल्या. यांच्याबरोबरचे व्यवहार, संबंध वाढले, संस्थेचा पसारा वाढायला सुरुवात झाली. यातून संस्थेचा आलेख उंचावत गेला. संस्थेचं नाव होत गेलं आणि जास्तीत जास्त महिलांना जास्तीत जास्त सुविधा देण्यासाठी अनेक कृतिशील कार्यक्रम हाती घेण्यात आले. चौथ्या टप्प्यात धोरणात्मक निर्णय घेण्यासाठी सल्लागार समिती गठीत केली गेली आणि राज्य पातळीवरील धोरणं ठरवण्यात सहभाग, तसंच राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर संबंध वाढविण्याकडे लक्ष पुरविण्यात आले. त्यामुळेच लैंगिक भेदभावाविरुद्ध राज्य आणि राष्ट्रीय पातळीवर सूचना देऊन स्त्रियांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी संस्थेने प्रयत्न केला.
 
 
 
जवळपास १६ वर्ष ‘स्त्री आधार केंद्रा’चं काम या चार टप्प्यांमधून चालू होतं, प्रत्येक टप्पा साधारणपणे चार वर्षांचा होता, असं म्हणता येईल. नीलम गोर्‍हे या सध्या केंद्राच्या अध्यक्षा आहेत.
समाजाची रचना स्त्री मूल्यांच्या आधारावर करणं हेच संस्थेचे प्रमुख उद्दिष्ट आहे.
ती चार मूल्ये म्हणजे
१. सर्वांसाठी समानता, न्याय अनुकूलता, सर्वसमावेशकता आणि सहकार्य
२. स्त्री शोषणाविरुद्ध आवाज
३. स्त्रियांना मुख्य प्रवाहात आणणं
४. महिला सक्षमीकरण
या चार मूल्यांच्या आधारेच संस्थेमार्फत चालवल्या जाणार्‍या विविध कार्यक्रमांची आखणी केली जाते. १९९५ सालातल्या सप्टेंबर महिन्यात बीजिंग येथे भरलेली चौथी आंतरराष्ट्रीय महिला परिषद स्त्री आधार केंद्राच्या प्रवासातील एक मैलाचा दगड ठरली. या परिषदेच्या सुरुवातीपासून ते संपूर्ण परिषद पार पडेपर्यंत आणि त्यानंतरच्या काळात ‘स्त्री आधार केंद्रा’ने त्यातल्या कार्यक्रमात, प्रकल्पामध्ये मोठी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली.
 
 
 
१९९९ साली केंद्राला ’युनायटेड नेशन्स इकॉनॉमिक सोशल कौन्सिल’कडून मान्यता मिळाली. यामुळे राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय पातळीवर स्त्रियांना मूलभूत प्रश्नांसाठी काम करायला केंद्राला मिळालेलं ते एक प्रकारचं प्रोत्साहन होतं. केंद्राने तोपर्यंत केलेल्या कामाला मिळालेली ती मोठीच पावती होती.
 
 
 
स्त्री शोषणाविरुद्ध आवाज
बीजिंगमधल्या चौथ्या आंतरराष्ट्रीय महिला परिषदेत स्त्रीशोषणाची जी व्याख्या केली, त्यातल्या प्रत्येक मुद्द्याला ग्राह्य धरून ‘स्त्री आधार केंद्र’ महिलांच्या शोषणाविरोधात आवाज उठवण्याचे काम संस्था करत आहे. या व्याख्येप्रमाणे स्त्रीशोषणामध्ये खाजगी किंवा सार्वजनिक ठिकाणी स्त्रियांवर लिंगभेदामुळे केला जाणारा कोणत्याही प्रकारचा शारीरिक किंवा मानसिक अत्याचार, प्रत्यक्ष अत्याचार अथवा त्याचा धाक दाखवणं, कोणत्याही प्रकारची जबरदस्ती करणं, स्वातंत्र्य हिरावून घेणं याचा समावेश होतो.
 
