अविष्कारचा कलाविष्कार - कचरावेचक मुलांसाठी
 महा एमटीबी  24-Jan-2018

 
 
 
 
विद्यार्थ्यांमधील सुप्त कलागुणांना वाव देण्यासाठी कल्याण आविष्कार एज्युकेअर फाऊंडेशन ही संस्था २०१० पासून कल्याण-डोंबिवली व ठाणे जिल्ह्यात कार्यरत आहे. कल्याणमधील कचरावेचक कामगारांच्या मुलांसाठी विविध उपक्रम आविष्कार फाऊंडेशन सातत्याने आयोजित करत असते. कल्याण शहरातील डम्पिंग ग्राऊंड परिसरात राहणार्‍या कचरावेचक कामगारांच्या मुलांना चित्रकलेचे धडे योग्य पद्धतीने गिरवण्याची संधीही या संस्थेतर्फे देण्यात आली.
 
 
 
विद्यार्थ्यांना बालदिनानिमित्त चित्रकलेचे साहित्य वाटप करणे, येणार्‍या काळात या विद्यार्थ्यांना एलिमेंटरी आणि इंटरमिजिएट या शासनाच्या परिक्षांना विनामूल्य बसवणे. तसेच त्यासाठी लागणारी मदत संस्थेद्वारे केली जाणार आहे. या विद्यार्थ्यांच्या मनातील सुप्त आविष्कारांना इथे संधी दिली जाते.समाजातील काही सण, रूढी, परंपरा कशा जनहित साधत साजरे करू शकतो, यासाठी नागपंचमीच्या निमित्ताने या मुलांना ‘आविष्कार’च्या वतीने दूधही वाटण्यात आले. नाग दूध पीत नाही. तरी आपण त्याला दूध पाजण्यासाठी दूध वाया घालवतो. दुसरीकडे असंख्य बालगोपाल या दुधापासून वंचित आहेत. हे कुठेतरी बदलले पाहिजे. यासाठी प्रत्येकाने आपली मानसिकता बदलण्याची गरज आहे, असे या संस्थेचे मत आहे. हजारो, लाखो लिटर दूध नाल्यात वाया जाते. हेच दूध जर गरीब मुलांच्या पोटात गेले तर त्यांचा आत्मा गार होईल. एक दिवस का होईना पोटभर दूध पिण्याचे भाग्य या बालगोपाळांना मिळेल, असे ‘आविष्कार’चे पदाधिकारी मानतात. यासाठी ‘आविष्कार’च्या वतीने नागपंचमीला या कचरावेचक मुलांना दूध वाटप करण्यात आले.
 
 
या अनोख्या उपक्रमांना घेऊन चालणार्‍या या ‘आविष्कार एज्युकेअर फाऊंडेशन’ची सुरुवात विनोद लक्ष्मण शेलकर यांनी २०१० मध्ये छोट्या उपक्रमाच्या माध्यमातून केली. जळगाव येथील शेतकरी कुटुंबात त्यांचा जन्म झाला. वडील लक्ष्मण शेलकर शेतकरी व समाजसेवक आणि गावचे सरपंचही होते. विनोद शेलकर यांचे दहावीपर्यंतचे शिक्षण गावीच झाले. लहानपणापासून असलेली चित्रकलेची आवड बघून दहावीला चांगले मार्क असतानाही वडिलांनी “तुला आवडेल त्या क्षेत्रात जा व प्रगती कर,’’ असे सांगितले व त्यांनी कलाक्षेत्रात जाण्याचा निर्णय घेतला. त्यांनी खिरोदा येथील सप्तपुट ललित कला महाविद्यालयात कलाशिक्षण अभ्यासक्रमास प्रवेश घेतला. शिक्षण पूर्ण होताच लगेच नोकरी मिळाली. नोकरी करत असताना कला क्षेत्रात पद्युव्युत्तर शिक्षण घेत हस्तकला, गायन, वादन याच्याही काही परीक्षा त्यांनी दिल्या. पद्व्युत्तर पदवी मध्ये जळगावच्या ललित कला महाविद्यालयात त्यांनी प्रथम क्रमांक पटकावला. सहा वर्ष जळगावच्या शाळेत नोकरी केल्यानंतर २००६ मध्ये कल्याणच्या आर्य गुरुकुल शाळेत कलाशिक्षक म्हणून रुजू झाले.
 
