पद्मावत विरोधात पेटले गुजरात, दिल्ली, हरियाणा
 महा एमटीबी  24-Jan-2018


 
नवी दिल्ली : पद्मावर विरोधात सुरु असलेलं विरोधाचं वादळ काही थांबण्याचे नाव घेत नाही. गुजरात येथे या चित्रपटाविरोधात मारामारी आणि तोडफोडची घटना घडली आहे. काही बंडखोर तत्वांनी एका मॉजवळ उभ्या असलेल्या ४० गाड्यांना आग लावल्याची घटना घडली आहे. त्यामुळे केवळ एका चित्रपटामुळे इतका हिंसाचार का असा प्रश्न उपस्थित झाला आहे.
 
या घटनेवर आवर घालण्यासाठी स्थानिक पोलिसांनी हवेत गोळीबार केला, मात्र तरी देखील नागरिकांचा हिंसाचार कमी झाला नाही. हिमालय मॉल असे तोडफोड झालेल्या मॉलचे नाव आहे.
 
चित्रपट प्रदर्शित होण्याआधीच हरियाणाच्या गुरुग्राम येथे कलम १४४ लावण्यात आली आहे. जमावबंदीमुळे चित्रपट प्रदर्शित करण्यात येणार नाही. करणी सेनेने चित्रपट गृहांना चित्रपट प्रदर्शित केल्यास तोडफोड करण्यात येईल अशी धमकी दिली आहे.
 
दरम्यान सर्वोच्च न्यायालयाने हरियाणा, राजस्थान आणि मध्यप्रदेश व गुजरात या चारही राज्यांची याचिका फेटाळली आहे, तसेच भारतात सर्व ठिकाणी एकाच दिवशी हा चित्रपट प्रदर्शित करण्यात येईल असे सांगितले आहे. त्यामुळे चित्रपट प्रदर्शित होण्याआधीच इतका गदारोळ झाला असताना चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर काय होईल हे बघणे आता महत्वाचे ठरणार आहे.