 
 
स्त्रियांना मुख्य प्रवाहात आणणं
स्त्रियांचे प्रश्न हे सार्‍या समाजाचे प्रश्न आहेत. त्यांना मुख्य प्रवाहात आणून त्यांच्यावर उपाययोजना करणं याचा ’स्त्री आधार केंद्रा’ने सतत आग्रह धरला आहे. संपूर्ण देशाची धोरणं ठरवताना त्यात या प्रश्नांचा विचार झालाच पाहिजे. कोणत्याही देशाने राष्ट्रीय अथवा आंतरराष्ट्रीय पातळीवर आपली विकसनशील धोरणे आखताना स्त्रियांच्या समस्या लक्षात घेऊनच ती आखली पाहिजेत. स्त्रियांचे प्रश्न स्वतंत्रपणे न हाताळता राजकारणाच्या मुख्य प्रवाहामध्ये या प्रश्नावर विचार व्हावा ही ‘स्त्री आधार केंद्रा’ची मुख्य भूमिका आहे.
महिलांमधल्या क्षमता ओळखून त्या विकसित करण्यासाठी ‘स्त्री आधार केंद्रा’ने महाराष्ट्रातील १० जिल्ह्यांमध्ये महिला विकास मंचाची स्थापना केली आहे. स्थानिक पातळीवर महिलांना संघटित करून स्थानिक पातळीवरचे त्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी हा मंच काम करतो. या मंचामध्ये महिला आपले विचार, मतं मोकळेपणाने व्यक्त करू शकतात. याशिवाय सरकारी योजना आणि धोरणं यांची माहितीही या मंचामार्फत दिली जाते. त्याचा लाभ कसा घ्यावा याचंही प्रशिक्षण दिलं जातं. यातून काही महिलांमधील नेतृत्त्वगुण हेरून त्यांना निर्णय प्रक्रियेत आणि स्थानिक राजकारणात सहभागी केलं जातं.
 
 
 
आपद्ग्रस्तांसाठी विशेष सहकार्य
नैसर्गिक किंवा मनुष्यनिर्मित संकट ओढवतात, अशा वेळी त्यात अडकलेल्या महिलांना विशेष मदत पुरवण्याचे काम ’स्त्री आधार केंद्र’ करत आलेले आहे. १९९३ साली महाराष्ट्रात झालेल्या भीषण भूकंपाच्या वेळीही केंद्राने तेथील महिलांना इतर मदतीबरोबरच मानसिक आधारही देण्याचं काम केलं. संकटग्रस्त महिलांच्या पुनर्वसन आणि सक्षमीकरणाच्या कामामध्ये केंद्राचा नेहमीच पुढाकार असतो.
 
 
 
‘स्त्री आधार केंद्रा’चे विविध प्रकल्प
१. कौटुंबिक समुपदेशन केंद्र
सुरुवातीपासूनच सातत्याने कौटुंबिक समुपदेशन हा ‘स्त्री आधार केंद्रा’चा मुख्य प्रकल्प राहिलेला आहे.
२. झेड योजना
घरगुती अत्याचारांचं प्रमाण शून्यावर यावं यासाठी गेल्या तीन-चार वर्षापासून स्त्री आधार केंद्र कार्यरत आहे. या प्रकल्पामध्ये समाजाचा आणि दोन शहरी आणि दोन ग्रामीण अशा चार पोलीस केंद्रांचाही समावेश करण्यात आला आहे. समाजातील निरनिराळ्या घटकांच्या हस्तक्षेपामुळे हिंसेचे प्रमाण शून्यावर आणण्याचा या प्रकल्पाचा प्रयत्न आहे.
३. महिला विकास धोरण
महिला विकासनीतीला चालना आणि गती देणं हे ऑस्ट्रेलियन हाय कमिशनने पाठिंबा दिलेल्या या प्रकल्पांचं उद्दिष्ट आहे, महाराष्ट्रातील नऊ जिल्ह्यांमध्ये स्त्री आधार केंद्राने महिला विकास मंचांची स्थापना केली आहे. या मंचाचे कार्यकर्ते आणि स्वयंसेवक त्या त्या जिल्ह्यातील गावांमध्ये महिला गटांना सर्वतोपरी आधार देतात आणि मदत करतात.
४. महिलांचं कायदेविषयक ज्ञान
कायद्याच्या चौकटीत राहून महिलांवरील अत्याचाराचे खटले झटपट निकालात निघावेत यासाठी महाराष्ट्रातल्या १० न्यायालयातील १०० खटल्यांचा अभ्यास ‘स्त्री आधार केंद्र’ करत आहे आणि शक्य ते तोडगेही सुचवत आहे. या प्रकल्पाला राष्ट्रीय महिला आयोगाचाही पाठिंबा मिळालेला आहे.
५. प्रवासामध्ये महिलांची सुरक्षा
‘स्त्री आधार केंद्रा’ने प्रवास करणार्‍या महिलांच्या सुरक्षेच्या दृष्टीने महत्त्वाकांक्षी प्रकल्प हाती घेतला आहे.
६. महिलांची सर्वांगीण प्रगती
हॉलंडच्या ‘कॉर्डएड’ने पाठिंबा दिलेल्या या प्रकल्पाअंतर्गत महाराष्ट्रातील मराठवाड्यामधल्या भूकंपग्रस्त ४२ गावांमध्ये काम केलं जातं. स्थानिक पातळीवर महिलांमधले नेतृत्वगुण ओळखून त्यांना प्रोत्साहन देणं आणि गावाच्या विकासप्रक्रियेत त्यांना सामावून घेणे, असं या कामाचं स्वरूप आहे.
 