 
मनातील कलावंताला खर्‍या अर्थाने काम करण्याची संधी येथे मिळाली. मोठमोठी कामे सहज करण्याची सवय येथेच लागली. स्प्रे पेंटिंग, मोठे मंच सजावट, थ्री डी आर्टला खर्‍या अर्थाने येथे सुरुवात झाली. शाळेने व संस्थाचालकांनी वेळोवेळी ती सादर करण्याची संधीही उपलब्ध करून दिली, असे ते आवर्जून सांगतात. शाळा चिन्मया मिशनद्वारे चालणारी असल्यामुळे समाजसेवेचे बीज येथेच त्यांच्या मनी रुजले. वडिलांचे संस्कार व समाजाचे आपण काही देणे लागतो, ही भावना, वंचितांसाठी झटण्याची प्रबळ इच्छा याचाच परिपाक म्हणजे २०१० साली ’आविष्कार’चा जन्म. २०१३ मध्ये त्यांची निवळ गुरुनानक इंग्लिश हायस्कूल आणि ज्यू. कॉलेज, रामबाग कल्याण येथे कलाशिक्षक म्हणून झाली. कल्याण-डोंबिवलीतील प्रथम थ्री डी कलावंत म्हणून ही त्यांची ओळख आहे. कल्याणच्या मेट्रो मॉलमध्ये त्यांनी चित्रकला स्पर्धा, ठाणे जिल्ह्यातील प्रथम फेस पेंटिंग स्पर्धा त्यांनी भरवली. शहरात प्रतिकूल परिस्थितीमुळे चित्रकलेचे धडे न घेता येणार्‍या विद्यार्थ्यांना विनामूल्य शिकविण्यासाठी सदैव तयार आहे, असे विनोद शेलकर सांगतात. या उद्देशानेच त्यांनी सचिन जाधव, सुहास रेळेकर, गिरीश मंजुळे, संदीप रोकडे, भगवान महाजन, अमोल महाजन, गोपाल राव या मित्रांना घेऊन ’आविष्कार एज्युकेअर फाऊंडेशन’ नावाची समाजसेवी संस्थेची स्थापना केली. जी विद्यार्थ्यांवर होणार्‍या अन्यायाविरुद्ध लढते, त्यांना शिक्षणासाठी मदत करते, त्यांच्यासाठी सामाजपयोगी विविध उपक्रमांचे सातत्याने आयोजन करत असते. चित्रकला स्पर्धा, ठाणे जिल्ह्यातील पहिली फेस पेंटिंग स्पर्धा, भिवंडी येथील बालसुधारगृहातील मुलांसाठी चित्रकला वर्ग, गरीब व गरजू विद्यार्थ्यांना चित्रकला साहित्याचे वाटप, अनाथ आश्रमातील मुलांसाठी आवश्यक साहित्य वाटप, मानसिकदृष्ट्या कमजोर विद्यार्थ्यांसाठी कार्यशाळेचे आयोजन, आविष्कार कला महोत्सवाचे आयोजन अशा अनेक कार्यक्रमांचे आयोजन संस्थेच्या माध्यमातून केले जाते. इतरांच्या चेहर्‍यावरील समाधानाचा आनंद बघून आम्हाला आमचे कार्य व वेळ सत्कारणी लागल्याचे समाधान मिळते, असे सर्व कार्यकर्ते सांगतात.
 
 
भिवंडी येथील बालसुधारगृहातील मुलांसाठी संस्था काम करत असून या मुलांना चित्रकलेचे प्रशिक्षण व साहित्य वाटप करणे हे त्यातील नेहेमीचे काम. पनवेल जवळील लिंगोबाच्या डोंगराच्या पायथ्याशी जिथे पायवाटेशिवाय कोणताही पर्याय नाही, अशा २० घरांच्या आदिवासी पाड्यावर जाऊन कपडे व मिठाई वाटप तसेच प्रबोधनपर कार्यक्रमाचे आयोजन संस्था करते. पालघर जिल्ह्यातील, मोखाडा तालुकास्थित डोलारा गावाजावळील साकरवाडी लहान पाडा व मोठा पाडा, सडक वाडी, आडोशी गावाजवळील हनुमंत पाडा येथेही संस्थेचे कार्य सुरू आहे. या पाड्यांवरील परिस्थितीशी, निसर्गाशी सदैव दोन हात करत जगणारे बांधव. या सगळ्या बांधवांना, बापड्यांना जगण्याचे बळ देण्याचे काम संस्था करते. त्यांच्यात जाऊन त्यांना येणार्‍या समस्यांचे निराकरण करण्याचे काम करते.
 
 
आज ज्यांनी शिक्षण घेतले नाही अशी हातावर पोटं असलेल्या लोकांची मोठी पंचाईत आणि घालमेल बघायला मिळते. मिळेल ते काम घेऊन कसाबसा परिवाराचा उदरनिर्वाह करण्याची धडपड असंख्य परिवार करताना दिसून येतात. अर्धपोटी झोपणारी अनेक परिवार, लहान मुले आपणास पाहावयास मिळतात. एकीकडे गडगंज संपत्ती असलेले लोक आणि दुसरीकडे दोन वेळच्या पोटाच्या खळगीसाठी चाललेली तारेवरची कसरत. ही दरी कधीही कमी न होणारी आहे. परंतु, आपल्याकडे असलेल्या दोन हातांनी देण्याची सवय आपण लावल्यास अशा अनेक परिवारांना त्याचे सहकार्य होईल. व्हॅलेंटाइन डे, मदर्स डे, फादर्स डे, वूमन्स डे, असे अनेक डे आपण आपल्या आनंदासाठी, सन्मानासाठी साजरे करत असतो. परंतु, या बरोबर जर आपण ‘फूड डे’ ही साजरा केला तर आपल्या देशात उपाशी झोपणारे परिवार, चिमुरडे दोन घास खाऊन आनंदाने व समाधानाने झोपतील, असे ‘आविष्कार’चे संस्थापक विनोद शेलकर म्हणतात.
 