 
 
‘स्त्री आधार केंद्रा’तर्फे ‘आम्ही स्त्रिया ’हा वार्षिक अंक दरवर्षी ऑक्टोबर महिन्यात प्रकाशित केला जातो. एखाद्या विशिष्ट संकल्पनेवरील विषयाला वाहिलेला हा अंक आहे. गेल्या काही वर्षात या अंकात हाताळलेले विषय असे होते :
१) आंतरराष्ट्रीय महिला सक्षमीकरणाच्या तुलनेत भारतीय महिलांचे स्थान
२) स्त्रियांवरील अत्याचार
३) निर्णयप्रकियेत स्त्रियांचा सहभाग
 
 
 
केंद्रातर्फे काही पुस्तिकाही प्रकाशित करण्यात आल्या आहेत. त्यात चित्रांचा आणि गोष्टीरूपाने दिलेल्या केस स्टडीजचा समावेश असल्याने ग्रामीण भागातील अल्पशिक्षित महिलाही त्या आनंदाने वाचू शकतील. त्यातील काही महत्वाच्या पुस्तिका -‘सरकार म्हणजे काय ?’, ‘स्त्रिया आणि कायदा’, ‘नारीपर्व‘, ‘अत्याचारग्रस्त महिलांची मैत्रीण’ वगैरे. इतकेच नव्हे तर केंद्रातर्फे काही व्हिडिओ फिल्म्सही तयार केल्या आहेत. त्यापैकी ‘स्त्रियांचे हक्क‘, ‘महिला कोर्ट’ या फिल्म्समधून स्त्रियांना त्यांच्या मानवी आणि कायदेशीर हक्कांविषयी सतर्क राहण्याची जाणीव मिळते. कुठल्याही प्रकारच्या अन्यायाविरुद्ध लढण्यासाठी स्त्रियांना आवश्यक असलेले कायद्याचे ज्ञान या फिल्मद्वारे त्यांना मिळू शकते. भारतीय घटना, आंतरराष्ट्रीय घटना आणि विविध सरकारी धोरण याविषयीदेखील या फिल्मद्वारे माहिती मिळते. तर ‘पंचायतराज’ सारख्या फिल्म्सच्या माध्यमातून पंचायतराजचं कामकाज कसे चालते, त्यात आपल्याला कसे सहभागी होता येते, त्यात निर्णयप्रक्रिया कशी चालते हे दाखवले आहे.
 
 
 
’स्त्री आधार केंद्रा’चे प्रतिनिधी म्हणतात, “लिंगभेदाच्या अन्यायाविरोधातील समाज निर्माण करण्यासाठी ’स्त्री आधार केंद्रा’च्या कामासाठी आपलाही योगदान खूप मोलाचा आहे. म्हणूनच स्त्री आधार केंद्र आपल्या सहयोगाला आवाहन करत आहे. आपण वेळ, ऊर्जा, धनसहयोग करू शकता”. ‘स्त्री आधार केंद्रा’ला भेट दिल्यानंतर वाटते की, आजच्या समाजाला या केंद्राची नितांत गरज आहे.
 
 
 
९७६५६३३७७९
संपर्क : स्त्री आधार केंद्र,
रमेश शेलार ९९२२६६२५३३
 
 
काशीनाथ पवार