 
आपापल्या राज्यात काम नसल्याने आपल्या उदरभरणासाठी कल्याण परिसरात इतर राज्ये व जिल्ह्यातून कामानिमित्त आलेले गरीब लोक ठिकठिकाणी रस्त्याच्या कडेला पत्र्याची घरे करून अथवा उघड्यावर राहातात. या लोकांची अवस्था फार वाईट असते. प्रत्येक दिवशी कामानिमित्त जेव्हा हे लोक घराबाहेर पडतात, त्यांची चिमुकली मुलं, उघडी, अर्धनग्न अवस्थेत परिस्थितीशी दोन हात करत कोणतीही अपेक्षा न ठेवत, खेळताना, बागडताना दिसतात. या चिमुरड्यांना एक दिवस का होईना पोटभर अन्न देता यावे, यासाठी डोंबिवली येथील स्फूर्ती महिला संस्था आणि कल्याण येथील ‘आविष्कार एज्युकेअर फाऊंडेशन’ने दुर्गाडी परिसरातील अग्निशमन केंद्राच्या कार्यालयावळील लहान मुलांना व त्यांच्या परिवारास जेवण देण्याचा प्रयत्न करण्यात येतो. या व्यतिरिक्त २०११ सालापासून प्रत्येक वर्षी विद्यार्थ्यांसाठी एकदिवसीय इकोफ्रेंडली गणेशमेकिंग कार्यशाळेचे आयोजन करण्यात येते. या कार्यशाळेत प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तींमुळे व निर्माल्यामुळे होणारे जलप्रदूषण, त्यातून जलचर प्राण्यांना होणारा त्रास, गमवावा लागणारा जीव, याची दाहकता विद्यार्थ्यांना समजावून सांगितली जाते. त्याचबरोबर निर्माल्याचे घरच्या घरी आपण खतात रुपांतर कसे करू शकतो आणि आपल्या घरच्या झाडांना त्या खताचा कसा उपयोग होता, हे सांगण्यात येते व पर्यावरण संवर्धनाचा संदेश दिला जातो.
 
 
शेलकर म्हणतात, ‘‘येणार्‍या काळात आमचे उपक्रम सातत्याने सुरूच राहतील तसेच वंचित उपेक्षित अशी कचरा वेचणारी मुले, भीक मागणारी, गुन्हेगार प्रवृत्तीकडे वळलेली मुले, अनाथ मुले यांच्यासाठी अत्याधुनिक शैक्षणिक सुविधा विनामूल्य उपलब्ध करून देणे, वचितांना नेहमीसाठी रोजगार निर्माण करून देणे, त्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी सहकार्य करणे, स्वावलंबी बनवणे यासाठी विविध योजनांचे नियोजन सुरू आहे. ही आमची स्वप्ने लवकरच सत्यात उतरतील, असा विश्वास आम्हा सर्वांना आहे’’. प्रत्येक वर्षी असंख्य सहृदयी हात त्याला जोडले जाणार आहेत असा प्रगल्भ विश्वास विनोद शेलकर यांना वाटतो. नुकताच शेलकर यांना त्यांच्या या सामाजिक कार्याबद्दल व्रतश्री, श्री संत सावतामाळी युवक संघ महाराष्ट्र राज्य, नगर, यांच्याकडून राज्यस्तरीय संत सावता भूषण तर महात्मा फुले कृती समिती लातूर समाजरत्न पुरस्कार कुलाभूषण, कलामहर्षी, कलाश्री, आदर्श कलाशिक्षक अशा अनेक पुरस्कारांनी त्यांना सन्मानित करण्यात आले आहे.
 
 
‘आविष्कारा’ने आपल्या सातत्यपूर्ण समाजभिमुख कार्यातून आपला ठसा समाजावर उमटवला आहे. समाजकार्य करताना उपक्रम राबवताना कित्येकवेळा समस्या उभ्या राहिल्या, पण त्या सर्व समस्यांना आविष्कार संस्थेने लिलया उत्तर दिले. दिवसेंदिवस वाढत चाललेल्या ‘आविष्कारा’या कामाला समाजाची साथ लाभली आहे. ती उत्तरोत्तर वृद्धिंगत होवो.
 
 
-रोशनी खोत